स्वराज्याचे गुप्तहेर –
स्वराज्याचे गुप्तहेर म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. कोणत्याही देशाचा व सैन्याचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे गुप्तहेर खाते. स्वराज्यातील मोहीम यशस्वी करण्यामागे स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे मुख्य योगदान. औरंगजेबाच्या दिल्ली आग्रा मधील बातम्या तसेच विजापूर , कुतुबशाही व इंग्रज , डचांच्या वखारीतील बित्तमबातमी काढून शिवाजी महाराजांपर्यंत पोहचवण्याची जोखमीची जबाबदारी हे गुप्तहेर अगदी लीलया पेलत असत. हेराची एक छोटी चूक देखील किंवा शत्रूस त्याच्यावर आलेला संशय हा त्याच्या व इतर सहकाऱ्यांच्या जीवावर बेतू शकण्याची शक्यता असे. हेर असलेली व्यक्ती अत्यंत धूर्त , चलाख , वेषांतर करण्यात व निरनिराळी सोंगे घेण्यात तसेच वेळप्रसंगी शस्त्र चालविण्यात तरबेज असे. स्वराज्याच्या या गुप्तहेर खात्याविषयी व त्यांच्या योगदानाविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. स्वराज्यात हेरांची संख्या किती होती तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज , सांकेतिक भाषा याबाबतही इतिहास मौन बाळगतो. गुप्तहेरांविषयी उपलब्ध नसलेली माहिती हे गुप्तहेरखात्याचे यशच मानले पाहिजे.
स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या पूर्वायुष्याविषयी विश्वसनीय माहिती आढळून येत नाही. सुरत लुटीच्या वेळेस बहिर्जी नाईक यांचा प्रथम सहभाग दिसून येतो . बहिर्जी नाईक यांच्या अगोदर स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख विश्वासराव नानाजी प्रभू मोसेगावकर असल्याचे दिसून येते. .बहिर्जी नाईकांसोबत, वल्लभदास गुजराती , सुंदरदास प्रभुजी गुजराती ह्या हेरांची नावे आपणास आढळून येतात. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ दरहजारी , पंचहजारी , सरनौबत यांजजवळून वाकनीसीचे कारकून व हरकारे व जासूद ठेवावे . सरनौबताजवळ बहिर्जी जाधव नाईक , मोठा शहाणा , जासुदाचा नाईक केला. तो बहुत हुशार चौकस करून ठेविला “.
विजापूर सरदार अफझलखानाच्या आक्रमणावेळी शिवाजी महाराजांनी आपले हेर खानाच्या सैन्यात नेमले होते शिवभारतात त्याविषयी नोंद येते “ हेररूपी आपली दृष्टी सर्वत्र योजून-फेकून तो शिवाजी परराज्यातील आणि स्वराष्ट्रातील सर्व गोष्टी दक्षतेने पाहत असतो. “ शिवदिग्विजय बखरीतील नोंदीनुसार “ शिवाजीचा एक पाच हजार मावळे लोकांचा नाईक , विश्वासराव नानाजी प्रभू मोसेगावकर हा दरोरोज रात्री फकिराचा वेश घेऊन , अब्ब्दुलाखानाच्या लष्करात भिक्षा मागण्याकरिता जावे . त्याने अब्दुल्खानाचे सर्व विचार वेळोवेळी महाराजांस कळवावे. कारस्थान महाराजांस कळले. ”
शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले असता हेरखात्याने केलेली कामगिरी ही फार मोलाची ठरली. शिवभारतात त्याविषयी नोंद येते “ महाराज प्रवास करीत असताना त्यांस , हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजानींही तत्शणी दाखवली .” “ज्याच्यावर मनुष्यांचा संचार दृष्टीस पडत न्हवता असा हेरांनी आधीच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचे स्वामी राजे शिवाजी आक्रमून गेले.” म्हणजे पन्हाळगडावर निसटताना बाजीप्रभू व बांदल सैनिक यांच्याबरोबरच स्वराज्याच्या हेर खात्याचे योगदान देखील फार मोलाचे आहे. हेरांनी आधीच कोणत्या मार्गाने जायचे आहे व त्या मार्गातील अडचणी आधीच हेरून ठेवल्या होत्या.
शाहिस्तेखानास शास्त केली त्यावेळी देखील स्वराज्याचे गुप्तहेर खात्याची मोलाची कामगिरी होती . मुगल इतिहासकार भीमसेन सक्सेना लिहितो “ शिवाजीने आपल्या हेरांकरवी शाहिस्तेखानाच्या लष्कराच्या बाजाराची आणि वाटांची इतकी बारीकसारीक माहिती काढली कि जणू काय त्याने स्वतःच ती स्थळे अनेकदा आपल्या नजरेखालून घातली. होती .
शाहिस्तेखानास दरोरोज फुले देणारा पुण्यातील माळी हा शिवाजी महाराजांचा हेर असावा ९१ कलमी बखरीतील नोंदीनुसार “ त्याउपर सिवाजीराजे रायगडीहून कुल मावले जमा करून माली पुणेकर तो फुलेवार ( फुलांचे हार ) नित्य शास्ताखानास देत होता. त्याचा मेहुणा राजे यापासी होता. त्याच्या हाते भेद केला. सभासद बखरीत याविषयी नोंद येते “ बातमी खबर शत्रूच्या सैन्यातून आणली की शास्ताखानाची तीन बोटे तुटोन गेली. “ म्हणजे शाहिस्तेखानास अद्दल घडवल्यानंतर देखील हेर तिथे पाळत ठेऊन होते.
सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांनी मुगलांची शहरे लुटण्यासाठी गुप्तहेरांचा वापर केला . गुप्तहेर एखाद्या मोगली शहराची बित्तमबातमी काढून शिवाजी महाराजांना कळवत असत त्यानुसार महाराज योजना आखून पूढील लष्करी कारवाई करत असत. “ पुढे जितकी शहरे मोगलाईत होती ते जागा चार पाच माणसे वेषधारी करून पाळतीस ठेविली. पाळती घेऊन दोघे खबर सांगावयास यावे . दोघांनी तेथे हुशार राहावे . मग लष्कर पाठवून हवेलीया, शहरे मारावी हि तजवीज केली. “
स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक यांनी महाराजांच्या सांगण्यावरून सुरतेची हेरगिरी करून बित्तंबातमी गोळा केली . सुरतेतील गडगंज श्रीमंत व्यापारी व सुरतेच्या शाही रक्षणातील ढिसाळपणा याची माहिती महाराजांना दिली व सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल असेही सांगितले . सभासद नोंदीनुसार “ तो इतक्यात सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला की , “ सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल. “ असे सांगितले. त्याजवरून राजीयानी विचार केला, “ लष्कर चाकरीनफरी , काम मनाजोगे होणार नाही. याजकारिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे .” असा विचार केला . सुरतेची लुट चालू असताना गुप्तहेर मोगलांच्या हालचालीवर नजर ठेऊन होते . भडोचहून मोगली मदत येत असल्याची बातमी आली त्यामुळे महाराजांनी स्वराज्यात परतीचा प्रवास सुरु केला.
शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी दरम्यान गुप्तहेर खात्याची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती. परंतु या विषयी कोणतीही माहिती संदर्भ साधनांत आढळून येत नाही . आग्रा भेटीस खुद्द बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांनसोबत होते याचा उल्लेख येतो . सभासद बखरीनुसार संभाजी राजांना मथुरेत सुरक्षित ठेवले व महाराजांचे पत्र व गुप्तहेर पाठवल्यावर संभाजी महाराजांना स्वराज्यात घेऊन येण्याची आज्ञा केली. “ आपण देशास आपल्या राज्यात जावून पावलो म्हणून तुम्हास पत्र व जासूद पाठवितो “
छत्रपती शिवरायांनी जालनापेठेची सतत ४ दिवस लुट केली त्यात खूप द्रव्य हाती आले. सर्व लुट घेऊन महाराज स्वराज्यात येण्यास निघाले . त्यावेळी मोगली फौजा शिवाजी महाराजांवर चालून आल्या . रणमस्तखान , आसफखान , जाबितखान तसेच अन्य मोगली सरदार ८ -१० हजार फौजेनिशी शिवाजी महाराजांवर चालून आले . यावेळी बहिर्जी नाईक यांनी आडमार्गाने सुरक्षित मोगली फौजांना चकवून पट्टागडावर सुखरूप आणले. सभासद बखरीनुसार “ ते समयी बहिर्जी जासूद याने कबुल केले की “ मोगलांची गाठ न पडता लष्कर घेऊन ठिकाणास जातो . साहेबी फिकीर न करणे . “ तीन रात्री खपोन रात्रंदिवस अवकाश न करिता पावगड येथे लष्कर घेऊन आला. राजे बहिर्जी नायकावर खुशाल झाले. त्याजकडे फाजील होते ते माफ करून आणखीहि बक्षीस दिले.
स्वराज्यात होणाऱ्या लष्करी मोहिमेत गुप्तहेरांचा सहभाग तर असेच त्याचप्रमाणे मोहिमेआधी शत्रूच्या गोटातील बित्तमबातमी हेर काढून आणत असत नंतरच मोहिमेचे नियोजन होत असे. मोहीम फत्ते झाल्यानंतर कोणत्या मार्गाने सुरक्षित स्थळी जायचे याची देखील तजवीज केली जात असे.
स्वराज्याच्या हेरखात्याची कामे त्यांच्या जबाबदाऱ्या , कामातील चुकांविषयी शिक्षा तसेच छत्रपतीनकडून मिळणारा सन्मान याविषयी काही नियम ठरवले गेले. ( सातारच्या छत्रपतींचा खाजगीकडील जाबता अथवा खाजगी खात्याचे नियम : -भोसल्यांचे कुळाचार , दतात्रय पारसनीस ) जाबता जासूद :-
नाईक यांनी जासूद चांगले चालक , बातमी समजावयायोगे , विश्वासुक सरकारातून आज्ञा होईल तितके ठेवावे. नित्यशा सावधपणे तयार असावे . नायकांनी अष्टोप्रहर हुजूर असून , रवानगी अथवा बोलावणे , बातमी हरएक कामगिरी आज्ञा होईल तिकडे कामगारीस जासूद काम करावयाचा तोच पाठवून , कामगिरी सरकारास रुजू करीत जावी. जासूद ठेवणे तो वतनदार पाहून त्यास जामीन घेऊन ठेवीत जावे. नाईक यांनी हजिरी कबुलता बातमी राखीत जावी. बाहेरील वैगरे बातमी कळताच हुजूर तत्काळ कळवीत जावी . आपली बातमी फुटू नये , व लोभस गुंतू नये. बातमी सांगावयास प्रतरणा करू नये. सदरहू लिहिलेप्रमाणे बंदोबस्त जलदीने हुशारी राखून सरकारचाकरी करून दाखवील , त्याजवर सरकार मेहरबान होईल, ज्याजकडून हे न घडे त्यास इजा पोहोचून , पुन्हा कामावर चाकरीवर राहणार नाही . हे स्पष्ट समजोन लिहिलेप्रमाणे वागावे व चाकरी करावी.
ज्यास चाकरीवर वागणे त्याने जे वस्त्रपात्र असेल ते निर्मळपणे , स्वच्छतेने , प्रात:काळी अंघोळ करून सजीलपने गळाठा न दिसता स्वच्छतेने असत जावे. घरास वैगेरे जाता येता हजिरनीस यास रुजू होऊन जात जावे. हे न केल्यास गेल्या दिवसांच्या तारखा मजुरा पडणार नाहीत . सबनीस यांनी हुजूर असावे. जासुदांकडून बातमी व कामगारीत अंतर व आळस होऊ नये. आपण जातीने हजर राहून सेवा इमानेंइतबारे अप्रतर्णी करावी. सदरहू हुशारीने चाकरी करून दाखवील त्याजवर सरकार मेहेरबान होईल. ज्याजकडून हे न घडे त्यास इजा पोहोचून , पुन्हा त्या कामावर राहणार नाही व रदबदली होऊन चाकरीच मिळणार नाही. हे स्पष्ट समजोन हुशारीने वागावे. ज्याची विनंती व रदबदली करणे ते त्याचे समक्ष सरकारांशी करू नये.
सरकारातुन कायदे चालवयाचे :-
१ सरकारातून पोशाख जातील त्याजबरोबर जासूद असावा म्हणोन कलम लिहिले आहे. त्याची नेमणूक होईल.
१ आंब्याच्या डाल्या जातील त्याजबरोबर जासूद असावा म्हणोन कलम लिहिले आहे . त्याची नेमणूक होईल.
१ सबनीस यांनी सरकारजवळ नेहमी असावें.
१ नजर दसऱ्याची व वर्षप्रतीप्रदेची व दिपवाळीची करीत आल्याप्रमाणे करावी.
१ गोकुळअष्टमीचे निशाण व आंबे पिकले हिरवे सालाबादी पावत आल्याप्रमाणे पावतील.
श्री . नागेश सावंत