संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग
दुर्गराज रायगड – महाद्वार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मावळेलोक, सरदारलोक यांनी तर मोलाची भूमिका पार पाडलीच पण याशिवाय अजून एक आहेत त्यांनी देखील तितक्याच प्रमाणात स्वराज्यविस्तारात आपले मोलाचे योगदान दिले, ते म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या गडकोटांनीं !! याच गडकोटास आपण पवित्र मानून त्यांस भेटायला जातो. आपल्याला त्यांचे महत्त्व कळते.
शिवरायांना दुर्गांचे महत्त्व पटवून दिले ते म्हणजे सोनोपंत डबीर. शिवभारतकार म्हणतात- प्रथम राजा, नंतर मंत्री, मित्र, धन, राष्ट्र (रयत), गड आणि सैन्य हि राज्याची सात प्रमुख अंगे आहेत. ज्याप्रमाणे शरीराचा एखादा अवयव निकामा झाला कि शरीर काम करत नाही त्याच प्रमाणे राज्याचा एखादा अंग बिघडला किंवा खराब झाला तर संपूर्ण राज्य विस्कळीत होते. राजा हे मस्तक, मंत्री हे मुख, धन आणि सैन्य हे भुज, बाकीचे सारे राष्ट्र हे शरीर, मित्र हे सांधे आणि दुर्ग म्हणजे शरीरातील दृढ हाडे. (जर समजा शरीराची हाडेच ठिसूळ झाली तर हे शरीर किती वर्ष टिकून राहील?) महाराज, तुमच्या देशास लागून असलेले शत्रू राष्ट्र रात्रंदिवस तुमचा द्वेष करत आहेत, त्यामुळे तुमचे इथे राहणे योग्य नाही तुम्ही कोणत्या तरी दुर्गम ठिकाणी जावे. म्हणून महाराज तुम्ही अत्यंत दुर्गम स्थानी राहून हे जग जिंकण्याचा प्रयत्न करा, तुम्ही शिवाजी महाराज तुम्हाला काय अजिंक्य आहे ? नंतर कविंद्र परमानंद लिहितात कि, ज्याप्रमाणे शंकराने कैलासाचा, इंद्राने मेरूचा आणि विष्णूने समुद्राचा आश्रय केला आहे. (तसेच आपण देखील हे जग जिंकण्यास दुर्गांचा आश्रय घ्यावा). दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक त्यास दुर्गम मानत नाहीत तर त्या दुर्गांचा स्वामी देखील दुर्गम हवा आणि हीच त्याची दुर्गमता. प्रभुमुळे दुर्ग दुर्गम होतो आणि दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो, दोघांच्या अभावी शत्रूच दुर्गम होतो. (महाराज) तुमचे जे दुर्ग आहेत ते ताबडतोब दुर्गम करा.
दुर्गांची दुर्गमता पटवून देणारे अजून एक महत्त्वाचे साधन म्हणजे “आज्ञापत्र” त्यात लिहिले आहे कि- गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तरी ते मोडून त्यावरील झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस जाता कठीण असे मार्ग घालावे याविरहित बलीकूबलीस चोरवाटा ठेवाव्या त्या सर्वकाळ चालूं देऊं नयेत.
पण आज दुर्गांची दुर्गमता आपणच नष्ट करायला निघालो आहे. रोप-वे म्हणा किंवा अवघड रस्त्यावर बांधकाम करून त्यास सोयीस्कर असे बनवणे. गरज नसताना एखादा (राज) मार्ग विकसित करणे. तेथील मूळ वास्तूला इजा पोहोचवत आपल्या सोयीप्रमाणे त्यास आकार देणे. शिवभारतात उल्लेखलेले दुर्गम दुर्ग हेच का असा प्रश्न स्वतःला पडला तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण किल्ल्याला मुबलक सोयी सुविधा पुरवतो तेवढाच प्रमाणात शिवभारतातील दुर्गम दुर्ग हे दुर्गमता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
एकदा का दुर्गांची दुर्गमता गेली कि शत्रूरूपी समाजकंटक लोक दुर्गांचा दुरुपयोग करण्यास सुरुवात करतात. दुर्गांवर हल्ली कचरा आणि प्लॅस्टिकच्या बाटलीचे प्रमाण इतके वाढले आहे कि दर आठवड्याला एक मोठा ढीग तयार होतो. हेच का ते दुर्गम दुर्ग? आपण दुर्गांचे आजचे स्वरूप पाहिलेच असाल, वर्षे सरता सरता त्याचा कणाच ढासळून जात आहे जेथे कधी काळी स्वराज्याची स्वप्नेच रेखाटली गेली नाही तर ती पूर्ण देखील झाली आहेत. दुर्गांची झालेली नासधूस म्हणजे स्वराज्याचा अपमान. दुर्गमता नष्ट होऊन किल्ले हे आता फक्त पिकनिक स्थळे होऊन राहिले आहेत.
कोणत्याही किल्ल्यावर जाण्याआधी त्या किल्ल्याचं इतिहास, अभ्यास त्याचे भौगोलिक महत्त्व या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे किंवा निरीक्षण करणे हे महत्त्वाचे असते. किल्ल्यांवरील पाण्याचे टाके , वृक्ष, झाडी, तट-बुरूज व इमारतींची बांधकाम यांना नुकसान पोहोचणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी. किल्ल्यांवरील कचरा उचलणे म्हणजे फक्त दुर्ग संवर्धन नाही तर दुर्गांच्या चिऱ्यांत आणि बुरुजांच्या दडलेला इतिहास बोलका करणे हे सुद्धा दुर्गसंवर्धनच, नाही का?
माहिती साभार – मयुर खोपेकर