एक सफर मालवण परिसरातली मंदिरांची…
कोकणात गेलं की बहुतांश लोकांची पावलं वळतात ती समुद्रकिनाऱ्याकडे. कारण कोकण म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र आणि त्याचे लांबवर पसरलेले समुद्रकिनारे. त्यामुळे बहुतेक पर्यटकांची कोकणात आल्यानंतर पहिली पसंती असते ती समुद्रकिनाऱ्यांना. पण आम्हाला मात्र कोकणात गेल्यानंतर खुणावतात ती तिथली मंदिरं. कारण तुम्हाला जर का खरं कोकण अनुभवायच असेल तर थोडं आडवाटेवर जाऊन कोकणातली मंदिर नक्की पहा. या मंदिराच्या परिसरात दडलेलं असतं ते खरं कोकण, तिथल्या चालीरीती, देवदेवता आणि मंदिराच्या परिसरात असलेली हिरवीगार वनराई. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या भूमीचे देवदेतांनासुद्धा आकर्षण होते की काय, असे वाटावे अशी अनेक शक्तिपीठे कोकणात आहेत. जीर्णोद्धाराच्या नावाखाली कोकणातली बरीच मंदिर आता नव्या बांधकामाची चादर ओढतायत पण अजूनही काही जुन्या आणि खास कोकणी शैलीत बांधलेली उतरत्या छापराची कौलारू मंदिर आजही शाबूत आहेत.मालवण.
असो, तर आम्हा उभयतांची मालवणला भेट द्यायची गेल्या चार वर्षातली ही दुसरी वेळ. याआधी जेव्हा २०१६ साली पहिल्यांदा मालवणला गेलो तेव्हा शिवलंका सिंधुदुर्ग, सर्जेकोट, निवती सारखे किल्ले, देवबाग, तारकर्ली, भोगावे, तोंडवली, आचऱ्या सारखे सुंदर समुद्रकिनारे आणि जय गणेश मंदिर, रॉक गार्डन, मोरयाचा धोंडा अशी अनेक ठिकाणे पाहिली. त्यामुळे यावेळची मालवण ट्रीप ठरवताना मालवण शहरात राहून १५/२० किमीच्या परिघातली मंदिर पहायचं ठरवलं. पण हा संपूर्ण प्लान आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मंदिर उघडण्याच्या परवानगीवर अवलंबून होता. पण शेवटी देव पावला आणि ट्रीप सुरु होणार अगदी त्याच दिवशी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या शुभदिनी महाराष्ट्रातली मंदिर भक्तांसाठी खुली झाली. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यापासून एकही मंदिराला भेट दिली नव्हती त्यामळे या सुवर्णसंधीचा फायदा घेत गेल्या आठ महिन्यापासून राहिलेला मंदिर दर्शनाचा सगळा बॅकलॉगच जणू आम्ही भरून काढला.
या मालवण भटकंतीमधे मालवण शहराला मध्यवर्ती ठेऊन १५/२० किमीच्या परिघात आम्ही भेट दिलेली मंदिर,
१) श्री ब्रम्हानंदस्वामी समाधी, ओझर तिठा:- निसर्गरम्य वनश्रीने नटलेल्या परिसरात एका सुंदर एकांत जागी श्री ब्रम्हानंदस्वामी यांची समाधी आहे. झाडांनी वेढलेली गुहा, दाट झाडांची सावली, तृष्णा भागवायला थंडगार पाणी, मंत्रमुग्ध करणारं रम्य वातावरण आणि इथली धीरगंभीर शांतता. काही वेळ का होईना ध्यानस्थ बसण्यास ही जागा तुम्हाला भाग पाडतेच आणि एक अध्यात्मिक अनुभवती नक्की देते.
२) रामेश्वर मंदिर, कांदळगाव:- मालवणपासून अवघ्या सात-आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या रामेश्वराची कथा मोठी सुंदर. असे म्हणतात की, सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. शिवाजी महाराज व्यथित झाले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर त्यांच्या स्वप्नात आले. “मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर.” रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या ‘शिवाजीचा वड’ म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. तर असा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव या नात्याची साक्ष देणारा हा रामेश्वर.
३) भराडी देवी, अंगणेवाडी :- नवसाला पावणारी अशी सर्वदूर ख्याती असणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली ही दक्षिण कोकणातील प्रसिद्ध अंगणेवाडीची भराडी देवी. श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. ‘भरड’ भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती.
४) जलमंदिरातली श्री सातेरी देवी, बिळवस :- कोकण प्रांतातलं एकमेव जलमंदिर पाहायचं असेल तर मग या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. हे मंदिर तब्बल ७०० वर्ष जुने आहे. जैन घराण्यातल्या एका देवी भक्तानं हे मंदिर बांधलं असे सांगतात. हे मंदिर पूर्वाभिमुख असून तिन्ही बाजूंनी ते पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिरात एक मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभा-यात मूर्ती नव्हती, तेव्हा एका उंच वारुळाची पूजा केली जात होती. त्या वारुळातच शेष रूपात देवीचं वास्तव्य आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. मंदिराबाबत सांगितली जाणारी आख्यायिका अशी की मंदिर सभोवतालच्या तलावात गाई-म्हशींना पाणी पाजलं जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागलं. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीनं दृष्टांत देऊन ‘माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यानं या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध!’ असं सांगितलं. देवीनं दिलेला हा दृष्टांत आदेश मानून ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधलं.
५) श्री देवी घुमडाई, घुमडे:- सुपारी, नारळ, जायफळ आणि इतर मसाल्याच्या बागांमुळे तयार झालेली हिरवीगार वनश्री, त्यातून वाहणारा छोट्या नदीचा प्रवाह, त्यावरील साकव असं भान हरपून टाकणाऱ्या परिसरात श्री देवी घुमडाईचे मंदिर आहे. जीर्णोद्धारीत झालेले घूमडाई देवीचे मंदिर फार आकर्षित नसले तरी या मंदिराचा हिरवागार परिसर मात्र मनाला भुरळ पडणारा आहे.
६) लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल:- कार्ली नदीच्या काठावर वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते असे सांगतात. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स. १३५० ते १४०० च्या दरम्यानचा असावा. अश्या या प्राचीन मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायणचे कौलारू मंदिर. हे सगळं काही केवळ स्वतः जाऊन अनुभवाव असचं. हे देवालय गावांतील “मुडयाचा कोन” या नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनविलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे व प्रसन्नतेमुळे या स्थानाला आपोआपच गांभीर्य व पावित्र्य लाभले आहे.
७) दुर्गादेवी मंदिर, कुणकवळे – संपूर्ण एका दगडात कोरून काढलेली, सुंदर, सुडौल आणि अनेक अलंकारांनी मढवलेली प्रसन्नवदना देवीची मूर्ती बघायची असेल तर कुणकवळेच्या दुर्गादेवी मंदिरात जायलाच हवं. अनेक ठिकाणी देवीची मुर्ती म्हणजे एक तांदळा असतो ज्याला वस्त्राप्रमाणे सजवून तो अतिशय मनोहरी केलेला असतो. पण इथे मात्र स्वतंत्र देवीची मुर्तीच आहे. तीही इतकी सुंदर की कितीतरी वेळ नुसतच त्या मूर्तीकडे बघत रहावं. चतुर्भुज असलेल्या या देवीच्या हातात तलवार,चक्र,त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. तर पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मुर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा असून केशसभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ सुद्धा फारच देखणी आहे. त्यामुळे आडवाटेला असलं तरी खास वेळ ठेवून हि मुर्ती नक्की पहावी.
८) पेंडूर गावातील प्राचीन मुर्त्या:- पेंडूर गावातील वेताळ आणि भव्य वारूळाच्या स्वरुपात असणारी सातेरी देवी प्रसिद्ध आहे. याच सातेरी देवीच्या मंदिरामागे उघड्यावर झाडाखाली काही जैन धर्मियांच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. येथे ११ व्या शतकात एक जैन मंदिर होते असे सांगतात. आता फक्त त्याचे जोते शिल्लक आहे. मात्र त्या जोत्यावर झाडाखाली असणाऱ्या मुर्त्या मात्र आवर्जून पहाव्यात अश्या आहेत. पद्मासनातील भगवान महावीर, गजलक्ष्मि, महिषासुर मर्दिनी, कुबेर, संकीणी व डंकीणी नामक दोन सुडौल स्त्री मुर्त्या आणि इतरही काही मुर्त्या येथे आहेत. याच पेंडूर गावाच्या मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वेताळगड नावाचा छोटा गिरिदुर्ग देखील आहे.
९) श्री भगवती देवी, धामापूर:- सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे व येथील नयनरम्य तलावामुळे धामापूर गाव प्रसिद्ध आहे. १६ व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. दोन्ही बाजूने घनदाट जंगल, त्याच्या मधोमध पसरलेला जलाशय, त्या काठी असणारे भगवती देवीचे मंदिर आणि मंदिरात असणारी पाषाणात कोरलेली सुमारे चार फूट उंचीची देवीची सुबक मूर्ती. सगळं काही मन हरपून टाकणारं दृश.
चला तर मग आता तुमच्या पुढच्या मालवण भेटीत समुद्रकिनाऱ्या बरोबरच ही आडवाटेवरची देवळं नक्की पहा! हयसर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे असतच. पण त्याचबरोबर या सौंदर्याच्या पेटाऱ्यात खूप काय काय दडलेला असा!
© विनीत दाते – VINIT DATE