महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,720

स्वराज्याचा पाळणा

By Discover Maharashtra Views: 3865 4 Min Read

स्वराज्याचा पाळणा

स्वराज्याचा पाळणा – महाराष्ट्रासारख्या पावन भुमीवर जिथे संताच्या अमृत वाणीचे स्वर चहुदिशी घुमत असे तिथे आता पादशाहींचे वादळ उठू लागले होते. गनिमांच्या कुटनितींचे नभ महाराष्ट्रात नांदु लागले. सर्वत्र क्रुरतेचा अंधार पडला. रयतेला आता आशेची किरणे सुद्धा दिसत नव्हती. पाचही पादशाहींच्या घोड्यांच्या टापांनी महाराष्ट्र भुमीवर अत्याचाराचे ठसे उमटवले होते. जुलमी अत्याचारांची धुळ आसमंतात इतकी उंचावली कि दिवसाचा सुर्यप्रकाश सुद्धा दिसेनासा झाला होता. महाराष्ट्रभुमी अन्यायाने घायाळ झाली होती जणु काही ती सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाकडे स्वरक्षणासाठी गाऱ्हाणे घालत होती.

महाराष्ट्रभुमीच्या अंगावरील वस्त्रे दिवसाढवळ्या गनिम खेचत असे हे पाहुन आपल्याला कोणी वाली आहे कि नाही या चिंतेत मायभुमी पडली. मुसलमानी सरदार गरीब रयतेच्या रक्तानेच आपली तहान भागवत असे. ब्रम्हदेवाने चिंता जाणली. रयतेचे होणारे हाल आता देवांच्या नजरेत सुद्धा सहन होत नव्हते. अखेर ब्रम्हदेवाने वरदान दिला आणि म्हणाले “महाराष्ट्रभुमी, तुला आता चिंतीत होण्याचे कारण नाही. तुझ्यासह संपुर्ण भारतवर्षाला सुखावणारा युगपुरूष या भुमीवर अवतार घेणार आहे”. ब्रम्हदेवाने केलेली हि आकाशवानी ऐकुन संपुर्ण महाराष्ट्रात एकच वादळ घुमू लागले. आनंदाने पक्षी सैरावैरा फिरु लागले. समुद्राच्या लाटा उंच उफाळु लागल्या.

इथे किल्ले शिवनेरीवर आऊसाहेब वेदनांच्या जाळ्यात अडकल्या होत्या. वाड्यात खबर आली, आऊसाहेबांच्या पोटात दुखू लागले. उपस्थित मंडळींनी वैद्यबुवांना बोलावून घेतले. त्यावेळेस दुष्काळाचे सावट जुन्नरवर दिसू लागले होते. वैद्यबुवांनी प्रसुतीचा अंदाज लावला. सर्वजण बाहेर वाट बघू लागले. त्यावेळी वेळ सुद्धा अगदी मुंगीच्या पावलांनी निघत होती. प्रहरांवर प्रहर उलटत होते. संध्याकाळ झाली. सूर्यनारायण सुद्धा आता निघून गेले. वाड्यातून अजून काहीच खबर येत नव्हती त्यामुळे सर्व चिंतेत होते. दासींची धावपळ चालू होती. शिवाई आईची पुजा आणि अभिषेक चालू झाला. बाहेर असलेल्या मंडळींची सदरेवर सतत ये जा चालू होती. अशा परिस्थितीत आऊसाहेबांसोबत शहाजीराजे देखील उपस्थित नव्हते.वाड्यामध्ये असलेली दासी धावून आली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक असा आनंद दिसून येत होता. ती म्हणाली – “सरकार, मुलगा झाला !

तिथे उपस्थित असलेले आणि ज्योतिष्यग्रंथात पारंगत असे ज्योतिष बाळाला भेटायला गेले. बाळावरून सुवर्ण मोहरा ओवाळण्यात आल्या. ज्योतिष्यांना पाहून आऊसाहेबांनी नमस्कार केला आणि दु:खी झालेल्या आऊसाहेब म्हणाल्या, “माझ्या बाळाचे काही भाकीत असेल ते स्पष्ट सांगावे. पोराच्या वेळी दिवस गेले आणि तेव्हापासून काहीच शुभ ऐकायला किंवा पाहायला मिळाले नाही. गाढवाने नांगर फिरवले गेले, रक्ताची नाती सुद्धा वैरी बनली, पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत, साऱ्या मुलुखात वाईट दशा झाली आहे आणि आता माझ्या पोराच्या पायगुणाने अजून काही पाहायला मिळणार आहे का?

ज्योतिष्यबाबा म्हणाले, माँसाहेब काही काळजी करण्याचे कारण नाही. परकीय आक्रमणे आता संपुष्टात येतील. आपल्या सर्वांचे भाग्य उजाडलं तुमच्या पोटी साक्षात सूर्य जन्मी आला आहे. शिवाई आईची कृपा समजून आऊसाहेबांनी त्या बाळाचे नाव “शिवाजी” ठेवले. ज्योतिष्यांनी केलेले हे महाराजांबद्दलचे भाकीत खरे ठरले. परकीय मुलुखात स्वातंत्र्य सूर्य उदयास आला. याच ज्वलंत सूर्याने पाचही पादशाही आपल्या पायदळी तुडवल्या. गरीब आणि अत्याचारांनी त्रस्त झालेल्या रयतेला सुखी केले. ज्या भूमीत गाढवाने नांगर ओढले होते तेथे सोन्याचे नांगर फिरवण्यात आले.

शत्रूच्या छावणीत अगदी गुलामांसारखी वागणूक मिळणाऱ्या स्त्रियांना सन्मानाने जगायला शिकवले. शिवनेरी येथे आल्यानंतर अंगावर शहारा आणि डोळ्यांत आसवे येतात. क्षणभर मनात विचार येतो कि, हिच ती जागा जिथे महाराजांच्या चिमुकल्या पायांचा स्पर्श झाला. बोबडे शब्द उच्चारणारे ते बाल शिवाजी कधी काळी औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रुला तोंडावर पाडतील याचा कोणी विचार देखील केला नसेल. हे स्थान म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड भारताच्या इतिहासाचे उगमस्थान आहे.

माहिती साभार – मयुर खोपेकर

Leave a Comment