सुरसुंदरी –
१८ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. वारसा म्हणजे नक्की काय ? हा शब्द फक्त आर्थिक संपत्ती, मालमत्ता किंवा राजकीय एवढ्यापुरताच मर्यादित नाही. तर आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या प्राचीन वास्तू , उभारलेले गडकोट, जपलेली नैसर्गिक संपदा किंवा केलेले महान कार्य यांचे योग्य रीतीने संवर्धन करून हे पुढच्या पिढीकडे सोपवले जाते तो वारसा. एवढा सरळ अर्थ या शब्दातून अभिप्रेत आहे. परकीय आक्रमाणामूळे झालेली नासधूस आणि स्वकीयांमुळे झालेली दुरावस्था ह्या दोनही गोष्टी याला तितक्याच जबाबदार आहेत. आपल्या महाराष्ट्रातदेखील काही जागतिक दर्जा असलेली व इतर अशी भरपूर वारसास्थळे आहेत.सुरसुंदरी.
लेण्या, मंदिरे, पुरातन वास्तू, गडकोट, नैसर्गिक भूभाग या व इतर काही गोष्टींचा या वारसा स्थळांमध्ये समावेश होतो. हा अमूल्य ठेवा प्रत्येक नागरिकाने जपलाच पाहिजे. त्याचे जतन/संवर्धन झाल्याशिवाय पुढच्या पिढीपर्यंत तो जाणार कसा ? जागतिक वारसा दिनाचे प्रयोजन यासाठीच केले जाते. यात अवघड असे काहीच नाही. या वारसा स्थळांना भेट देताना प्रत्येकाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा न करणे, भिंती विद्रुप न करणे या गोष्टींचे पालन केले तर ही देखील या संवर्धन कार्याला मदतच ठरेल. पुढच्या पिढीला या कार्यात आवड निर्माण करण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन या स्थळांबद्दल अभिमानाने माहिती सांगायला हवी. सांस्कृतिक असो की नैसर्गिक, वारसा आपला आहे आणि तो आपणच जतन केला पाहिजे. त्यासाठीच हा खारीचा वाटा..
प्राचीन काळात शिल्पकला व चित्रकला यांचा उपयोग शब्दविरहित लोक संपर्क (Non Verbal Mass Communication) करण्यासाठीदेखील झाला. त्यासाठी मंदिरे व लेण्यांमध्ये वेगवेगळी शिल्पे व चित्रे दाखवण्यात आली. भारतातील प्राचीन मंदिरांच्या बाह्यांगावर देवदेवता, त्यांची शस्त्रें, साधने, पशु-पक्षी, पाने-फुले अश्या अनेक नक्षीदार मूर्ती कोरण्यात आल्या. त्यापैकीच काही म्हणजे सुरसुंदरी. मंदिरांच्या बाह्य अंगावरील स्त्रीप्रतिमा, अप्सरा, यक्षिणी म्हणजेच सुरसुंदरी. सुर म्हणजे देव त्यांच्यातल्या सुंदरी म्हणजेच सुरसुंदरी होय. त्यायोगे त्या सुंदर, देखण्या, सुडौल, सालंकृत असणे हे तितकंच साहजिक आहे. केवळ मंदिर अथवा वास्तू सुशोभित करणे हेच या मागचे प्रयोजन नाही. तर त्यायोगे मंदिरात येणाऱ्या भक्तांना पुण्य व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा हे देखील प्रयोजन असावे.
खजुराहो, गुजरात, राजस्थान, उडीसा, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू याबरोबरच ही शिल्पे महाराष्ट्रातील मंदिरांच्या बाह्यांगावर आढळतात. मंदिर व मंदिरशास्त्रावरील अनेक ग्रंथांपैकी शिल्पप्रकाश व क्षीरार्णव या ग्रंथांमध्ये मंदिरावरील या सुरसुंदरींचा सविस्तर उल्लेख आढळतो. शिल्पप्रकाशानुसार १६ व क्षीरार्णवानुसार ३२ सुरसुंदरी आहेत. सगळ्याच ठिकाणी असलेल्या मंदिरांवर सर्वच सुरसुंदरी दाखवलेल्या नसतात. प्रत्येक ठिकाणचे शिल्पी (मूर्तिकार), त्यांचे कलाकौशल्य, त्यांची आवड, आवश्यकतेनुसार आणि शैलीप्रमाणे त्यांचा वापर केला जाई. अशाच काही सुरसुंदरींची प्रकाशचित्रे आपण “राऊळांच्या देशा” या मालिकेअंतर्गत पाहुयात.
संदर्भ – सुरसुंदरी – प्रा. गो. बं. देगलूरकर
– शैलेश गायकवाड