टाकळी ढोकेश्वर लेणी, ता. पारनेर –
नगर – कल्याण रस्त्यावर नगरपासून ४० किमी अंतरावर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणार्या रस्त्याने गाव पार करुन पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वर ची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. लेण्यांपासून पाऊण उंचीवर मध्ययुगात बांधलेले प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरुनच आपले लक्ष वेधून घेतात. पायर्या चढतांना प्रवेशव्दाराच्या अलिकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरे आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेंव्हा बांधली असेल तेंव्हा त्याच्या बाजूला हे शरभ शिल्प असणार पण कालांतराने डागडूजी करतांना ते मुळ जागेवरून काढून टाकले असावे. अश्या प्रकारचे नक्षीकाम केलेले दगड पायर्या चढतांना पायर्यांमध्येही आढळतात.टाकळी ढोकेश्वर लेणी.
केंद्रीय पुरातत्व विभागाने टाकळी ढोकेश्वर लेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. पुरातत्व विभागाच्या नोंदी नुसार ही शैव लेणी राष्ट्रकूटकालीन इ. स. ५ व्या ते ६ व्या शतकातील आहे. टाकळी ढोकेश्वरचे मुख्य लेण प्रशस्त आहे. लेणी समोर दगडी दिपमाळ आपल्याला दिसून येते. लेण्यात शिरतांना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसर्या बाजूला वीरभद्राची मुर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. त्रिशुळपुरुषाने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे.
गाभार्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची भव्य शिल्पे असून, त्यांच्या डोक्यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या वर असलेले विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत. सभामंडपात नंदी आहेत. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणाऱ्या स्तंभचौकटीवर गजलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत. गाभार्या भोवती प्रदक्षिणापथ कोरुन काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर एका गुहेत असंख्य शिल्पे मांडून ठेवलेली असून ही गुहा लोखंडी दरवाजाने बंद केलेली असते. तसेच प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ, शिवलिंग व मोठा नंदी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. गर्भगृहात शिवलिंग आहे.
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. महाशिवरात्र, श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. एका दिवसात विशेष ऐतिहासिक वास्तू पाहायची असल्यास टाकळी ढोकेश्वर लेणी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Rohan Gadekar