महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,771

सुर्यराव काकडे | शिवरायांचे शिलेदार

By Discover Maharashtra Views: 5746 3 Min Read

शिवरायांचे शिलेदार – सुर्यराव काकडे

छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र : सुर्यराव काकडे…

सुर्यराव काकडे हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवरायांनी ‘सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.’ असा मोर्‍याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला, नि म्हणाला,’ काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे ‘तेव्हा पातशहाने ‘शिवराय जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.

मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे’अशी पत्रे पाठविली.

त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो ”चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडालाकी,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.

या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे,आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले. ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवरायांसच दिधली असे वाटते.

आता शिवराय अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवरायांची चिंता जीवी सोसवत नाही.’असे बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

 
खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment