वेदभवन सोसायटी चा श्री वेदपद्मसिद्धिविनायक !
पुणे-पौड रस्त्यावर चांदणी चौकाच्या अलीकडे वेदभवन सोसायटी आहे. इथे दिवाळीत होणा-या दिपोत्सवामुळे ती अनेकांना परिचित असेल. या सोसायटीत विराजमान झाला आहे श्री सिद्धिविनायक ! सोसायटीच्या मुख्य दरवाज्यातून मंदिराच्या दिशेने जाण्यापूर्वी बाहेर आपल्याला दोन दगडी दिपमाळा दिसतात. थोडं आत गेलं की उजवीकडे मंदिराचे प्रांगण आहे. मंदिराचा कळस मराठा वास्तुशैलीची आठवण करून देतो. शिखराला उपशिखरं असुन त्यावर गणेशाची विविध रूपे चित्तारली आहेत.(श्री वेदपद्मसिद्धिविनायक)
चीन किंवा जपानमधील मंदिरांची आठवण होईल असे काहिसे मंदिराचे छत आहे. प्रवेशद्वारातुन आत शिरलं की डावीकडे श्री गणेश विराजमान झाले आहेत. गणेशमूर्ती संगमरवरी असुन ती उजव्या सोंडेची आहे. गणेशाच्या शेजारी त्याच्या पत्नी ऋद्धी आणि सिद्धी उभ्या आहेत. आपण या रेखीव आणि प्रसन्न मुर्ती डोळ्यात साठवत प्रदक्षिणा मारतो.
प्रदक्षिणा मार्गावर आष्टविनायकांच्या छोट्या छोट्या मुर्ती स्थापित केल्या आहेत. मंदिराचा प्राकारही अष्टकोनी आहे. या सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करवीर पिठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या उपस्थितीत आणि वेदमूर्ती मोरेश्वर घैसास यांच्या हस्ते दि. २० एप्रिल १९९८ रोजी पार पडला.
मंदिरातील सर्व मूर्तींचा खर्च मुंबईचे श्री. हर्षवर्धन बांदिवडेकर यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ केला. यानंतर मंदिराचे उद्धाटन दोनच दिवसांनी म्हणजे दि. २२ एप्रिल १९९८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पार पडला. श्री. प्र. द. भणगे हे या मंदिराचे वास्तुरचनाकार आहेत.
© वारस प्रसारक मंडळी.