महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,15,832

भेदून जाईल छाती ऐसा टकमक टोक दरारा

Views: 4392
4 Min Read

भेदून जाईल छाती ऐसा टकमक टोक दरारा

जेवढ्या वेळा रायगडाला गेलोय, जवळजवळ प्रत्येक वेळी मुक्कामीच गेलोय.
रात्री उशिरा गड चढून वरती निवांत आराम करून सकाळी भल्या पहाटे सूर्योदय पाहायला माझी पावले आपसूकच टकमकीकडे वळतात.

बाजारपेठेच्या समोरून एक वाट दारूगोळ्याच्या कोठाराकडे जाते. आपण जसेजसे या वाटेने पुढे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. पुढे गेल्यावर उजव्या हाताला २६०० फूट सरळ तुटलेला एक खोल कडा आहे. हा कडा बघताच ‘दीड गाव उंच‘ असे साक्षात राजांचे ते शब्द आपल्या कानी पडतात.

इथे गेलं की शिवरायांबद्दल सांगितली जाणारी दंतकथा आपोआप डोळ्यासमोर उभी राहते.

ती कथा अशी-

‘एकदा शिवाजी महाराज सहज फेरफटका मारण्यासाठी दुपारच्या वेळी टकमक टोकावर गेले होते. तर ते त्या कड्यावर उभे असताना त्यावेळी खूप ऊन असल्यामुळे त्यांना उन्हाची झळ लागू नये म्हणून त्यांच्या मस्तकावर एका सेवकाने छत्र धरले. त्यावेळी टकमक टोकावर वर इतका भयंकर होता की वारा सुटला अन शिडांत भरावा तो छत्रीत भरला. त्या सेवकाचे पाय जमिनीपासून सुटले अन तो टकमक टोकावरून बाजूस झाला. पण ती उघडी छत्री हातांतून न सोडल्यामुळे, वारा कमी होताच, काही वेळाने तो सुखरूप जमिनीवर टेकला. ज्या जागी तो जमिनीवर सुखरूप उतरला त्या जागी एक गाव वसले त्या गावाला छत्री निजामपूर असे नाव प्राप्त झाले.’

आपण कधीही टकमक टोकावर गेलो तर तिथे छातीत धडकी भरवणारा तुफान वारा असतो. कधीकधी मनात असा विचार येतो की आपण जर या वाऱ्यात उडालो तर आपल्याकडे छत्री पण नाहीये😁.

पण तिथे कधीही गेलं की मन आपोआपच सुखावले जाते. काळीज चिरून टाकणारा बेभान होऊन वाहणाऱ्या वाऱ्याचा तो आवाज ऐकताना सगळ्या दुनियेचा विसरचं जणू पडतो.

टकमक टोकावरून दिसणारा तो माँसाहेब जिजाऊंचा पाचाड येथील वाडा जणू त्याकाळच्या वैभवाची आठवण आज तो प्रत्येक प्रहरी होणारा घंटानाद आपल्या डोळ्यासमोर आणतो. राजे रोज इथे येऊन आऊसाहेबांचे दर्शन घेत असतील. जणू आजही हा भयावह कडा त्या वाड्याशी ते ३५० वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींची खलबते करत असावा.

रायगडाच्या टकमक टोकावरून दिसणारी ती सह्याद्रीची भव्यता आज ते रौद्रभीषण सौंदर्य डोळ्यात साठवावे की कॅमेरात ह्याबद्दल मी तर नेहमीच साशंक असतो इतकं मनमोहक रूप दिसत इथून.

टकमक टोकावरून दिसणारी ती पाचाडची खिंड, वर येणारा गडाचा रस्ता, काळ नदीचे ते पात्र, रायगडवाडी अन छत्री निजामपूर च्या वस्त्या, ती टुमदार घरे, समोर तुटलेल्या कड्यांचे ते कप्प्यांसारखे कडे, कौला-बौला खिंड, आकाशाला गवसणी घालणारा सह्याद्रीचा स्थितप्रज्ञ राजकैद्यांचे घर असणारा लिंगाणा सगळं कितीतरी भव्य अन आकर्षक दिसत. इतकं सुंदर की याच्याकडे बघावं अन बघतच राहावं इतकं आकर्षक.

इथून दिसणारा तो महादरवाजा, ती चोरदिंडी, गंगासागर, बाजारपेठ, नगारखाना, तो बालेकिल्ला, जगदीश्वर सगळं सगळं किती डोळ्यांत साठवलं तरी कमीच आहे.

कितीतरी अपराध्याच्या अवघा रायगड हादरवून टाकणाऱ्या किंकाळ्या तू ऐकल्या असतील. पण स्वराज्यद्रोह्यांना शिक्षा देताना ना कधी तू थरथरलास, ना कधी तू मागे फिरलास. शेवटपर्यंत स्वराज्याशी तू एकनिष्ठच राहिलास.

आजही तू सांगतोस गोष्टी आम्हाला त्या पराक्रमाच्या,

त्या शौर्याच्या, त्या वैभवाच्या, त्या राज्यभिषेक सोहळ्याच्या, त्या एका लेकाच्या अन त्याच्या आईत दूरवरून झालेल्या प्रेमळ चर्चेच्या, त्या गुन्हेगारांच्या आरोळ्या सगळं काही तू आजही सांगतोस.

पण आज उरलेत ते फक्त फोटो काढण्यासाठी तूझ्याकडे झेपावणारे नादान शिवभक्त, तो गर्दीचा गोंगाट, मुलामुलींची ती झुंबड. तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यातील निसर्गाचा आवाज आणि अविस्मरणीय अशा त्या जुन्या आठवणी अन तो इतिहासाचा मूक साक्षीदार❤️.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment