महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,331

​​​तळगड | Talgad Fort

By Discover Maharashtra Views: 3875 5 Min Read

​​​तळगड | Talgad Fort

रोह्याच्या आजुबाजूला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत. त्यापैकी ​​​तळगड (Talgad Fort) हा एक किल्ला. तळगडची समुद्रसपाटीपासून उंची साधारण १००० फुट आहे. रोह्यापासून समुद्र अगदी जवळच आहे. कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडा लेणी आणि तळगड (Talgad Fort) , घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत.शिवरायांनी या सर्व परिसराचे महत्त्व जाणले होते म्हणूनच १६५७ साली तळगड आणि घोसाळगड हे किल्ले आपल्या ताब्यात घेउन स्वराज्यात सामील केले.

इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुढे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिले गेले. पण तळागड शिवाजी महाराजांकडेच राहिला. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर तळागड सिद्दीकडे आला. पेशवेकाळात थोरल्या बाजीरावांनी सिद्दीवर मात करत १७ एप्रिल १७३५ मध्ये तळागड जिंकला. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने घोसाळगडाबरोबरच तळागडाचाही ताबा मिळवला.

तळगडला जाण्यासाठी आधी गोवा रस्त्यावरचे इंदापूर गाव गाठायचे. येथून तळा गावाकडे जाणारा फाटा लागतो. मुख्य रस्त्यापासून तळा गावात पोचायला अर्धा तास पुरतो. गावाच्या मागेच एका टेकडीवर तळागडाची निर्मिती केली आहे. तीन टप्प्यात विभागलेला हा गड गावातून अगदीच अवाढव्य दिसतो. दुरून उंच वाटत असला तरी गावातून गडाच्या अर्ध्या वाटेवर डांबरी रस्ता जातो. येथून एक पायवाट डावीकडे जात सरळ गडाला जाऊन भिडते. ही मळलेली पायवाट १५ मिनिटात गडाच्या माचीसदृश पहिल्या टप्प्यावर घेऊन येते. येथे तटबंदीचे आणि जोत्याचे थोडेफार अवशेष दिसतात. हीच पायवाट गडाचा मुख्य डोंगर डावीकडे ठेवत वळसा मारून परत गडाकडे येते. येथून कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी गडाच्या दरवाज्यापाशी जायचे.

दरवाजा सद्यस्थितीत ढासळला असला तरी खांब मात्र शिल्लक आहेत. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची एक मूर्ती व खडकातच खोदलेले शरभशिल्प आहे. तर दरवाज्याजवळ बाहेरच्या बाजूस एक टाके खोदलेले दिसते. आतल्या बाजूस देवडीचे भग्न अवशेष दिसतात. हा गडाचा दुसरा टप्पा. पुढे कातळाला वळसा मारून गेले की तिसऱ्या टप्प्याकडे जाणारा पायऱ्यांचा मार्ग लागतो. पायऱ्यांच्या या वाटेला डाव्या बाजूस भक्कम तट बांधला आहे. ठिकठिकाणी जंग्यासुद्धा आहेत. तसेच एक भलामोठा अर्धा गोलाकार बुरुज सुद्धा वाटेत आडवा येतो. पायऱ्या चढून वर गेले की गडाचा मुख्य दरवाज्याची जागा लागते. तळागडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजाही पूर्णपणे नामशेष झालेला असून गावातून निघाल्यापासून अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून वर गेलो की गडाचा माथा म्हणजेच तिसरा टप्पा लागतो. हा तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय. गडाचा माथा साधारण ३०० मीटर रुंद व ४०० मीटर लांब आहे. गड हा दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडमाथ्यावर उजवीकडे एक मोठा चौथरा आणि भक्कम बांधणीचा दुमजली बुरुज दिसतो. हि ध्वजस्तंभाची जागा आहे. या तटावर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायऱ्यांची सोयही केलेली दिसते.

किल्ल्याची तटबंदी आजही शाबूत असुन अनेक ठिकाणचे बुरुज चांगल्या स्थितित आढळतात. डावीकडे कातळात खोदलेली भली मोठी सात टाकी असुन टाक्यांपलीकडे जोत्यांचे काही अवशेष दिसतात ही टाक्यांची मालिका जिथे संपते, तिथे मुख्य इमारत ढासळलेले पण दोन्ही बाजूंच्या भिंती सुस्थितीत असलेले ‘लक्ष्मी कोठार’ आहे. त्याच्यापलीकडे उत्तरेकडे निमुळती होत जाणारी भक्कम तटबंदी आहे. आजही सुस्थितीत असलेली ही तटबंदी आणि बुरुज पाहून पुन्हा मागे यायचे आणि दक्षिणेला असलेला दुमजली बुरुज पहायचा. या तटबंदीच्या शेवटच्या बुरुजावरून घोसाळगड, महाड, रोह्याची खाडी असा सर्व परिसर दिसतो तर पूर्वेला सावित्री नदी व थोडी दूरवर सह्याद्रीची मुख्य रांग दिसते. याशिवाय गडावर एक छप्पर नसलेले महादेवाचे मंदिर असुन या मंदिरातील पिंड इतर पिंडीसारखी गोलाकार नसून चौकोनी आहे. गडाच्या बांधणीवरून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून गड भक्कम आणि लढाऊ करण्याचा पूर्ण प्रयत्न दिसून येतो. गडाचा वापर हे टेहळणी व्यतिरिक्त इतर फारसा होत नसल्याने फारशी शिबंदी गडावर नसावी. किल्ल्यावर गडाचा घेर आटोपशीर असल्याने एक तासात किल्ला फिरुन होतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Pc- Khalil Sawant

Leave a Comment