महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,091

शोध सत्याचा – मयुर खोपेकर

By Discover Maharashtra Views: 4079 14 Min Read

शोध सत्याचा

किल्ले रायगडावरील छत्रपतींच्या पावन समाधी जवळ असलेल्या कुण्या एका “वाघ्या” नामक काल्पनिक कुत्र्याचे स्मारक आपण सर्वानी पाहिले आहे. तर सर्वप्रथम आपण पाहू कि हा वाघ्या नामक काल्पनिक कुत्रा इतिहासात आला कुठून? आणि खरंच महाराजांना एवढी फुरसत होती कि ते असे काही पाळीव प्राणी स्वतःच्या घरी ठेवतील ? वाघ्याचा उल्लेख सर्वप्रथम दिसून येतो तो धारवाड मधील यादवाड गावातील एका शिल्पात. पण त्या शिल्पात असलेला सदृश्य प्राणी हा खरंच वाघ्या कुत्रा आहे का? प्रथम आपण जाणून घेऊ कि हे शिल्प का कोरण्यात आले?

धारवाड- जाधवगडी युद्धप्रसंग –

इ .स. १६७८ साली शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्टात परत येताना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला. हे काम सखोजी गायकवाड या सरदारावर सोपवले होते. पुढे उत्तरेस संपगावाकडे महाराज कूच करीत असता, बेलवाडीच्या किल्ल्याची मालकीण सावित्रीबाई देसाईन (मल्लमा) म्हणून एक विधवा स्त्री होती. तिने महाराजांच्या सैन्यास हकिवाड्यास उपसर्ग दिला. त्यावरून तिच्या किल्ल्यास त्यांच्या काही लोकांनी वेढा दिला. सावित्रीबाईने न डगमगता किल्ला सत्तावीस दिवस लढविला. शेवटी तिची अन्नसामग्री व दारूगोळा ही संपला तेव्हा तिने आपल्या लोकानिशी वेढा घातलेल्या लोकांवर तुटून पडून त्यांची बरीच खराबी केली. ती त्यांच्याशी सगळा दिवस मोठ्या आवेशाने लढली, परंतु अखेरीस पराभव पावून ती त्यांच्या हाती लागली. तिला त्यांनी महाराजांपाशी आणले. तिने त्यांचे मोठे नुकसान करून आणखी सत्तावीस दिवसपर्यंत त्यांना दाद न दिल्यामुळे त्यांची बरीच फजिती झाली, तरी स्त्रीजातीस शिक्षा करू नये असा त्यांचा नियम असल्याकारणाने त्यांनी तिला वस्त्रेभूषणे देऊन गौरविले आणि दोन गाव इनाम करून देऊन सोडून दिले. एका महिलेने पतीच्या निधनानंतर विरांगनेप्रमाणे युद्ध केले म्हणून शिवरायांनी तिला सावित्रीबाई हा किताब देऊन गौरविले. (केळुसकर)

इ. स. १६७८ फेब्रुवारी २८. राजापूरहून सुरतेस लिहिलेल्या पत्रात असलेला मजकूर – हल्ली शिवाजी एका किल्लाला वेढा घालण्यांत गुंतले आहे. त्यांच्याच लोकांच्या सांगण्यावरून असे दिसते की, मोंगल किंवा दक्षिणी ह्यांच्या हातून कधीहि झाला नाही असा मानहानीकारक पराजय त्यांचा त्या ठिकाणी झाला. ज्यानी आजपर्यंत इतकं अनेक राज्ये जिंकून घेतली, ते एका देसाई स्त्रीचे पारिपत्य करू शकले नाहीत. – (प. सा.सं.२०१९)

बलवाडा म्हणून कोट होता. तेथे देसाईण बायको होती. तिनें राजियाचे लष्करचे कहीकाबाडी बैल नेले. हे वर्तमान राजियास कळलें. बलवाडास वेढा घातला. कोट घेऊन देसाईण धरिली. तीस शिक्षा केली. मग पुढे पन्हाळियास आले. (स.ब)

शके १५९९ कार्तीक मासी राजश्री स्वामी करनाटकांतून गदक प्रांतास आले. बेलवडीस वेढा घातला. (जे.श)

धारवाड मध्ये असलेले शिल्प नक्की आहे काय? तर पुढे वाचू त्या पाषाणी शिल्पात काय मांडले आहे.

शिल्प वाचन – 

मल्लाम्मा हिने शिवरायांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात शिवरायांची पाषाण शिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प कर्नाटकमध्ये धारवाडच्या उत्तरेस, यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभीमुख देवळाच्या पश्चिमेस असून या शिल्पामध्ये शिवरायांसोबत झेपावत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेंव्हा मल्लमा देसाईनां राज्य परत केले तेंव्हा त्यांनी एक शिवाजी महाराजांची शिळा तयार केली. त्या शिळे मध्ये दोन विविध प्रसंग कोरली गेली आहेत.

पहिल्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज घोड्यावर बसले आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवार दाखवली आहे पुढे काही सैनिक दाखवले आहेत. एका सैनिकाच्या हातामधे भाला तर दुसर्‍या सैनिकांकडे चंबू सारखे भांडे पाहावयास मिळते. एका सैनिकाच्या हातामधे ध्वज ही असावा असा अंदाज आहे. नंतर वरच्या बाजूच्या नक्षीमध्ये काही पोपट ही दाखवले आहेत. ह्या प्रसंगामध्ये एक कुत्रा नामक सदृश प्राणी ही आढळतो असे काहींचे मत आहे. वास्तविकता जर बघितली तरी तो कुत्रा नसुन चित्ता सारखाच एखादा प्राणी असावा असे ही काही संशोधकांचे अणि पुरातत्व अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याच्या पायांची उंची, शरीरयष्टी, तोंडाला बांधलेली जाळी अश्या प्रकारच्या गोष्टी विचार करण्यास भाग पाडतात.

दुसर्‍या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईंच्या बाळाला मांडीवर घेतले आहे आणि एका भांड्यामध्ये त्याला दुध भात खाऊ घालत आहेत असे दिसून येते. दुसरे शिल्प महाराजांनी जिंकलेले राज्य देसाईंना परत केले ह्याचे प्रतीक म्हणून घडविण्यात आले आहे. शिल्पामध्ये एक शिलालेख सुद्धा आहे.  शिलालेख हा जुन्या कन्नड ह्या भाषे मध्ये असल्यामुळे तो वाचता येत नाही, शिलालेख थोडा पुसट ही झाला आहे. ईश्वर, प्रभू अशीच काही शब्द वाचता येतात.

दंतकथा – 

इ. स. १९२७-२८ ला समाधीच्या जिर्णोद्धारचे काम पूर्ण झाले. मग हे कुत्र्याचे स्मारक १९३६ साली आले कुठून हे विचार करण्याची बाब आहे. इ. स.  १९१८-१९ साली राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास या नाटकात या कुत्र्याचे नाव वाघ्या असे ठेऊन त्याला ओळख देण्यात आली. नाटकातील वाघ्या हे पात्र दंतकथेवर आधारित होते. वाघ्याच्या समाधीवर राजसन्यास नाटकामधील वाक्ये कोरण्यात आली  “थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते. हा इनामी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभवसान झाल्याबरोबर या मुक्या इनामी जिवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली.”

राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकावरून. नंतर काही पुस्तकांमध्ये ही उल्लेख आढळतो पण त्यांना काहीसा ठोस संदर्भ उपलब्ध नाही आणि इतिहास संदर्भानेच हाताळला जातो. राजसंन्यास नाटकाचा विचार करता महाराष्टामध्ये कुत्र्या विषयी दंत कथा होती हे निश्चित. कुत्रा किंवा इतर कोणताही प्राणी आगीत स्वतःहून उडी घेईल हे शक्य नाही.

एका पाळीव प्राण्याला माणसाचा लळा तेव्हाच लागतो जेव्हा तो माणूस आपला अधिकाधिक वेळ त्या प्राण्यांसोबत घालवतो. महाराजांच्या जीवनपटाचा अभ्यास केला असता तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे युद्ध आणि स्वराज्यविस्तार यांमध्ये व्यस्त होते.त्यामुळे एखादा पाळीव प्राणी सोबत ठेवणे. त्याच्याबरोबर युद्धास जाणे या सर्व गोष्टीला कोणताही अर्थ राहत नाही.

