तपोनेश्वर मंदिर समूह –
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ दारव्हा रोडवर बोरी अरब (बोरी चंद्रशेखर) या गावाजवळून अवघ्या 2 km अंतरावर हे एक सुंदर प्राचीन तपोनेश्वर मंदिर समूह काळाच्या व प्रशासनाच्या माऱ्यात आजही टिकून आहे.
हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील हे मंदिर समूह यादवकालीन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा समूह व चंद्रपूर जिल्ह्यातील सोंडो समूहा प्रमाणे येथे मंदिर समूह आहेत. येथे एकच मंदिर नसून छोटे मोठे 7 मंदिरे आहेत त्यातील 4 प्राचीन आहेत, माझ्या लहानपणी मी इथे नेहमी भेट द्यायचो, पूर्वीच्या काळी इथे नक्कीच यापेक्षा जास्त मंदिरे असतील, काळाच्या ओघात ती नामशेष झाली, त्याचे अवशेष व खानाखुणा परिसरात पसरलेल्या आढळतात. तपोवन म्हणजे जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निर्माण केलेला भाग, त्यासाठी इथे पाण्याने सदैव भरून असलेले एक सुंदर जलकुंड (अनसूया कुंड) आहे ज्यात अंघोळ करून मंदिर समूहात तपश्चर्या करायची. (खोली साधारणतः 30 ते 35 फूट) बाजूला एक मोठी विहीर आहे.
मुख्य मंदिर बरेचशे शिल्लक आहे, त्यातील पिंड ही बरेचदा पाण्याखाली असते, काळ्या दगडांच्या चिऱ्यांचे व प्रस्तर खडकांचे मंदिराचे बांधकाम आहे. स्तंभ, पाद, स्तंभशीर्ष व प्रत्यक्ष स्तंभ अशी रचना आहे. या स्तंभावर छत तोललेले आहे शिखर द्विजंघायुक्त आहे. दोन वैशिष्टपूर्ण चतुर्भुज असलेल्या मुर्त्या चांगल्या स्थितीत आहेत. मुर्त्या शिवस्वरूप भैरव क्षेत्रपाल च्या आहेत, दोन्ही चांगल्या स्थितीत आहेत. (अंदाजे 900 च्या आसपास च्या राष्ट्रकूट कालीन असाव्यात) या एकाच मंदिरावर आता कळस शिल्लक आहे बाकीचे ढासळले, सर्वच मंदिरात शिवलिंग आहे, आधुनिक मंदिरात हनुमान, दत्त अश्या प्रतिमा आहेत. दोन प्रचिन नंदी, एक वीरगळ, स्तंभावर असणारे स्त्री शिल्प, नृत्यांगना, स्त्री प्रतिमा, एक वैशिष्टपूर्ण पिंड, एक चतुर्भुज शिव अशी शिल्पे आहेत, या सर्वांचे योग्य जतन होणे गरजेचे आहे. स्थानिकांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिसराला कंपाऊंडसह काही कामे केली आहेत, मात्र कुंड पूर्वीपेक्षा जास्त कोसळले आहे त्याची दुरुस्ती व एका मंदिरावरील कळस तसेच छोट्या मंदिराची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
– हरीश ससनकर, इतिहास अभ्यासक (चंद्रपूर)