संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज समाधी (सासवड) –
संत सोपानदेवांचे मंदिर सासवड गावाच्या एका बाजूस ‘चांबळी ‘ नदीच्या तीरावर आहे . मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या समोरील पटांगणात आपण उत्तरेकडून प्रवेश करतो . मंदिरासमोरील या विस्तीर्ण पटांगणात यात्रा सोडून अन्य कालावधीत गाड्या पार्क करता येतात . पटांगणात मध्ये असलेल्या चिंचेच्या पारावर फुले व प्रसादाचे दुकान आहे . मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूने दगडी बांधकाम करून विस्तृत चौथरा बनवला आहे . यावर जाण्यास दोन बाजूने जुन्या पध्दतीच्या उंच पायऱ्या असून आता आरामशीर असा लोखंडी जिना सुध्दा केला आहे. पायऱ्या चढून महाद्वारात आलो कि पुन्हा समोर काही पायऱ्या चढून आल्यावर नागेश्वर मंदिर दिसते . हे नागेश्वर मंदिर संत सोपान देवांच्या आधीचे असून या मंदिराच्या मागच्या बाजूस संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज समाधी. मंदिराच्या बाजूने पुढे आल्यावर तुळशी वृंदावन लागते . इथून पुढे आल्यावर उजव्या हाताला मुख्य सभामंडप आहे . या मंडपात मध्यभागी भव्य अशी वीर मारुतीची मूर्ती आहे .
या सभामंडपाच्या पुढेच दगडी मंडप आहे . याच मंडपात रोजचे प्रवचन व विशेष दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात . इथेच विणेकरी वीणा घेवून उभे असतात . यालाच पहारा असे म्हणतात . दगडी मंडपातून आत गेल्यावर डावीकडे राम लक्ष्मण व उजवीकडे विठ्ठल रखुमाई आहेत . या मंडपातून दोन्ही देवांच्या मधून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो . गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे . काळ्या पाषाणातील समाधी चार पायऱ्यांची आहे . गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर समोरच दत्त मंदिर आहे . गाभाऱ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा सभा मंडपात येताना उजव्या हाताला चिंचेच्या झाडाखालील पादुका लागतात . सोपानदेवांनी ज्या गुहेत समाधी घेतली त्या गुहेचे हे प्रवेशद्वार होते . नंतर हा रस्ता बुजवून त्यावर पादुकांची स्थापना करण्यात आली .
संत सोपानदेव हे ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. सोपानदेवांना वारकरी संप्रदायात सोपानकाका असे संबोधले जाते. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई ही चारही भावंडे महाराष्ट्राला संत म्हणून परिचित आहेत. या चारही भावंडांचा जन्म आळंदी येथे झाला. निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई या तीनही भावंडांचे कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्यास पूरक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यावर एक महिन्याने संत सोपानकाकांनी सासवड येथे समाधी घेतली (इ.स. १२९७).
संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली . यानिमित्ताने सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो.
पुणे- सासवड अंतर अंदाजे ३० कि.मी.
माहिती साभार : आंतरजाल