सुर्यमूर्ती, अमृतेश्वर मंदिर, पुणे –
मानव जीवनाचे मूळ, प्रकाश आणि बल यांचे प्रतीक म्हणून अनेक प्राचीन वसाहती आणि संस्कृतींनी सूर्याला मानाचे स्थान दिले आहे. संपूर्ण आकाशाची गगनयात्रा करणाऱ्या सूर्याची अनेक रूपे व प्रतीके आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातील अमृतेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यातील ही सुर्यमूर्ती आहे. सात घोड्यांचा रथ, त्यावर दोन हात ध्यान मुद्रेत तर मागच्या दोन्ही हातात कमळ घेतलेल्या अवस्थेत पद्मासनात बसलेली सुर्यमूर्ती, सूर्याचे तेज दाखवणारी प्रभावळ, डोईवर छत्र, समोर रथ हाकणारा अरुण हा सारथी, तर दोन्ही बाजूला चामर घेतलेले पुरुष सेवक अशी ही उठावदार सुर्यप्रतिमा एका पिठावर कोरलेली आहे.
सूर्याच्या रथाला एकच चाक असावे असे मानले जाते, बहुतांश प्रतिमात चाक मात्र दिसत नाही, इथेही चाकासारखी वस्तू मधोमध असली तरी चाक दिसत नाही. सुरवातीच्या काळात सूर्य रथ हा चार घोड्यांचा दाखवला जात असे, पुढे तो सहा किंवा सात घोड्यांचा झाला. उच्चश्रवा नावाच्या सात मुखी घोड्याची कल्पना ही सुर्यमूर्तीच्या बाबतीत पाहायला मिळते.
सुर्यमुर्ती मुकुटधारी असून, गळ्यात मण्यांची माळ आहे, सूर्याला “दिनमणी” म्हणतात, सूर्य प्रतिकांमध्ये सूर्यकांतमणी हे बहुमुल्य पाषाण आहेत. सूर्याचा मण्यांशी जवळचा संबंध दाखवण्यासाठीच गळ्यात मणी ओवलेला कंठा दिसतो. कमळ हे सूर्याचे दुसरे महत्वाचे प्रतीक, सूर्याचा कमळाशी असलेला नैसर्गिक संबंध पाहता त्यामुळेच सुर्यमुर्तीत कमळाला विशेष स्थान मिळाले असावे.कमळ हे सूर्याचे दुसरे महत्वाचे प्रतीक, सूर्याचा कमळाशी असलेला नैसर्गिक संबंध पाहता त्यामुळेच सुर्यमुर्तीत कमळाला विशेष स्थान मिळाले असावे.
श्रद्धा हांडे