राजसंन्यास नाटकावरून

उल्लेख – 

इतिहासात वाघ्या कुत्र्याची दंत कथा लिखित स्वरूपात  सर्वप्रथम दिली जाते ते म्हणजे “महाराष्ट्र देशातील किल्ले ” या इ. स. १८९५ साली प्रकाशित झालेल्या चि . ग. गोगटे यांच्या पुस्तकातुन. त्यात त्यांनी या कथेला कोणताही समकालीन संदर्भ किंवा साधने दिली नाहीत. ते म्हणतात महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहन भूमीवर आणले त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहन विधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महा राजांच्या चितेत उडी  घातली, व आपणास जाळून घेतले” आता हा सर्व प्रसंग एका चित्रपटाप्रमाणे भासतो आहे. आता या प्रसंगाचा जर सुक्ष्म विचार केला तर असे काहीसे घडणे हे अशक्यच आहे. कारण कोणताही प्राणी हा आगीपासून लांबच राहतो. दंतकथेप्रमाणे जर तो महाराजांचा कुत्रा असेल तर जसे घरात आपले वडील माणूस निधन पावते तेव्हा घरातील कुत्रा काही दिवस अन्न पाणी यांचा त्याग करू शकतो पण आगीत उडी टाकणे हा प्रसंग काही वेगळाच, नाही का? आणि जर खरंच असे झाले असते तर सभासद ने महाराजांच्या मृत्यूचे वर्णन करताना तो या घटनेला का बगल देईल? चितेत उडी मारणे हि साधी गोष्ट नाही. त्यामुळे चि . ग. गोगटे यांनी दिलेला हा उल्लेख केवळ आणि केवळ एक दंतकथाच, त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही आणि दंतकथेला सत्य इतिहास मानणे हा इतिहासाचा अपमान करणे असे आहे.

शिव समाधीबाबत महत्त्वाच्या नोंदी – 

कर्नल प्रॉथर याने १० मे १८१८ रोजी रायगड आपल्या ताब्यात घेतला. पोटल्याच्या डोंगरावरून त्याने डागलेल्या तोफगोळ्यांनी रायगड उध्वस्त केला होता. सतत ३ दिवस रायगडावर तोफेचा मारा चालूच होता. त्यानंतर प्रॉथरने रायगडावर जाऊन पहिले तर त्याला किल्ल्यावर एक घर, न शिवलेले धान्य, किल्ल्यावरील शिबंदीसाठी असलेली छोटी झोपडी, शिवरायांच्या राजवाड्याचे अवशेष, लांब रस्ते, सुंदर इमारती, मंदिर आणि शिवरायांची सदृश्य अशी समाधी. त्यानंतर प्रोथेर आपल्या अधिकाऱ्यांना घेऊन वाराणसी बाई यांच्याकडे गेला अणि त्यांना गड सोडण्यास सांगितले आणि प्रॉथर गडावरील ५ लाख रुपये घेऊन निघाला.- (कुलाबा गॅझेट) इथे एक महत्वाची नोंद दिसते कि प्रॉथर याने फक्त शिवसमाधीचा उल्लेख केलेला आहे. वाघ्याच्या समाधीचा किंवा त्याच्या अवशेषांचा काडीमात्रही उल्लेख नाही.  

१८८३ पर्यंत गडावर कोणीही प्रवासी गेले नव्हते. James Douglas त्याच्या Book of Bombay मध्ये लिहितो – “No man now cares for Sivaji. Over all those wide domains, which once owned him lord and master, acquired by so much blood and treasure, and which he handed down with care to the Rajas of Kolapur, the Bhonslas of Satara and their Peshwas in Poona, not one man now contributes a Rupee to keep or repair the Tomb and temple of the founder of the Maratta Empire.”

१८८५ मध्ये Arthur Crawford हा मुंबईचे गव्हर्नर Sir Richard Temple  यांच्या सोबत रायगडावर जाऊन आला त्यांनी महाराजांच्या समाधीचे वर्णन आणि चौथऱ्याचे चित्र त्यांच्या Our Troubles in Poona and The Deccan या पुस्तकात काढले आहे जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले होते. तो लिहितो –

It would also be interesting to know what caused this touching outburst, why the Peshwas caste have forgotten for 300 years to restore the monument, or even to keep it in repair I Have they ever taken the trouble to recover from Mhar, the Brahmin town at the foot of the fortress, the carved corner-stones^ pillars and wood-work robbed from their hero’s residence and Durbar halls to be built into the walls of the houses of the better classes, or into their cow-sheds?

वरील पुस्तकात देखील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा तुरळक उल्लेख सुद्धा नाही. त्यामुळे वाघ्या हा केवळ काल्पनिक प्राणीच आहे या गोष्टीची आपल्याला जाणीव होते.

सन १८९५ च्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस लोकमान्य टिळकांनी शिवस्मारक बद्दल लेख लिहिण्यास सुरुवात केली. लोकमान्य लिहितात ” मराठ्यांचे हितशत्रु लॉर्ड हॅरिस साहेब हे देखील शिवाजीच्या पराक्रमाचे वर्णन करीत असतात. त्यांचे वंशज व सरदार हैं स्मारकाची कांहीच खटपट करीत नाही. त्या अर्थी त्यांचे जिणे व्यर्थ होय” डग्लस साहेबांनी समाधीच्या दुस्थितीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले होते. “ समाथीचा अंतर्भाग झाडाझुड्यांनी व्याप्त केला आहे. धर्मशाळेच्या फरसबंदीतुन मोठाले वृक्ष उगवले आहेत. देवालयाची घाण झाली असून त्यांतील मूर्ति जमिनीवर फेकून दिली आहे.” सिंक्लेअर साहेबांच्या शिफारशी वरून मुंबई सरकारने सालीना ५ रुपये मंजूर केले. इंग्रज परकीय हे लक्षात घेतां पुष्कळच होत. पण संस्थानिकांनी व सामान्य लोकांना ढिलाई सोडून जागोजाग सभा भरवून फंड जमा करण्याची तजवीज करून जगास आपली कृतज्ञता दाखविली पाहिजे” (राजधानी रायगड)

वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक गोष्ट/दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे – स्मारक समितीतील काही मंडळी स्मारकासाठी निधी जमवायला इंदूरला होळकरांकडे गेली होती. होळकर संस्थानिक असल्यामुळे इंग्रजांना घाबरत होते. शिवरायांच्या स्मारकाला पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही याची त्यांना मनोमन खात्री होती. तेव्हा ही शृंगापत्ती टळावी म्हणून त्यांनी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली. कारण सांगितले, महाराज सुतकात आहे. कसले सुतक तर महाराणी साहेबांचे लाडके कुत्रे गेले होते त्याचे सुतक ! पण स्मारक समितीची माणसे चाणाक्ष आणि चिकाटीची असावी. आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेवून त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही; इंग्रज अवकृपेची भीती नाही! तोडगा उपयोगी पडला. होळकरांनी देणगी दिली, समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा उभारला!”

जोशी यांनी के. जनार्दन नावाच्या एका शिल्पज्ञ इंजिनियरास रायगडावर धाडून समाधीवर छत्री बांधण्यास लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करविली. या छत्री बांधण्यास लागणाऱ्या खर्चाचा अंदाजी आंकडा ४५,०४६ रु. होता. रायगडावरून परत येतांच जोशी यांनी मुंबईच्या ‘नेटिव्ह ओपीनियन’वगैरे पत्रांतून याच साली लेख लिहिले. इतक्यांत “लॉर्ड रे यांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सरकारांतून व्हावे अशी शिफारस केली आहे ” अशी बातमी प्रसिद्ध झाली. शिवाय दरसाल पांच रुपयांची समाधीच्या किरकोळ दुरुस्तीला मंजुरी मिळाली! पण पुढे सार्वजनिक प्रयत्न थांबल्या सारखा झाला. काही किरकोळ वर्गण्यांची पोंच वर्तमानपत्राचे क्वचित आढळून येते. या चळवळीला चांगले स्वरूप येण्यास आणखी दहा वर्षांचा काळ जावा लागला. (राजधानी रायगड)

१९२५-२६ मध्ये समाधीच्या उत्खनन वेळी महाराजांच्या रक्षेसोबत प्राण्याची काही हाडे सापडली होती ती हाडे कशाची हे जाणून घेण्यासाठी कलकत्त्याच्या zoological survey of India कडे पाठवण्यात आली. तर त्या अहवालात ती हाडे कुणा उदमांजराची असल्याचे निष्पन्न झाले! यावरून असे दिसून येते कि ती हाडे कुत्र्याची नव्हती.

समाधीचे काही जुने फोटो खाली जोडत आहे ज्यात वाघ्याच्या स्मारकाचे अवशेष देखील नाहीत.

सदर फोटो १९२५ च्या आसपासचा आहे
सदर फोटो १९१० च्या आसपासचा असावा

संदर्भ –

  • सभासद बखर
  • छत्रपती शिवाजी महाराज – कृ. अ. केळुसकर
  • जेधे शकावली
  • कुलाबा गॅझेट
  • Book of bombay
  • Our Troubles in Poona and The Deccan
  • राजधानी रायगड – विष्णू जोशी
  • रायगडाची जीवनकथा – शांताराम आवळसकर
  • पत्र सार संग्रह

लेखन –

मयुर खोपेकर

संगमेश टोकरे

(सदर लेख लेखकांच्या परवानगीशिवाय प्रसारित करू नये)

Leave a Comment