तातोबा मंदिर, ओढा | Tatoba Temple, Odha –
नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन शहर आहे. या शहरात तसेच परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. यातील काही वास्तू आज चांगल्या स्थितीत आहेत तर काही काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकहुन निफाडकडे जाताना साधारण १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा गावातील अशीच एक ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.तातोबा मंदिर, ओढा(Tatoba Temple)
गोदावरीच्या कुशीत पहुडलेलं ओढा तसं लहानसं गाव. नाशिकच्या पंचवटीमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करणारे रंगराव ओढेकर याच गावातील. गावातील आजमितीला जमीनदोस्त झालेल्या ओढेकरांच्या वाड्याच्या मागील बाजूस असलेले तातोबा मंदिर आज विस्मृतीत गेले आहे. मंदिराची पडझड होत असून काटेरी झुडुपांनी मंदिराला वेढा घातला आहे. पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात समावेश असूनही ही वास्तू पूर्णपणे दुर्लक्षित राहिली आहे.
मंदिराचे बांधकाम साधारण १३-१४ व्या शतकातील असावे असे वाटते. गावातील तातोबानावाची व्यक्ती इथे कायम दिवे लावीत असे त्यामुळे या मंदिराला तातोबा मंदिर हे नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. पण खरं तर हे मंदिर नाही कारण आत कुठल्याही देवतेची मूर्ती नाही. प्राचीन काळात हा ऋषीमुनींचा मठ असावा व अध्ययन-अध्यपनासाठी या वास्तूचा वापर होत असावा असे अभ्यासक सांगतात. मंदिरा समोर कुण्या अनामिक सत्पुरुषाची समाधी आपल्या नजरेस पडते.
स्थानिकांसोबतच पुरातत्व विभागाने देखील दुर्लक्ष केल्याने आज ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या वास्तू आपला वैभवशाली इतिहास सांगत आहेत. केवळ आवश्यकता आहे तो संवाद साधन्याची.
रोहन गाडेकर