सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिर | Suryamukhi Siddhivinayak Temple –
क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे तालमीवरून श्री भवानी माता मंदिराकडे जाताना, २२३ भवानी पेठ, रामोशी गेट येथे चौकात एक पुरातन सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिर आहे. सध्या असलेले मंदिर हे मूळ मंदिर नसून सध्याच्या काळात बांधलेले आहे. पण मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती मात्र पुरातन आहे. ह्या मूर्तीची स्थापना कोणी केली या बाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पण इ.स.१८१० मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना अश्विन वद्य पंचमीला पुत्ररत्न झाले. त्या निमित्त त्यांनी पुण्यातील लहान-थोर सर्वच मंदिरांना नारळ, विडा आणि दक्षिणा दिली होती. त्या यादीत या मंदिराची ‘ गणपती चावडीनजीक पिंपळाचे पाराजवळ देवळीत आहे.’ अशी नोंद केलेली आहे. तसेच गणपतीपुढे अर्धा रुपया ठेवल्याची नोंद आहे.
भवानी पेठेतील व्यापार्यांचे आणि पेठेचे रक्षण करण्यासाठी पूर्वी या परिसरात गस्तीची चावडी होती. त्या चावडीवर रामोशी लोकांची नेमणूक केलेली होती, म्हणून त्या परिसराला रामोशी चावडी परिसर म्हणत. कालौघात त्याचे नाव रामोशी गेट असे झाले. मंदिरामध्ये असलेली गणपतीची मूर्ती शेंदुराचर्चीत असून चतुर्भुज आहे. गणपतीला अंगचाच मुकुट आहे.
संदर्भ: हरवलेलं पुणे – डॉ. अविनाश सोवनी
पत्ता : https://maps.app.goo.gl/yEhhtXQ5PFLPL1SY7
आठवणी इतिहासाच्या