नरवीर तानाजी मालुसरे –
छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते. म्हणुनच की काय छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे हा विषय लेखक, कादंबरीकारांना कायम खुणावत राहिला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीलाही कायम शिवकाळाचे आकर्षण राहिलेले आहे. याच आकर्षणामुळे २०१९ मध्ये शिवरायांच्या एका मावळ्यावर एक बिग बजेट चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. छत्रपतींचा हा मावळा म्हणजे, सिंहगडावर पराक्रम गाजवणारा सिंह तानाजी मालुसरे, आणि तानाजीची भूमिका साकारणार आहे, रुपेरी पडद्यावरील सिंघम म्हणजे अजय देवगण. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर आपल्या जीवाची पर्वा न करता असामान्य पराक्रम करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल माहिती घेऊया.
सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव कोकणातील उमरठा नसून सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील गोडवली हे आहे, असे आता पुढे आलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरुन सिध्द झाले आहे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात कोंडाणा हा किल्ला प्रमुख होता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनीमुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. सिंहगडाची लढाई ही शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात शिवाजींनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते. सिंहगड हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजींच्या राज्याची राजधानी राजगड केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते.उदयभान राठोड हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजींना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.
किल्ला स्वराज्यासाठी, जिजाऊमाँसाहेबांच्या इच्छेखातर;(काही इतिहासकारांच्या मते कोंढण्याची मोहीम ही पूर्वनियोजित होती) कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”
कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती.४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी)राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले.दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला.भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले.
कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. काही संदर्भानुसार तानाजी मालुसरे’ यांनी घोरपडीच्या सहाय्याने चढून कोंढाणा किल्ला (सिंहगड) घेतला. शाहीर तुलसीदासाच्या पोवाड्यात आलेला हा उल्लेख आहे. परंतु सभासद बखरीत “…जैसा वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे गड चढून गेले” असे लिहले आहे आणि तेच सत्य असावे. पण जरी वरील घोरपडीची घटना सत्य नसली तरी यापूर्वी घोरपडीच्या सहाय्याने गड जिंकण्याचा प्रकार पंधराव्या शतकात (इ.स.१४७०) घडलाय आणि त्याचे पुरावेदेखील मिळतात.
किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली. लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला.
कोंढाणा इ.स.४फेब्रुवारी,१६७० रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले. सभासदाच्या बखरीत या युध्दाचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळीयांचा होता. त्याने कबूल केले की,’कोंडाणा आपण घेतो’,असे कबूल करुन वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे,मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता.त्यास कळले की,गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन,हाती तोहा बार घेऊन,हिलाल (मशाल),चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,बरचीवाले,चालोन आले.तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले.
उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व नरवीर तानाजी मालुसरे यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे,महाशूर,एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. (ढाल तुटणे आणि हाताला शेला गुंडाळून युध्द केलं हा प्रसंग दंत कथा असल्याचं म्हटलं जातं) दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन,दोघे महारागास पेटले. मोठे युध्द झाले,एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा(तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून,कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली,त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले की,’गड घेतला,फत्ते जाहली’! असे जाहालें.
जासूद दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं,’तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें. उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला. असें सांगितलें.गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की, ‘एक गड घेतला,परंतू एक गड गेला!’असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले. कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी”गड आला पण सिंह गेला”असे उद् गार काढले.त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले,ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.
ता. क.
सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.
अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे. दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला. इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.
माहिती संकलन : विजयश भोसले