सोयराबाई राणीसाहेब –
सोयराबाई राणीसाहेब या शिवरायांच्या तृतीय पत्नी असून त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. शिवपूर्वकाळात मोहिते घराणे म्हणजे आदिलशहाच्या दरबारात एक मानकरी म्हणून प्रसिद्ध होते. शिवछत्रपतींच्या भोसले घराण्या बरोबर हे घराने दक्षिणेत उदयास आले. हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते हे अहमदनगरच्या निजामशाहीत लष्करी सेवा बजावत होते .इसवी सन १५८४ साली निजामशाहीत उद्भभवलेली बंडाळी मोहिते यांनी मोडून काढली म्हणून त्यांना निजामशहाने ” बाजी “हा किताब बहाल करून त्यांचा मोठा सन्मान केला. तेव्हापासून त्यांचे वंशज स्वतःला ‘बाजी मोहिते ‘ म्हणवून घेऊ लागले.रतोजी यांचे पुत्र तुकोजी मोहिते यांनी तळबीडची पाटीलकी हस्तगत केली तेव्हापासून मोहीते मंडळी तळबीडचे रहिवासी बनले.
या रतोजी मोहिते यांचे पुत्र तुकोजी या तुकोजी मोहिते यांना तीन अपत्ये झाली. संभाजी , धारोजी व कन्या तुकाई. यापैकी संभाजींचे लग्न घाडगे घराण्यातील मुलीशी ,तर धारोजीं चे लग्न घोरपडे घराण्यातील मुलीशी झाले .घाडगे व घोरपडे हे दोघेही आदिलशाही सरदार होते .त्यांनी आपल्या जावयांना म्हणजे संभाजी व धारोजी यांना आदिलशाही दरबारात १६२२ मध्ये रुजू केले .लवकरच दक्षिणेत एक महत्त्वाची घटना घडली निजामशाही दरबारातील पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले रुसून आदिलशाही दरबाराकडे आले.आदिलशहाने त्यांचा मोठा सन्मान करून त्यांना सरलष्कर ही पदवी व आपल्या वतीने पुणे प्रांताची जहागिर बहाल केली. आदिलशाहीच्या वतीने पुणे प्रांतावर आपला अंमल बसवीत असता निजामशाही सेनानी साबाजी अनंत यांच्याशी शहाजीराजांची सालप्याच्या घाटात लढाई झाली .या लढाईत शहाजी राजांच्या सोबत असणाऱ्या संभाजी व धारोजी या मोहिते बंधूनी मोठे शौर्य गाजवले. स्वाभाविकच राजांची त्यांच्यावर मर्जी बसली .या दोन्ही बंधूंनी सन १६२५साली आपल्या बहिणीचा म्हणजेच तुकाबाईंचा विवाह शहाजीराजांशी घडवून आणला. आणि अशाप्रकारे तळबीडकर मोहिते व भोसले यांचे नाते संबंध जुळून आले..पुढे राजांनी आदिलशहाला खास विनंती करून या दोन्ही बंधूंना १६२६ मध्ये तळबीड व बालाघाटाची देशमुखी मिळवून दिली. संभाजी व धारोजी हे मोठे पराक्रमी सेनानी होते .त्यांच्या पराक्रमाचे वेळोवेळी आदिलशहाने केलेले कौतुक अनेक आदिलशाही फर्मानात पहावयास मिळते. पुढे लवकरच संभाजी मोहित्यांना शहाजीराजांनी सुपे परगण्याचे सर हवालदार म्हणून नेमणूक दिली. पुढे हे संभाजी कर्नाटकात गेलेले दिसून येतात.
हंबीरराव ,सोयराबाई व अनुबाई ही संभाजींना तीन मुले .अनुबाई व्यंकोजीराजांना दिल्या तर सोयराबाई शिवाजी राजांच्या पत्नी झाल्या .सोयराबाईं राणीसाहेब अत्यंत सुस्वरूप व लवकरच पुत्रवती झाल्या. सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर पट्टराणी म्हणून सोयराबाईं राणीसाहेबांना मान मिळाला. अपत्यहीन राज्ञी प्रजाजनांचे पुत्रवत पालन करू शकत नाही असा धर्म संकेत असल्यामुळे किंवा दोन नंबरच्या सगुणाबाई राणी यांचा लवकरच मृत्यू झाला असावा त्यामुळे सोयराबाई राणीसाहेबांना पट्टराणीचा व राज्यभिषेकाचा मान मिळाला असण्याची शक्यता आहे. .सोयराबाईं राणीसाहेबां पासून शिवरायांना दोन अपत्ये झाली .कन्या दीपाबाई ऊर्फ बाळी बाई व पुत्र छत्रपती राजाराम महाराज .
शिवाजी महाराजांच्या परिवारात राणी सोयराबाईंचे स्थान वादग्रस्त ठरले. राज्याभिषेकाच्या प्रसंगी सोयराबाईं राणीसाहेबांना पट्टराणीचा मान मिळाल्यामुळे राज परिवारातील त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागली. ,त्यातच राज्याभिषेका नंतर काही दिवसांनी राजमाता जिजाऊंचा स्वर्गवास घडून आल्याने राज परिवारातील सुनांवरील नैतिक दबाव नाहीसा झाला होता .अशा परिस्थितीत आपल्या पुत्रास राज्य मिळावे ही सोयराबाईं राणीसाहेब यांची सुप्त महत्वकांक्षा वाढीस लागल्यास नवल नव्हते .त्यातच युवराज संभाजीराजांपासून दुरावलेले अष्टप्रधान सोयराबाईं राणीसाहेबांना येऊन मिळाले. लवकरच त्यांनी सोयराबाई राणीसाहेबांना पुढे करून राजधानीत युवराज संभाजी राजांच्या विरुद्ध एक राजकीय गट तयार केला. राजकारणात तरबेज असलेल्या अष्ट प्रधानांच्या डावपेचांच्या जाळ्यात सोयराबाई राणीसाहेब अडकत गेल्या. राज्यव्यवहार ,राजनीति इत्यादींचा अनुभव नसल्यामुळे सोयराबाई राणीसाहेब दिवसेंदिवस या मंडळींच्या जाळ्यात गुंतत व फसत गेल्या. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे महत्व ओळखून त्यांना त्यामध्ये साथ देणे हे त्यांच्यासारख्या विचाराने व अनुभवाने अपरिपक्व असणाऱ्या सोयराबाई रााणीसाहेबांच्या आवाक्याबाहेरची ती गोष्ट होती .त्यामुळे इतिहासात सोयराबाईं राणीसाहेबांचे स्थान वादग्रस्त ठरले .
२७ आॅगस्ट १६८० रोजी एका गोसाव्याला छत्रपती संभाजीराजांनी दानपत्र दिले .त्यात त्यांनी वापरलेले हे वाक्य आहे ,की सोयराबाई माँसाहेब या स्पटिकासमान निर्मळ आहेत. सोयराबाई राणीसाहेब या शिवछत्रपतींच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, त्यांनी महाराजांवर विषप्रयोग केला अशी अफवा `पुराव्यानिशी ʼसादर करतो, म्हणून खोटेच पसरवणाऱ्या इतिहास कारांसाठी ही एक चपराक आहे. सोयराबाई राणीसरकारांना संभाजी महाराज आईसमान मानत, त्यांचा त्याच पद्धतीने मान-मरातब होता. आणि त्यांचा मृत्यूही नैसर्गिकरित्या झालेला आहे .शेवटी त्या महाराणी होत्या. भोसले कुळाच्या त्या सून व शोर्यशाली परंपरा असणार्या मोहिते घराण्यातील त्या कन्या होत्या. त्या अशा वागतील हे असंभवनीय आहे.
खरे तर भोसले घराण्यातील प्रत्येक पुरूषांना मोहिते घराण्यातील मुलगी केली आहे.
१) शहाजीराजे भोसले- तुकाबाई राणीसाहेब
२) व्यंकोजीराजे- अण्णुबाई राणीसाहेब
३) छत्रपती शिवाजी महाराज- सोयराबाई राणीसाहेब
४ छत्रपती राजाराम महाराज – महाराणी ताराराणी
५) शाहू महाराज यांच्या पत्नी सगुनाबाई राणीसाहेब.
६) रामराजे यांच्याही पत्नी मोहिते घराण्यातील होत्या
या सर्वांच्या पत्नी मोहिते घराण्यातील होत्या. सोयराबाई खरेच एवढ्या वाईट असत्या तर छत्रपती घराण्यांनी पुढे या घराण्यातील मुलींशी लग्न व्यवहार केलेच नसते. सोयराबाई राणीसाहेब यांचा मृत्यू २७ आॅक्टोबर १६८१ रोजी रायगडावर झाला.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे