महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,805

टेंभूर्णी कोट

By Discover Maharashtra Views: 3706 6 Min Read

टेंभूर्णी कोट

टेभुर्णी हे सोलापूरच्या माढा तालुक्यातील गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. मराठा कालखंडात टेंभुर्णीचा मार्ग दळणवळणासाठी वापरला जात असल्याने गावात आदिलशाही निजाम-मराठे यांच्या राजवटीचा इतिहास आजही वीरगळ, सतीशिळा, नागदेवता शिल्पे व टेंभूर्णी कोट यांच्या अवशेष स्वरुपात पहायला मिळतो. उत्तर पेशवेकाळात दुसरे बाजीराव पेशव्यांच्या वतीने टेंभुर्णीतील सदाशिवराव माणकेश्वर यांनी निजामाबरोबरच्या शिष्टाईत त्यांचा प्रभाव निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना इनाम म्हणून दिले. भाऊंनी टेंभुर्णीमध्ये १८००च्या सुमारास एक राहता तीन मजली वाडा आणि सैन्य- घोडे यांच्यासाठी एक वाडा असे दोन वाडे व संपूर्ण टेंभुर्णे गावाभोवती तटबंदी बांधली. टेंभुर्णे गावाभोवती संरक्षणासाठी उभारलेली तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक असुन काही ठिकाणी पडझड झाली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाने जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात. पूर्व-पश्चिम असलेला हा कोट चाळीस एकरात पसरलेला असुन बाहेरील तटबंदीत एकुण सोळा बुरूज आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी दहा फुटांपेक्षा जास्त आहे. तटावर चढण्यासाठी आजही शिल्लक असलेल्या तटबंदीत दोन ठिकाणी जिने पाहायला मिळतात. कोटाला प्रवेशासाठी दोन मोठे दरवाजे असुन चार लहान दिंडी दरवाजे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे दिसणाऱ्या गडाच्या मुख्य दरवाजातुन आत आल्यावर सर्वप्रथम उजवीकडे असणाऱ्या विद्यालयाच्या आवारात दगडी बांधकामातील सुरेख गणेश मंदिर आहे तर डावीकडे महादेव मंदिर दिसते. हा रस्ता कोटातून फिरत दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत असल्याने या वाटेने गेल्यास सर्व अवशेष व्यवस्थीत पहायला मिळतात. या रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या बाजुस त्याकाळी गडातील वस्तीला पाणीपुरवठा करणारा बामनतळे तलाव दिसतो. असाच एक तलाव गडाच्या बाहेर पश्चिम भागात असुन तो मांगतळे म्हणुन ओळखला जातो. या वाटेने पुढे गेल्यावर दगडी तटबंदी व प्रशस्त आवार असणारे घडीव दगडी बांधकामातील रामाचे मंदिर असून ते मोडकळीस आले आहे.

राममंदिर पाहुन पुढे आल्यावर उजव्या बाजुच्या गल्लीत सदाशिवराव माणकेश्वर यांचा वाडा आहे. वाडा मोठया प्रमाणावर मोडकळीस आला असुन आजही तेथे काही लोकांचे वास्तव्य आहे. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये हा वाडा बांधल्याची नोंद आहे. टेंभुर्णीत उभारलेल्या या वाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. याचे उच्छवास आजही वाड्याच्या समोर पहायला मिळतात. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत दुसरा मार्ग नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. आमराईत निघणारे भुयार हे भुयार नसुन पाणीपुरवठ्याचा उच्छवास आहे. वाडा पाहुन मुळ वाटेवर आल्यावर थोडे पुढे उजव्या बाजुस प्रचंड प्रमाणात विखुरलेले दगड व ढासळलेले दगडमाती बांधकामातील तीन बुरूज दिसतात. येथे सैनिकांसाठी व घोड्यांसाठी दुसरा वाडा होता व या वाडयाला सहा बुरूज असल्याचे स्थानिक सांगतात. दुसऱ्या वाड्याभोवती कोटाअंतर्गत सहा दगडी बुरुज असल्याने हा बहुदा सैन्य असलेला बालेकिल्ला असावा. यातील उजव्या बाजुच्या बुरुजासमोर गावकऱ्यांनी एक चौथरा बांधून त्यावर कोटात सापडलेली विरगळ, नागशिल्पे, नंदी व इतर दगडी शिल्पे मांडुन ठेवली आहेत. डाव्या बाजुच्या बुरुजासमोर असलेल्या चबुतऱ्यावर सहा मुस्लीम समाधी दिसून येतात. येथे समोरच गडाचा दुसरा मुख्य दरवाजा दिसून येतो.

कोटाचा हा दरवाजा इंदापूर वेस म्हणून ओळखला जातो. कोटाचा हा पश्चिमेचा लाकडी दरवाजा व त्यावरील सज्जा आजही शिल्लक असुन त्यावर जाण्यसाठी दोन्ही बाजुच्या बुरूजातून जिना आहे. या दरवाजाच्या आत असणाऱ्या हनुमान मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार केला आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाच्या या तटबंदीच्या बाहेरील बाजुस एक जुनी विहीर तसेच समोरील ओढा पार करून डाव्या बाजुस एक प्राचीन बारव पहायला मिळते. संपुर्ण कोट फिरायला एक तास पुरेसा होतो. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. इतिहासातील नोंदीप्रमाणे औरंगजेबाचा पुत्र शहाजादा आज्जम मराठ्यांचा पाठलाग करत टेंभुर्णी येथे २ ऑक्टोबर १६८२ रोजी मुक्कामाला थांबला होता. मराठे त्यावेळी भीमा नदीच्या पलीकडे होते. भीमा नदीमुळे मराठे आणि मोगल यांच्या प्रदेशाची विभागणी झाली होती. मराठे संधी मिळताच भीमा ओलांडून मोगलांवर घसरत होते.

मराठ्यांच्या फौजा भीमा नदीच्या परिसरात फिरत असल्याची बातमी मिळताच मोगलांचा बक्षी बहरामंदखान १६९०मध्ये काटी परगण्यातून परांडा येथे आला. त्याने त्याचे जड सामान परांड्यास ठेवले आणि तो टेंभुर्णी भागात धावून गेला. गाजीउद्दीनखानही मराठ्यांच्या पाठलागावर तेथे आला होता. तेथे दोघांची गाठ पडली. त्यानंतर बहरांमदखान परत परांड्यास आला. राजाराम महाराज जिंजीतून स्वराज्यात आल्यावर१६९९ मध्ये त्यांनी स्वतः मोगलांविरुद्ध मोहीम उघडली. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच औरंगजेबने शहाजादा आज्जमला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे प्रवास केला. उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्यामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यास आले व त्यांच्या अंगच्या गुणामुळे लवकरच सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर बाजीराव दुसरे पेशवा बनले.

सदाशिव माणकेश्वर यांनी दुसऱ्या बाजीरावांचा पक्ष घेतला. बाजीरावांवरील निष्ठेमुळे सदाशिवराव भाऊ बाजीरावाचे निकटवर्तीय बनले. बाजीराव पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करून शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला व पेशवे वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पुढे वसईहून बाजीराव पेशव्यांना इंग्रजांच्या मदतीने गादीवर बसवण्यात माणकेश्वरांनी मोलाची मदत केली. त्यांना बाजीरावाने त्यांचा दिवाण म्हणून नेमले. १८१४-१५ पर्यंत बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली. पुढे सदाशिव माणकेश्वर बाजीरावांच्या मर्जीतून उतरले. मराठी सत्तेच्या अखेरच्या कालखंडात टेंभुर्णीची व्यक्ती मराठेशाहीची सूत्रे सांभाळत होती ही बाब टेंभुर्णीच्या इतिहासात भर घालणारी आहे. मराठेशाहीच्या या कारभाऱ्याचा ८ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात मृत्यू झाला. सदाशिव माणकेश्वरांच्या मृत्यूनंतर टेंभुर्णीचे ऐतिहासिक महत्त्व ओसरले.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment