महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,187

तात्या टोपे | रामचंद्र पांडुरंग टोपे

Views: 2568
10 Min Read

तात्या टोपे | रामचंद्र पांडुरंग टोपे –

स्वातंत्र्य योद्ध्यांचा प्रिय सेनानी… तात्या टोपे  …….नानासाहेबांचा सेनापती…..दिसायला गौरवर्णीय असल्यामुळे व अंगापिंडाने मजबूत असल्यामुळे चारचौघात तात्या टोपे उठून दिसायचे. उंचीने जास्त उंच नाही, केस मानेपर्यंत वाढवलेले व डोक्यावर पांढरा फेटा बांधलेला हा मराठा सेनापती रणांगणावर उतरला की स्वराज्याचा मराठा सेनापती कसा लढतो व कसा असतो हे इंग्रजांना दिसून यायचे. नानासाहेबांनी तात्यांच्या हातात  तलवार दिली आणि तात्यांना त्यांचे ध्येय गवसले… पुन्हा स्वराज्य… आपल्या धन्याला बिठूरचा राज सिंहासनावर पुन्हा विराजमान करायचे ….

एखाद्याने रणांगणावर पराक्रम कितीही गाजवला तरी त्याला नशिबाची जोड हवी ! नशिबाची साथ असेल तरच तो पराक्रम टिकतो, बहरतो ! तात्या टोपेंनी व नानासाहेबांनी एकवेळ हातात आलेले कानपूर पुन्हा हस्तगत करण्याचा प्रयत्न केला ……प्रयत्न यशस्वी सुध्दा झाला.

‘परंतु पंधरा दिवसांनी सुमारे चोहीकडून इंग्रज लोकांच्या गोर्या पलटनी बहूत आल्या आणि मोर्चे बांधून लढावयास सिद्ध जाहल्या.या युद्धात स्वता नानासाहेब मोरच्यावर जाऊन तोफेस बत्ती आपण देऊ लागले.येकसारखी लढाई सुरू जाहाल्यापासून मधे स्नान-भोजन-निद्रा सुद्धा नाही, तसेच लढत होते. लढाईचा नंबर आला म्हणजे लढून मागे येऊन हातावरचे हातावर साखरपुऱ्या घाईने खाऊन भिस्ती याजपासून पाणी घेऊन हातानी पिऊन पुन्हा युद्धास प्रवृत्त व्हावे. याप्रमाणे युद्ध चालत होते. असे युद्ध एकंदर दहा बारा दिवस रात्रंदिवस चालून शेवट पुरुषयत्र निर्फळ दैवबळ प्राधान्य होऊन येकायेक वारा फिरला. आणि काळे लोकात भीती उत्पन्न होऊन रण फुटू लागले. गोरे लोकांनी मोरच्यातून तोफा बाहेर ओढून पुढे चाल करू लागले.

काळे हतवीर्य होऊन मृत्युभयानी दशदिशा रण फुटून पलायन करू लागले. तेव्हा बाळासाहेब याणी त्या काळात सर्वांस मोठ्यानी हाका मारून आवेशाने ज्या तोफेवरचा गोलंदाज गोरे लोकांनी मारला होता त्या तोफेवर जाऊन स्वता तोफ चालू केली होती. पाच साहा आवाज जाहाले तो दुसरे तोफांवरचे गोलंदाज मरण पावले. त्याही तोफा रिकाम्या पडल्या व स्वार सवे पळून गेले व पायदळ युद्धभूमीवर राहिले नाही. हे कृत्य पाहून बाळासाहेबही भीतीप्रद पावले. तो रावसाहेब व नानासाहेब हे घोड्यावर आसता बाळासाहेबास भेटून त्यास असे कळविले की, आता युद्दाची सिकस्त जाहाली आहे. तर विनाकारण आपण रांडमरणानी या समयी मरावे त्यापेक्षा येथून पळून जाऊन पुन्हा उद्योग करून सैन्यसागर जमा करून लढाई देऊन जय मिळवून किंवा माहारणात पडून स्वर्ग जिंकू. यास्तव आता घोडे ब्रह्मावर्ताचे रस्त्याकडे काढावे हे बरे वाटते. हे भाषण सर्वांनी ऐकून कबूल करून ब्रह्मावर्त क्षेत्राकडे घोडे चालू केले’_विष्णुपंत गोडसे(माझा प्रवास)

….इंग्रज सेनानी ज.कँम्बेल कानपूरवर चालून आल्यामुळे तात्यांना आणि नानासाहेबांना पुन्हा कानपूर सोडावे लागले…(६ डिसेंबर १८५७)

आता तात्या ह्यु रोज सोबत लढणाऱ्या झाशीला मदत करायला २० हजार फौजेसोबत गेले. बेटवाच्या जंगलाचा आसरा घेऊन लढणाऱ्या तात्यांच्या सैन्याची शत्रूने शेकड्यांनी हानी केली. हे सैन्य म्हणजे उत्साहाने परिपूर्ण होते .मात्र या सैन्यात प्रशिक्षणाचा अभाव होता. या रणकंदनात तात्यांच्या २० तोफा शत्रूच्या हाती पडल्या. आता इथे युद्ध खेळण्यात अर्थ नाही म्हणून लक्ष्मीबाई ,तात्या टोपे, रावसाहेब यांनी आपला तळ ग्वाल्हेरनजीक गोपालपूर येथे हलवला….

सिंदे सरकारचे पदरी लढवाईक लोक होते, ते सर्व तात्या टोपी यांणी फितुर केलेले होते’_ विष्णुपंत गोडसे(माझा प्रवास)

शिंदे सरकार या स्वातंत्र्य योद्ध्यांना  मदत करायला तयार नसली म्हणून काय झालं … तात्यांनी शिंद्यांची सेनाच आपल्या बाजूने वळवून घेतली ! तात्यांचे व्यक्तिमत्त्व होतेच तसे …. मोहित करणारे …. स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे ….

१७ जुन १८५८ स्वातंत्र्यलक्ष्मी लक्ष्मीराणी अनादीअनंता मध्ये विलीन झाली…. आता या स्वातंत्र्यसमराचे  रूप झपाट्याने पालटू लागले. वर्षभर सुरू असलेले आणि  चढ उतार सोसलेले हे ज्वलंत पर्व  आता हळूहळू थंड व्हायला लागले होते… परंतु आताही इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारा पेशव्यांचा सेनापती तात्या जिवंत होता …

इंग्रजांच्या हातून ग्वाल्हेर आणि जबराअलीपूर मधून निसटल्यावर तात्या राजस्थानात घुसले. राजस्थानी राजपूत राजांची मदत मागायला मराठा सेनापती आला …. मात्र इतिहासात मोगलांचा रोष ओढवून न घेणाऱ्या राजपुतांना आता वर्तमानात इंग्रजांचा रोष नको होता !

राजपुतांची राजनीष्ठा पाहून तात्यांनी राजपुतांचा नाद सोडला आणि ते टोक संस्थानात घुसले त्यांनी तिथले सैन्य आपल्या बाजूने वळवले. आता तात्या दक्षिणेकडे निघाले. मागे होम्स आणि रॉबर्ट्स चे सैन्य लागलेले होते. असे करता करता या ‘बड्या बंडवाल्याचे’ सैन्य चंबळे पाशी येऊन थडकले. तात्यांनी चंबळ पार केली आणि हल्ला केला झालरीपट्टणवर. झालरीपट्टनचे सैन्य तात्यांच्या बाजूने वळले. आता तात्यांपाशी नवी रसद दारुगोळा ज्यात ३२ तोफा होत्या त्या मिळाल्या. शत्रूला हुलकावण्या देत तात्यांचे सैन्या इंदूरमध्ये घुसले. होळकरांच्या भुमीत ! हे बघताच रॉबर्ट , होम्स ,पार्क ,मीचे ,होप ,लॉक ,हार्ट  यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंग्रजी सैन्याची एकच त्रेधा उडाली ! तात्यांचा पिच्छा करून इंग्रज सैन्य इतके थकले होते की त्यांचे घोडे सुद्धा रस्त्यात मरू लागले. तात्यांकडे यावेळेस तीसेक तोफा होत्या या तोफा सुद्धा इंग्रज भिडताच पेशव्यांच्या सैन्याने सोडून दिल्या. याला कारण म्हणजे  (१) उघड्या मैदानात ब्रिटिशाशी युद्ध टाळणे, (२) गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीने त्यांना सतावून सोडणे, व (३) त्यासाठी आवश्यक ती साधनें देशी राजांकडून इच्छेने वा सक्तीने मिळविणे या तीन सूत्रांचा अवलंब तात्या करित होते.  गनिमी काव्यात तोफा किती अडचणीच्या असतात हे तात्या टोपेंना पुरेपूर माहीत होते.

बांद्याचे नबाब , रावसाहेब व तात्या टोपे यांचा या काळात विचार पक्का होता . दक्षिणेत घुसायचे आणि पुन्हा एकदा आपल्या मराठी भूमीतून इंग्रजांविरुद्ध रन तांडव माजवायचे !

रोजच्या प्रचंड चकमकी, शत्रूला बुचकाळ्यात टाकेल अशा सततच्या हुलकावण्या देत अखेर हा मराठा वाघ हुशंगाबाद जवळून नर्मदा पार झाला ! तात्या टोपे नागपुरात घुसले ! रघुजी भोसलेंच्या भूमित ! परंतु आता फार उशीर झाला होता एक वर्षाअगोदर हीच रणचपलता कौतुकास पात्र ठरली असती आता मात्र बंड थंड झालं होतं ….

नागपुरात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तात्या बांद्याकडे धावले. आता ते शत्रूकडून घेरल्या जात होते. २५ डिसेंबरला तात्यांना अयोध्येच्या प्रख्यात वीर फिरोजशाह भेटायलाही येणार होता. शेवटी १३ जानेवारी १८५९ रोजी इंद्रगड येथे नरवर जहागिरीचा राजा मानसिंग, रावसाहेब , फिरोजशहा , तात्या टोपे यांची भेट झाली.

तात्या टोपे असा रणात हाती लागत नाही म्हणून इंग्रजांनी फितुरीचा डाव टाकण्याचे ठरवले ! इंग्रजांनी मानसिंगाला फितवले. मानसिंगाने ग्वाल्हेरकरांनी जप्त केलेली मालमत्ता कंपनी सरकारकडून आपल्याला परत मिळेल या क्षुद्र लोभातून मेजर जनरल रीड याच्याशी संधान बांधले होते ! सिकंदराला मदत करणार्या अभिराजाची परंपरा मानसिंगाने  सुरू ठेवली ! धावपळीने थकलेले तात्या टोपे मानसिंगाकडे आश्रयाला थांबले होते. मानसिंगाने पूर्वी त्याच्या काकालाही इंग्रजांच्या स्वाधीन केले होते…  आता तात्या टोपे मानसिंगाच्या जाळ्यात अडकले ! ७ एप्रिल १८५९ रोजी जेव्हा तात्या गाढ निद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांना समजले की आपण आता इंग्रजांच्या हाती सापडलेले आहो . त्यांना ग्वाल्हेर जवळच्या शिप्री येथे जनरल मीडच्या सेनानीवेषात कैद करून आणण्यात आले ……

तात्यांवर इंग्रजांविरुध्द युध्द पुकारण्याच्या आरोपाखाली कोर्ट मार्शल भरण्यात आले. इंग्रजांच्या विशेष विनंतीवरून त्यांनी आपल्या क्रांती जीवनाची माहिती दिली . ती माहिती इंग्रजांच्या मुनशीने लिहून ठेवली.  त्या रोजनिशीवर व कबुलीजबाबावर त्यांनी इंग्रजी वळणदार अक्षरांत Tatia Tope अशी सही केली !

कुणी त्यांना इंग्रजीत उगाच बोलू लागला तर त्याच्याकडे  तात्या तिरस्काराच्या दृष्टिक्षेप टाकून ‘मालुम नही’ असे उत्तर देत. त्यांच्या मनात मृत्यूची भीती नव्हती. त्यांनी कोणते कार्य हाती घेतले होते हे त्यांना  पूर्णपणे अवगत होते. इंग्लिश अधिकाऱ्यांनी त्यांना स्वत:च्या संरक्षणासाठी न्यायालयात पुरावा द्यावयास सांगितले असता ते हसून उद्गारले:

I know full well that, having fought against the british as I have done, I should have to prepare myself for death. I do not want any Court nor do I wish to take any part in the trial. ,

(ब्रिटिशाच्या विरुद्ध लढल्याबद्दल मला मरणाला सिद्ध व्हावे लागले याची मला चांगली जाणीव आहे. मला कोणत्याही कोर्टाची जरुरी नाही किंवा या खटल्यात भाग घेण्याचीही माझी इच्छा नाही.) आपल्या हातातील जड लोहशृखला वर उंचावून ते म्हणाले:- –

The only hope that I have, is to get myself released from these chains either from the mouth of cannon or from the loop of the gallows! Only one thing I have to ask, and that is, that my family at Gwalior having had no connection with my actions, you should not take my old father to any task for my deeds.

(या शृंखलांतून मुक्त होण्याचा मार्ग तोफेच्या तोंडी किंवा फासावर आहे. मला फक्त एकच सांगावयाचे आहे आणि ते हे की, माझे नातलग ग्वाल्हेरला असून माझ्या कृत्यांशी त्यांचा काही संबंध नाही. तसेच माझ्या कृत्यांबद्दल माझ्या वृद्ध पित्यालाही तुम्ही शासन करू नये.)

दि. १८ एप्रिल १८५९ नानासाहेब  पेशव्यांचा ‘मुख्य हुजर्या’ , इंग्रजांचा ‘बडा बंडवाला’ , मध्ययुगीन गनिमी काव्याचा पुनरुत्थान कराणारा सेनापती तात्या टोपे दुपारी ४ वाजता वधस्तंभावर चढला …… वधस्तंभावर जाण्याअगोदर बंधक त्यांचा हात बांधायला आल्यावर ते उद्गारले  ‘या विधीविधानांची गरज नाही’  …. खरंच या मरण खेळ खेळणाऱ्या स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पुत्रांना  माहीत होते जिंकलो तर राष्ट्राचे सोने करू आणि हरलो तर कीर्ती  रूपात स्वातंत्र्याची ज्योत पेटती ठेऊ ……

संदर्भ:-
१) १८५७ चे स्वातंत्र्य समर :- स्वातंत्र्यवीर सावरकर.
२) सत्तावन ते सत्तेचाळ :- वि.स.वाळिंबे.
३) भारतीय स्वातंत्र्यसमर सत्तावन ते सुभाष :- बाळशास्त्री हरदास.
४) माझा प्रवास :- विष्णुपंत गोडसे.

©Pruthvi Dhawad

Leave a Comment