महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,228

सोनोपंतांचा झालेला घोळ

Views: 1518
3 Min Read

सोनोपंतांचा झालेला घोळ –

व्यक्तींच्या सारख्या नावांमुळे दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा घोळ होतो. जसा हा घोळ दैनंदिन आयुष्यात होतो, तसा इतिहासातही होण्याची शक्यता असते. शिवकाळातील सोनोपंत ह्या नावाचाही असाच घोळ काही ठिकाणी झालेला दिसतो.(सोनोपंतांचा झालेला घोळ)

शिवाजी महाराज बालपणी शहाजीराजांकडे कर्नाटकात गेल्यावर शहाजीराजांनी त्यांना अष्टप्रधान नेमून दिले. त्यात डबीर म्हणून सोनोपंतांची नेमणूक केली होती. ह्या सोनोपंताचे नाव सोनाजी विश्वनाथ होते. सुमारे ह्याच काळातील आणखी एक सोनोपंत मराठ्यांच्या इतिहासात आढळतो. शिवाजी महाराजांचे मुजुमदार निळो सोनदेवाचे वडील सोनोपंत नारायण.

काही ठिकाणी निलकंठ सोनदेवाचे वडील हे शिवाजी महाराजांचे डबीर होते, असे सांगितले आहे. पण वस्तुतः हे दोन्ही भिन्न व्यक्ति असल्याचे दिसून येते.

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १- लेखांक ७२२ किंवा राजवाडे खंड १७ ले. १० वर शके १५७९ चैत्र वद्य २ म्हणजे २१ मार्च १६५७ रोजीचा एक महजर आहे. ह्यात ‘सोनाजी विश्वनाथ डबीर’ असा स्पष्ट उल्लेख येतो. रामचंद्रपंत अमात्यांची वंशावळ राजवाडे खंड ८ ले. ३७ वर आलेली आहे. त्यानुसार त्यांच्या वंशात विश्वनाथ नावाची व्यक्ति नाही. त्यांच्या वंशातील सोनोपंताचे नाव सोनाजी नारायण असे होते. निळो सोनदेवास १६६० साली मुजुमदारी दिल्याचा उल्लेख राजवाडे खंड ८ ले.१० मध्ये येतो. याशिवाय कोल्हापूरकर शिवाजी छत्रपतींनी मार्च १७०४ साली रामचंद्रपंतास दिलेल्या इनामपत्रात त्यात छत्रपती म्हणतात, “तुम्ही स्वामीसंनिध  विनंती केली की आपण स्वामीचे पुरातन सेवक वडील वडिलांपासून सेवा निष्ठेने करीत आलो….” यातच पुढे छत्रपतींनी रामचंद्रपंताच्या घराण्याचा इतिहास थोडक्यात सांगितलेला आहे. त्यात ते सोनाजीपंताचा उल्लेख न करता थेट निळो सोनदेवाचा उल्लेख करतात. पुढे ते म्हणतात की, “राजश्री स्वामी (शिवाजी महाराज) तुम्हावरी संतोषी होऊन मजमूचा हुदा पहिले तुमचे बाप निलो सोनदेउ यास सांगितला होता तो तुम्हास सांगोन तुम्हावरी कृपा दिवसे दिवस केली..” हा वेगळा विषय आहे. असो.

आता सोनोपंत नावाची जी व्यक्ति शिवछत्रपतींच्या कार्यात त्यांची सहकारी होती, त्याच्याबद्दल विचार करत करूया. हा सोनोपंत म्हणजे सोनाजी विश्वनाथ होय. शहाजीराजांना आदिलशहाने कैद केली आणि पुढे शिवाजीराजांनी  घेतलेला सिंहगड परत करण्याच्या अटीवर त्यांची सुटका केली. सिंहगड परत देण्याची अट आपल्या तीर्थरूपांनी मान्य केल्याचा शिवाजी राजांना राग आल्यावर वडिलकीच्या नात्याने शिवाजीराजांची ह्याच सोनोपंताने समजूत  घातली. शिवभारतकार त्याला ‘अग्रजन्मा’ म्हणतो. शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात त्याने केलेले भाष्य अत्यंत मार्मिक आहे. त्याचे भाष्य पुढील आयुष्यात शिवाजीराजांनी आचरणात आणलेले दिसते.  ह्या सोनोपंतास शिवाजीराजांनी औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठविले होते. पौष वद्य ३०, शके १५८६ (ता. ६-१-१६६५) रोजी सूर्यग्रहणाला जिजाबाईंसोबत शिवाजीराजांनी ह्या सोनोपंताची सुवर्णतुला केली, असं जेधे शकावली सांगते. पुढे लवकरच तो मरण पावला. त्याचा पुत्र त्रिंबकपंत शिवाजीराजांसोबत आगऱ्यास गेला. त्यातून ३ एप्रिल १६६७ रोजी त्याची सुटका झाली. पुढे राज्याभिषेकाच्यावेळी त्रिंबकपंताच्या पुत्रास, रामचंद्र त्रिंबकास सुमंत (डबीर) पद दिले.

यावरून, सोनाजी नारायण => निळो सोनदेव => १.नारो निळकंठ २. रामचंद्र निळकंठ अशी रामचंद्रपंत अमात्याची वंशावळ असून सोनाजी विश्वनाथ => त्रिंबक सोनाजी => रामचंद्र त्रिंबक अशी डबीर घराण्याची वंशावळ आहे. यावरून दोन्ही सोनोपंतांच्या भिन्नतेचा निष्कर्ष निघतो.

©अनिकेत वाणी

Leave a Comment