महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,115

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने | कोशबल

By Discover Maharashtra Views: 1346 8 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने | कोशबल –

प्राचीन राजनीतीपर ग्रंथांमध्ये बलाचे ३ प्रकार सांगितले आहेत. मंत्रशक्ती, उत्साहशक्ती आणि प्रभुशक्ती.हीच छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने होती.

मंत्रशक्ती म्हणजे राजा आणि त्याचे प्रधानमंडळ यांचे राजनैतिक नैपुण्य आणि परिस्थिति – काळानुरूप निर्णय घेण्याची शक्ती. उत्साहशक्ती म्हणजे राजा, प्रधानमंडळ आणि त्यांचे सैन्य हे किती पराक्रमी आहेत, त्यांच्या अंगीभूत शौर्य किती आहे, ह्यावर अवलंबून असलेली शक्ती. तर प्रभुशक्ती म्हणजे राजाची आणि राज्याची कोश (खजिना) आणि सैन्य (लश्कर) यांची ताकद. ‘सैन्य पोटावर चालतात’ हे जसे खरे तसेच सैन्य असल्याशिवाय कोशाची वाढ कशी होणार? तेंव्हा कोश आणि सैन्य एकमेकास पूरक असतील तरच राजाचे सामर्थ्य शाबूत राहते. महाभारतात म्हटले आहे की,”कोशबल अनुकूल असेल तरच राजाला सैन्य बाळगता येते. सैन्य पदरी असेल तरच राजा धर्माचे रक्षण करू शकतो. आणि धर्मरक्षण झाले तरच प्रजेचे संरक्षण होते.” (येथील धर्माची व्याख्या जाणकार वाचकांच्या लक्ष्यात आली असेलच. आज काल ‘धर्म’व्याख्या बरीच बदलली आहे याकारणे लिहिले आहे)

छत्रपति शिवरायांकडे यापैकी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती उपलब्ध होती हे सांगणे न लगे. तिसरे बलस्थान जे प्रभुशक्ती (कोश आणि सैन्य) ते राजांनी क्रमाक्रमाने मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून वाढवले. S.W.A.T. अनालिसीस (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) वर आपण जो अभ्यास आत्ता करतोय ना; तो ह्या जाणत्या राजाने ३५० वर्षांपूर्वीच आपल्या समोर मांडलाय की… कधी विचार केलाय आपण ह्या दृष्टीने शिवचरित्राचा???

Strengths म्हणजे त्यांची बलस्थाने अगदीच मोजके होती. सोबत होती ती मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती, मोठ्या प्रमाणावर जवळ होते ते म्हणजे Weaknesses. थोडक्यात कमी सैन्य, रीता असलेला खजिना. आसपास Opportunities खुप होत्या मात्र. त्यावर तर त्यांनी स्वतःचे Strengths वापरले आणि स्वराज्य उभे केले. त्यांच्या भोवती सर्वत्र Threats होतेच की. उजवीकडे किंवा वर सरकले की मुघल. खाली सरकले की आदिलशाही. पश्चिमेला सिद्दी अणि थोडं खाली पोर्तुगीझ. शिवरायांच्या वेळच्या मर्यादा लक्षात घेता कोश-संचय ही एक प्रचंड कठीण बाब होती. उत्पन्नाची साधने सर्व बाजूंनी मर्यादित असताना स्वराष्ट्र रक्षण आणि प्रजारक्षण करणे हे किती कर्मकठीण काम आहे हे लगेच समजुन येतेच. पण येथे त्यांने मंत्रशक्ती वापरून ‘आर्थिक व्यवस्थापन’ केले आहे. एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे प्रजेला अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन राजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवश्यक असलेले कोशबल सुद्धा न्यायमार्गाने उभे केले. राजांनी संपूर्ण कोश-संचय हा न्यायमार्गाने केलेला आहे. आता आपण बघुया त्यावेळी त्यांच्याकडे उत्पन्नाची कुठली-कुठली साधने उपलब्ध होती.

हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे ‘शेती विषयक धोरण’ हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे.पत्रामध्ये राजे म्हणतात,”येक भाजीच्या देठासहि मन नको.” संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना ‘देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें’ असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला ‘कानून जाबता’ लागू होताच.

शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर ‘सिंहासन पट्टी’ बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.

शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता – सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे ‘व्यापार विषयक धोरण’ हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,”बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे.” पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत.

छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेले अजून एक पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजे म्हणतात,”दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे” पुढे राजे म्हणतात,”आम्ही ठरवून दिलेल्या दरातच नारळाची विक्री व्हावी.” दाभोळ येथे नारळ अतिशय स्वस्त विकत असल्या कारणाने, त्याचा परिणाम आजूबाजुच्या कोकण परिसरात नारळाच्या व्यापारावर होऊ लागला, तेंव्हा राजांनी प्रभावळीच्या सुभेदारास सदर पत्र लिहिले होते. स्वराज्यामधल्या बारीक़ व्यापारावर सुद्धा राजांचे किती बारकाईने लक्ष्य होते हे या पत्रावरुन लक्ष्यात येते. ज्याप्रमाणे स्वतःच्या राज्याच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आवश्यक असते तसेच इतर राज्यातील व्यापाराला देखील उत्तेजन देऊन आपल्या राज्यात आणावे लागते. शत्रुपक्षाकडील व्यापारयाच्या नावेस व मालास ‘तसनस’ न करता ते बंदरात न्यावे आणि वरिष्ट अधिकारी यांनी त्यासंबंधी न्याय-निवाडा करावा असे स्पष्ट आदेश तेथील अधिकाऱ्याला होते. कोश-संचयाच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनाऱ्यावरील व्यापार आणि बाहेरील मालावरील आयात कर यावर विशेष भर दिला होता.

याशिवाय काही अनियमित उत्पन्न सुद्धा होते. जसे इतर राजांकडून, त्यांच्या वकीलांकडून येणारे भेटवस्तू, नजराणे आणि पेशकश. शेती आणि व्यापार ही कोश-संचयाची प्रमुख साधने होतीच पण त्या शिवाय अजून एक महत्वाचे साधन होते ते म्हणजे ‘विक्रमार्जीत धन’. शत्रुकडून वसूल केलेली खंडणी आणि युद्धखर्चाची रक्कम म्हणजे विक्रमार्जीत धन. स्वराज्याच्या चहुबाजुस पसरलेल्या शत्रुंवर राजांनी वेळोवेळी मोहिमा काढून अश्याप्रकारे धन प्राप्त केले होते. या मोहिमेचे उद्दिष्ट हे शत्रुचा प्रदेश जिंकणे नसून फ़क्त रिता झालेला खजिना भरून काढणे इतकेच होते.

खजिना लुटून शत्रुस दुर्बल करणे आणि स्वतः बलवान होणे यासाठी अश्या मोहिमा शिवरायांनी वेळोवेळी यशस्वी केल्या. यांमध्ये १६५६ ला उघडलेली कल्याण-भिवंडीची मोहीम, १६६० मधील आदिलशाही वरील स्वारया, १६६४, १६७० मधील सूरत येथील स्वारी, मुघलांच्या बूर्ह़ाणपुर – खानदेश या भागात उघडलेल्या १६७५, १६७७ आणि १६७९ मधील स्वाऱ्या, करंज्यामधली (१६७२), अथणी (१६७५), श्रीरंगपट्टण (१६७७), हुबळी (१६७७) आणि जालना (१६७९) या व अश्या अनेक यशस्वी स्वाऱ्या शामील आहेत. या सर्व मोहिमा कोशवृद्धिचे एक महत्वाचे साधन होते. मात्र या सर्व मोहिमेत शत्रुपक्षाच्या राज्यातील सामान्य जनतेसही तोशीस लावू नये असे स्पष्ट आदेश मराठा सैन्यास होते. प्रभुशक्तिची म्हणजेच कोश (खजिना) आणि सैन्य (लष्कर) यांची ताकद शिवरायांनी क्रमाक्रमाने नियोजन रित्या वाढवली. शत्रुच्या मूलखातून गोळा केलेल्या धनामधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम-दुर्ग उभारले. जे बनले ‘संपूर्ण राज्याचे सार’. त्याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊ.छत्रपती शिवाजी महाराजांची बलस्थाने.

संदर्भ –

सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य),
छत्रपती शिवराय – पत्ररूप व्यक्तीदर्शन – डॉ. रामदास, शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment