भाग दुसरा – तांबुल संस्कृती !! ( त्यातील अनेक दुर्मिळ वस्तूंसह )
सर्वांनी माझा या आधीच्या लेखाचे तुफान स्वागत केल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. आपल्या या प्रोत्साहनामुळे मी माझ्या संग्रहातील आणखी कांही अत्यंत दुर्मिळ पानडबे, अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या विशेष डब्या, बाहेर जाताना तयार विडे घेऊन जायचे छोटे डबे अशा वस्तूंची यांची माहिती आणि सुंदर छायाचित्रे सादर करीत आहे. यामध्ये भातुकलीतील पानडबा, अडकित्ता, तस्त या सेटसह तबक, नुसता छोटा पानडबा, छोटे तस्त, यांची
छायाचित्रे आहेत. पूर्वी विड्यामध्ये अस्मानताऱ्याची (थंडाई किंवा मिंट) बारीक पूड घातली जात असे. याचीसुद्धा एक खास डबी माझ्याकडे आहे. सर्वांची छायाचित्रे सोबत दिली आहेत.
भारतीय तांबुल संस्कृती — भारतामध्ये देवांपासून पितरांपर्यंत, पूजेपासून श्राद्धापर्यंत तांबुल अर्पण करण्याचे विधी आहेत. पान हे पृथ्वीवर सांडलेल्या अमृतातून निर्माण झालेल्या नागवेलीचे पान आहे असे मानले जाते. आयुर्वेदाच्या चरक संहिता, सुश्रुत संहिता, वराहमिहीर, वात्स्यायन अशा अनेकांच्या ग्रंथांमध्ये तांबूल सेवनाबद्दल लिहिले गेले आहे. नागवेलीची पाने, चुना, सुपारी, कात, वेलची, लवंग, जायफळ, कपूर, कस्तुरी, कंकोळ, केशर, चांदीचा किंवा सोन्याचा वर्ख इत्यादी गोष्टी विड्यात वापरल्या जात असत. यामध्ये तंबाखूचा समावेश नाही. तंबाकू आणि आधुनिक नशाबाज पानमसाले यांनी या ” त्रयोदशगुणी ” विड्याला बदनाम केले. विडा खाणे हे रंगेलपणा, शृंगार याच्याशी निगडित असल्याने, पूर्वीच्या काळी ब्रह्मचारी, संन्यासी, विधवा स्त्री, व्रतस्थ यांनी तांबूल ग्रहण करणे निषिद्ध मानले जात असे. धार्मिक आणि प्रचलित प्रकारांमध्ये गोविंदविडा, त्रयोदशगुणी विडा, कुलपी विडा , मोद विडा , मोदकविडा, कापरा विडा अशा नावांचे विड्यांचे प्रकार आहेत. तसेच मघई, बनारसी, मसाला, कलकत्ता अशा नावांनीही विडे प्रसिद्ध आहेत. अनेक शृंगारिक लावण्या, कवने यामध्ये विड्याचे अनेक उल्लेख आढळतात. तसेच देवी देवतांना आणि अनेक स्वामींना ( स्वामी समर्थ, गजानन महाराज इ.) विडा अर्पण करतांना म्हणायच्या आरत्याही आहेत. हे विडे एका पितळी खलबत्त्यात कुटून ते अर्पण केले जातात व नंतर प्रसाद म्हणून भक्तांना वाटले जातात. पूर्वी वृद्ध माणसे विडा कुटून खात असत. त्यासाठी घरात एक छोटा पितळी खलबत्ता राखून ठेवलेला असे. दगडी खलबत्त्याचाही वापर होत असे पण त्यात सुपारी बारीक होईल इतक्या जोरात कुटता येत नसे. तो फुटण्याची भीती असायची.
अडकित्ते — हा मूळ शब्द कानडी. आडकी म्हणजे सुपारी, ओत्तु म्हणजे दाबणे आणि कत्ती म्हणजे सुरी या तीन शब्दांपासून हा ” अडकित्ता ” तयार झाला असावा. हे अडकित्ते साधारणतः पितळ आणि पोलाद यापासून बनविले जात असत. चांदी आणि जर्मन सिल्वरचे अडकित्तेही फारसे दुर्मिळ नाहीत. तांबूल संस्कृती ही शृंगार, रसिकता, कलात्मकता, शौर्य यांच्याशी निगडित असल्याने यातील अनेक वस्तू बनवितांना पोपट, मैना, मोर, घोडा, राजहंस यांच्या प्रतिमांचा वापर केला जात असे. एकाच अडकित्त्यात २ अडकित्ते, पानाच्या शिरा काढण्यासाठी मुठीला चाकू बसविलेले, स्प्रिंग बसविलेले, छोटी कडी अडकवून पाते बंद करता येणारे, घुंगुर आणि छोटे गोल आरसे यांची सजावट असलेले असे असंख्य प्रकारचे अडकित्ते पाहायला मिळतात. मिथुन अडकित्ते तर खूप वैविध्यपूर्ण आणि फारच रसिकतेने बनविलेले आढळतात. मराठी इतिहासात जाहीरपणे आणि बेधडक आंतरधर्मीय प्रेमप्रकरण असलेला आणि तितकाच शूर असलेला योद्धा म्हणजे बाजीराव पेशवा ! त्यामुळे बाजीराव मस्तानीच्या जोडीला शृंगार आणि शौर्य यांचे अजरामर प्रतीक मानले गेले. म्हणूनच या जोडीवर बनविले गेलेले मिथुन अडकित्ते सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. याच्या जोडीला अडकित्त्यावर राधाकृष्ण, रमाविष्णू, राजा राणी यांच्या जोड्याही पाहायला मिळतात. कसलेला पानखवैय्या हा अख्खी सुपारी अडकित्त्यानेच फोडतो. तरीही खास सुपारी फोडण्यासाठी असलेले कलात्मक Nut Cutters सुद्धा पाहायला मिळतात.
