सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)
होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील सूर्य नारायण मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते. सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद