महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,778

श्रीशिवराजाभिषेक दिन

Views: 1603
6 Min Read

श्रीशिवराजाभिषेक दिन –

महाराष्ट्राच्या इतिहासात शके १५९६ आनंद संवत्सर जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला (६ जून १६७४) एक महान क्रांतिकारी घटना घडली. या दिवशी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक सोहळा घडून आला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवा राजवंश स्थापन केला. एका नव्या युगाचा आरंभ या घटनेने प्रत्यक्षात आला. भारतात एका नव्या शककर्त्याचा उदय झाला. स्वराज्याची नवी नाणी प्रचारात आली. राजाभिषेक शकाच्या रूपाने एक नवी कालगणना सुरू झाली.(श्रीशिवराजाभिषेक दिन)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात, किंबहुना मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शिवराजाभिषेक ही एक अपूर्व घटना होती. अनेक दृष्टींनी विचार करता हा काळ शिवाजीराजांच्या राजाभिषेकास सर्वथा योग्य काळ होता, असे म्हणावे लागेल. वडील शहाजीराजे मरण पावले होते, जुन्या जहागीरदारीचे बंधन तुटले होते. मुसलमानी बादशाह्यांस लढत देता येईल इतपत सामर्थ्य निर्माण झाले होते. तसेच मोगलांशी सुरूवातीला नरमाईचे धोरण स्वीकारलेल्या शिवरायांनी १६७० च्या वणी-दिंडोरी आणि १६७२ च्या साल्हेर युद्धात मोगलांशी उघड मैदानात सामना देऊन आपले लष्करी सामर्थ्य दाखविले होते.

शिवछत्रपतींचा राजाभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा प्रवाह बदलणारा ठरला. या घटनेपासून महाराष्ट्राच्या, समस्त मराठी जणांच्या शौर्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला. दक्षिणेतील मुसलमानी सत्ताधाऱ्यांची सेवाचाकरी करुन मुलुखगिरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मराठ्यांना पराक्रमाचे एक नवे क्षेत्र लाभले. या नव्या क्षेत्राला महाराष्ट्राची अस्मिता प्राप्त झाली होती. स्वराज्य संपादन्याची त्यामागे प्रखर भावना होती. इस्लामी सत्ताधाऱ्यांची सत्ता नष्ट करण्याची जाणीव होती आणि त्याचबरोबर मराठ्यांचे राज्य निर्माण करण्याची ईर्षाही होती. आणि या मऱ्हाट राज्याचे संवर्धन, संगोपन, संरक्षण जिवाभावाने करणे हे आपल्या जीविताचे परमश्रेष्ठ कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या तरुण पिढीचा एक प्रचंड सेनासागर या सर्व भावनांनी वाढत होता, पराक्रम गाजवत होता. त्याच्या पराक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या घटनेने नवी दिशा प्राप्त झाली‌‌.

महाराष्ट्राचा शेवटचा भूप्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत कमी-अधिक प्रमाणात मराठ्यांची ही जिद्द कायम राहिली. आणि त्यानंतरच्या काळातही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाची स्मृती मराठ्यांच्या मनात सातत्याने कायम राहिली. राजाभिषेक आणि या नव्या पिढीच्या पराक्रमाची प्रतिष्ठा वाढवली आणि याच पिढीत पुढील कित्येक वर्षे स्वामिनिष्ठ राहून झुंझत राहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठे पराक्रम गाजविले होते. आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्यावर महाराजांचा प्रभाव वाढला होता. पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या पाश्चात्यांनी महाराज महाराजांच्या मैत्रीची अपेक्षा करावी एवढे महत्व प्राप्त झाले होते. परंतु एवढे सर्व असले तरी ते खऱ्या अर्थाने जोपर्यंत राजे झाले नव्हते तोपर्यंत त्यांच्या प्रतिष्ठेला कमी लेखणारा सरदार, जमीनदार यांचा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात त्या काळी होता. सामान्य‌जनांनाही महाराजांच्या पराक्रमाने दरारा आणि आदर वाटत असला तरी मुसलमानी दरबाराशी संबंधित असलेल्या इतर मराठी सरदारांना पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण सामान्यजनांचे ठळकपणे लक्षात येऊ शकत नव्हते. दक्षिणेतील मुसलमानी राज्यांना अनेकदा महाराजांच्या सामर्थ्यापुढे आणि मुत्सदेगिरी पुढे नमावे लागले होते तरी, ते महाराजांना एखाद्या बंडखोरापेक्षा अधिक मोठे स्थान द्यावयास तयार नसत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक करून घेतल्यानंतर मात्र या परिस्थितीत आणि मनस्थितीत विलक्षण परिवर्तन घडून आल्याचे दिसून येते. यामुळेच “महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना” असे या राजाभिषेकाचे समर्पक वर्णन करावे लागेल. खरेतर महाराष्ट्रात मागील दोन-तीन शतकांत राजाभिषेक झाला नव्हता. देवगिरीचे यादवांचे राज्य मोडून साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला होता. दक्षिणेत विजयनगरचे राज्य तालीकोटच्या लढाईत पराभूत होऊन दुर्बल बनले, ते पुन्हा कधीच विजय होऊ शकले नाही. आणि दक्षिणेत आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलाई यांच्या हाती सत्ता गेली होती. अशा अत्यंत प्रतिकूल काळात महाराष्ट्रात एक नवे राज्ये उदयास आले आणि एक नवा राजा, अभिषिक्त सम्राट उदयास आला. त्याने पुढच्या पिढ्यांना कर्तृत्वाची, स्वराज्यप्रेमाची प्रेरणा दिली.

कृष्णाजी अनंत सभासदाने आपल्या बखरीत या अलौकिक घटनेचे अगदी समर्पक वर्णन केले आहे, सभासद लिहितो,

“या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच्छ पातशहा, या सर्व म्लेंच्छ पातशाहीमध्ये एक मऱ्हाठा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य जाली नाही”

त्याचप्रमाणे रामचंद्रपंत अमात्यांनी यथायोग्य विश्लेषण केले आहे, अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात,

“शहान्नवकुळीचे मराठ्यांचा उद्धार केला, सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले, धर्मोद्धार करून देव-ब्राम्हण संस्थानी स्थापून यंजन याजनादि षटकर्मे वर्णविभागे चालविली. तस्करादि अन्यायांचे नाव राज्यांत नाहिसे केले. देशदुर्गादि सैन्याचे बंध नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिखा महाशत्रु स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंत विख्यात किर्ती संपादिली!! ते हे राज्य!!”

याचबरोबर तत्कालीन इंग्रज अधिकारी ऑंक्झिंडेन याच्या नोंदीत आणि गागाभट्टकृत ‘शिवराजाभिषेक प्रयोग’ या ग्रंथात या अलौकिक सोहळ्याचे वर्णन आले आहे.

राजाभिषेकासमयी गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या प्रशस्तीत शहाजीराजांच्या वर्णन ‘राजकुलात उदय पावलेला’ व नृपती असे केले आहे. त्या अर्थी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करताना ते राजकुलातील म्हणजे क्षत्रिय होते की नाही याची गागाभट्टांस शंका नव्हती असेच म्हणावे लागेल. शिवाय मराठेशाहीच्या उत्तरकाळात अथवा त्यानंतर लिहिलेल्या बखरींत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकसमयी वाद उत्पन्न झाले असे लिहिले आहे, अर्थात ही सर्व साधनं तिसऱ्या दर्जाची म्हणावी लागतील.

– संकेत पगार, #इतिहास_अभ्यासक_मंडळ

संदर्भ – कृष्णाजी अनंत सभासद विरचित सभासद बखर

रामचंद्रपंत अमात्यकृत आज्ञापत्र

(छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या प्रयोगासाठी गागाभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ ‘श्रीशिवराजाभिषेक’ प्रयोग असा होता, तो ‘राज्याभिषेक’ प्रयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना पुर्वी असलेल्या ‘राज्या’वर बसवून अभिषेक झाला नाही. पुर्वी राज्य नव्हतेच, होती ती केवळ जहागीर. छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक मंत्राने राजे झाले. व त्यांच्या ताब्यातील ‘प्रदेश’ राज्य बनला. त्यांच्यामागून राज्यावर आलेल्यांस जो अभिषेक होईल, तो ‘राज्याभिषेक’ होय. सध्या ‘शिवराज्याभिषेक’ हाच शब्द सर्वांच्या नित्य परिचयाचा झाला आहे.श्रीशिवराजाभिषेक दिन)

Leave a Comment