कट्यारीचा अडकित्ता — पूर्वी पुरुषांप्रमाणेच अनेक स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकीन होत्या. पान खाणाऱ्या शौकीन स्त्रिया नाजूक हाताने सुपारीही छान कातरतात. पण म्हणून त्यांनाच नाजूक समजण्याची चूक कुणी करायला नको. कारण सोबतच्या चित्रात दाखविलेला हा खास अडकित्ता ! या अडकित्त्यावर नाजूक कोरीवकाम असून त्याचा वेगळा घाट लक्षवेधक आहे. मात्र या अडकित्त्यापासून सावध ! एखाद्या संकटाच्या वेळी सुपारी कातरण्याचा हा छोटासा अडकित्ता क्षणार्धात एक जीवघेणे शस्त्र बनतो. त्याच्या दोन्ही मुठी उलट्या वळविल्या की स्वसंरक्षणाची कट्यार होत असे. स्त्रीच्या मुठीत उत्तमपणे बसणारी ही कट्यार तिचे संरक्षण करायला नक्कीच पुरेशी आहे .सोबतचे २ अडकित्ते हे पोलाद आणि जर्मन सिल्व्हर पासून बनविलेले आहेत. हे संरक्षक अडकित्ते आता दुर्मिळ झाले आहेत.
पानडबे — तांबूल संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या पानडब्यांमध्ये, विड्यात घालायच्या सर्व वस्तू वेगवेगळ्या आणि नीट ठेवता येतील अशी अंतर्गत रचना असायची. परंतु हे डबे आकर्षक आकारांमध्ये , नक्षीदार, अत्यंत कलात्मकपणे घडविलेले असत.आत ठेवलेली पाने सडू नयेत म्हणून अनेक डबे हे जाळीदार असायचे. पुस्तकाच्या आकाराचा पानडबा हा, तो वापरणाऱ्याची intellectual ओळख अधोरेखित करीत असे. पूर्वी त्यावर “जय हिंद “, महात्मा गांधींचे चित्र, भारतमातेचे चित्र असेही कोरलेले पाहायला मिळत असे.
तांबोळा — बैठकीत ज्याच्याकडे कांही नाविन्यपूर्ण काही असेल तर त्यामुळे त्याची शान वाढत असे. अशा वस्तूची चर्चा होत असे. त्या घडविणाऱ्या कलाकाराला उत्तेजन मिळत असे. म्हणून मग तांबूल संस्कृतीत अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या. तस्त ( थुंकदाणी किंवा ओगलदानी ), यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यापैकी एक अत्यंत दुर्मिळ असा प्रकार म्हणजे ” तांबोळा ” !
एका कडीत अडकविलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात ३ / ४ विडे अडकविलेले असत. आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात ६० / ७० विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गाण्याच्या मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे अत्यंत रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेला हा तांबोळा.! .. तांबूल धारण करणारा म्हणून “तांबोळा “.. बसलेल्या शौकिनांसमोरून हा तांबोळा फिरविला जाई आणि ते त्यातून सहजपणे विडा काढून घेत असत. साखळीच्या टोकाला बसविलेल्या घुंगुरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर एक नाजूकसा आवाज येत असे.वरच्या कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी पाहायला मिळते. तांबूल संस्कृतीतील हा एक अत्यंत वेगळा आणि दुर्मिळ अलंकार म्हणायला हवा.
चुनपट्ट्या – संपूर्ण पानाला चुना सगळीकडे नीट लागावा व चुन्यामुळे बोटाला त्रास होऊ नये म्हणून पितळी किंवा लाकडी चुनपट्ट्या वापरल्या जात असत. आजदेखील आपल्याला एखाद्या पानवाल्याकडे क्वचित या चुनपट्ट्या पाहायला मिळतात. तसेच पानाला पातळ केलेला कात लावायलाही लाकडी छोटे गोल रुळ वापरले जातात.
हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृती ही आशिया खंडात दूरवर पसरली होती. त्यासोबत अनेक आशियायी देशात ही तांबूल संस्कृती पसरली होती. लाओस या देशाच्या टपाल खात्याने विडा, पानडबा, विड्यात घालण्याचे जिन्नस या विषयावर २००४ साली ३ टपाल तिकिटे आणि विशेष आवरण प्रसिद्ध केले होते. आपल्याकडील टपालखात्याने एका मिनिएचर शीटवर एक अडकित्ता दाखविलेला आहे.
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]