मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेला किल्ला –
(सुवर्णदुर्ग)
एकेकाळी मराठा साम्राज्याचा देदीप्यमान सुवर्णकाळ अनुभवलेला व जवळपास शंभर वर्षे अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ असलेले हर्णे बंदर हे व्यापारी दृष्टीने एक महत्त्वाचे बंदर आहे पण सुवर्णदुर्ग मुळे त्याचे ऐतिहासिक महत्वही वाढले. हर्णे बंदरापासून जेमतेम २५० मी. समुद्रात असलेला हा किल्ला.
सुवर्णदुर्ग हा किल्ला शिलाहार राजाने बांधला पुढे तो आदिलशाहीत आला. इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो दुसऱ्या अली आदिलशहा कडून जिंकून घेतला आणि किल्ल्याचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू झाला. आदिलशाही मध्ये किल्ल्याच्या तटबंदीचे अर्धेच काम झाले होते. पुढे छत्रपतींनी त्यावर बुलंद अशी तटबंदी निर्माण करून भव्यता काय असते हे आपल्याला दिसून येते. या किल्ल्याची डागडुजी पुढे १६६९ पर्यंत चालूच होती. खडक फोडून तटाची निर्मिती हेच या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. खडकाला समांतर असलेले तट यामुळे शत्रू बरेचदा चकवा खात, पुढे झुडपात लपलेला गोमुखी धाटणीचा महादरवाजा आणि त्याच्या उजव्या बाजूच्या बुरुजाला असलेले मारुतीचे शिल्प बघता क्षणीच नजरेत भरते.
तर सुवर्णदुर्ग किल्ल्याचा मुख्य इतिहास सुरू होतो ते राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीपासून तेव्हा किल्लेदार अचलोजी मोहितें हे होते. त्यावेळेस मुघलांचे अधिपत्य असणारा जंजिऱ्याचा सिद्दी कासम याने गडाला वेढा घातला आणि किल्ल्याची बाहेरून येणारी रसद बंद झाली. किल्लेदाराचे मनोधैर्य यामुळे खचत चालले होते तेव्हा तो शत्रूला फितूर झाला. ही गोष्ट त्यावेळी किल्ल्यामध्ये असणाऱ्या सैन्यातील कान्होजी आंग्रे या वीस वर्षीय तरुणास समजली. व किल्ला काहीही करून शत्रूच्या हाती लागू न देणे हे कान्होजींनी ठरवले. तेव्हा त्यांनी रात्रीतूनच काही सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगून त्यांना एकत्र केले आणि किल्लेदाराविरोधात उठाव करून किल्लेदार अचलोजीस कैद केले. आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन किनाऱ्यावरील गनिमांना धूळ चारण्यासाठी त्यांनी किनारा गाठला पण शत्रुसैन्याचा अंदाज न आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
पण मोठ्या शिताफीने ते तिथून निसटले आणि पोहत पोहत त्यांनी किल्ला गाठला. ते परत आलेले पाहून किल्ल्यामध्ये असणाऱ्या मावळ्यांमध्ये हुरूप आला त्यांनी जिद्दीने लढायचे ठरवले.
त्यांनी मोठ्या चिवटपणे लढा देऊन सिद्दी आणि त्याच्या सैन्याला समुद्रातून जंजिऱ्याकडे पळण्यास भाग पाडले. हा पराक्रम थोर होता. एक मोठा हल्ला परतवून लावण्यास कान्होजी आंग्रे यशस्वी झाले. व इथून पुढेच त्यांच्या देदीप्यमान पराक्रमाची सुरुवात झाली, तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवणारा हा सुवर्णदुर्ग.
पुढे आंग्रेंना छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडून सुभेदारी मिळाली. व पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तर ते आरमार प्रमुखच बनले आणि त्यांना समुद्राचा राजा म्हणूनच ओळखले जाऊ लागले. त्यांनी विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन किल्ल्यांवर छावण्या टाकल्या होत्या. दूरदृष्टी असलेल्या आंग्रेंनी सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये जहाज बनवण्याचा कारखानाही चालू केला होता. एवढे महत्व या किल्ल्याला प्राप्त झाले होते. कान्होजींनी फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी यांच्यावर वचक निर्माण केला होता.
१७३१ पर्यंत किल्ल्यावर एकही लढाई झाल्याचा उल्लेख आढळून येत नाही. पण पुढे पेशवे व तुळाजी आंग्रे ह्यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला व सूवर्णदूर्ग जिंकून घेतला.
१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला आणि मराठ्यांच्या सुवर्णवैभवाला तडा गेला.
एकेकाळी सुवर्णतेजात झळाळून निघणारा, सरखेल कान्होजी आंग्रेंची बुलंद अशी अशी कारकीर्द अनुभवलेला, मराठा आरमाराचा एक प्रमुख किल्ला सुवर्णदुर्ग सध्या गाजरगवताने पूर्ण दुर्लक्षित झालेल्या या ऐतिहासिक वास्तू कडे सरकारचे आणि पुरातत्व खात्याने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे.
आणि अजून एक गोष्ट मी जी प्रत्येक वेळेस सांगतो ती म्हणजे बहुतेकांना जंजिरा आणि सिंधुदुर्ग सोडून इतर जलदुर्गांची जास्त माहिती नसल्याने कोणी इकडे फिरकतही नाही. म्हणूनच हे जे अज्ञात किल्ले आहेत त्यांचा इतिहास समोर आणणे हे मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहे.