तांबुल संस्कृती भाग १
माझ्याकडे भारतीय तांबुल संस्कृतीसंबंधातील वस्तूंचा फार मोठा संग्रह आहे.
पानाचे विविध प्रकारचे डबे — भारतात प्राचीन काळापासून चालत असलेली तांबूल संस्कृती आणि नंतरच्या मुगल राजवटीतील पान –हुक्का पद्धतीमुळे या दोहोंच्या संयोगाने समाजात त्यावेळी एक वेगळाच सार्वजनिक शिष्टाचार रुजला. छोट्याछोट्या बैठकीत पानविडा बनविण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक फिरविले जाई. प्रत्येकजण आपला विडा आपल्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असतील तर तबक सहजपणे फिरविणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नाविन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले. त्याला असलेल्या चाकांमुळे असे डबे एकमेकांकडे सरकविणे सोपे होई . काही पानडब्यांना तर सिगारेट व काड्यापेटी ठेवण्याची सोय असे व ash trey बसविलेला असे. अशा नाविन्यामुळे यजमानांची शान वाढत असे. याच कारणांमुळे अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या.तस्त ( थुंकदाणी ), यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले.
पानाचा आम्रडबा — भारताची पानविडा ( तांबूल) संस्कृती फार जुनी. ते एक व्यसन न मानता खानदानी शौक म्हणून मानला जाई. अगदी धार्मिक विधींमध्ये पानसुपारीला पहिला मान तर विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. मित्रमंडळीची बैठक पानसुपारीच्या भोवती फिरे. लावणीची बैठक, नृत्यांगनेची अदाकारी, संगीताची मैफिल, कवालीचा मुकाबला, शायरांचा मुशायरा, गायनाची जुगलबंदी या गोष्टी विड्याशिवाय रंगणेच अशक्य ! पूर्वी पुरुषांप्रमाणेच अनेक स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकीन होत्या.त्यांच्यासाठी अत्यंत आगळेवेगळे आणि कलात्मक नजाकतीने पानडबे बनविले जात असत.
सोबतच्या चित्रात असाच हा एक आंब्याच्या आकाराचा पितळी पानडबा ! याच्या पितळी पानाच्या टोकाने विड्याच्या पानाला चुना लावायचा. त्याला बसविलेल्या घुंगुरामुळे नाजूक आवाज येई. नंतर छोट्या खणातल्या सुपारी,लवंग ,वेलची, कात अशा अन्य सर्व चिजा पानात भरायच्या. एक साग्रसंगीत विडा तयार .स्त्रीसुलभ विचार लक्षात ठेऊन या डब्याच्या झाकणाला एक छोटासा आरसाही आहेच ! त्यामुळे पान खाल्ल्यावर आपले ओठ किती रंगले हे लगेच पाहता येई. या आम्रडब्याशेजारचा मिथुन अडकित्ताही रंगत वाढविणारा आहे.
चंची- सुंदर सुंदर पानडबे, नाजूक अडकित्ते, कलात्मक चुनाळी वगैरे गोष्टी अभिजनांना, चांगल्या आर्थिक स्तरातील मंडळींना ठीक आहेत. पण कष्टाची कामे करणाऱ्या आणि थोड्या कमी आर्थिक स्तरातील पुरुष आणि स्त्रियाही उत्तम अभिरुची जपत असत. त्यांची पानविड्याची कापडी चंची ही गोंडे, आरसे, घुंगुर, रंगीत काठ यांनी सजलेली असे. ४ / ५ खणांच्या या चंचीमध्ये कात, चुन्याची डबी, सुपारी आणि हो, चक्क तंबाकूसुद्धा असे. विड्याची पाने ताजी राहावी म्हणून मेणकापडाच्या छोट्या तुकड्यात गुंडाळून चंचीत ठेवत. चंचीच्या टोकाला लांब दोरी, घुंगुर व गोंडा असायचा आणि या दोरीने चंची गुंडाळून बांधली जाई. क्वचित याच दोरीला अडकित्ताही अडकविला जात असे. तर शेतात, वाडीत, मळ्यात अशा ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांची चंची आकाराने छोटी, सहज कमरेला खोचता येणारी आणि याच सर्व पदार्थांनी सज्ज असे. अनेक स्त्रिया अशाच सज्जतेचा बटवा वापरीत आणि तो देखील कलात्मकतेने सजलेला असे.
सोबतच्या विविध छायाचित्रात माझ्या संग्रहातील मोर, हंस, मोटार कार्स, विमान, पुस्तक, विड्याच्या पानाच्या अकराचा, सुंदर जाळीचा, आंब्याच्या आकाराचे असे कांही पानाचे डबे पाहायला मिळतात. २ / ३ तयार विडे ठेवायचे डबे, चंच्या, सुंदर कोरीवकामाचे अडकित्ते, असंख्य चुनाळी ( चुन्याच्या डब्या ) अशा अनेक अत्यंत दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतील.
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]