सोलापुर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे –
सोलापुर जिल्हा – ऐतिहासिक पार्श्वभुमीनं नटलेला महाराष्ट्राचा एक महत्वपुर्ण भाग. दख्खन गिळायला मोठ्या दिमाखात निघालेला आलमगीर औरंगजेब मराठ्यांच्या भितीनं याच जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरीला तळ ठोकुन बसला. सरसेनापती संताजी घोरपडेंच्या छापेमारीला धास्तावुन माचणुरला त्यानं किल्ला उभा केला. जो पर्यंत मराठ्यांचा संपुर्ण नायनाट करत नाही तोपर्यंत कोणत्याही सुखसोईचा अंगिकार करणार नाही अशी शपथ औरंगजेबानं याच माचणुरच्या किल्ल्यात घेतली. स्वतःला तैमुरलंगाचा वंशज मानणार्या हिंदुस्थानच्या बादशहाला आलमगिर औरंगजेबाला मराठ्यांनी पाच वर्ष जमिनीवर झोपायला भाग पाडलं. या महत्वपुर्ण इतिहासाचा साक्षीदार असणारा माचणूर किल्ला. याच माचणूर किल्ल्याच्या परिघातलं “श्री सिद्धेश्वर मंदिर.”(सोलापुर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे)
हा भाग जिंकल्यानंतर औरंगजेबानं याच सिद्धेश्वर मंदिरातल्या शिवलिंगाला उद्ध्वस्त करण्यासाठी हशम पाठवले असता भुंग्यांनी हशमांवर हल्ला केला. औरंगजेबानं यावर चिडून मांसाचा नैवेद्य श्री शंकराला पाठवला असता मंदिरात त्या मांसाच्या ताटावरील वस्त्र हटवले असता मांसाऐवजी फुले दिसली. अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.
मांसाचा नूर पलटला म्हणुन मासनूर असे या प्रदेशाचे नाव पडले,पुढे मासनूरचा अपभ्रंश होत होत ते ‘माचणूर’ झाले. शेवटी खजिल झालेल्या औरंगजेबाने याच सिद्धेश्वर मंदिराला 400 रुपये व 6 रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला 480 रुपये वर्षासन मिळते. अशी या श्री सिद्धेश्वराची कहाणी..
“पंढरपुरचे विठ्ठलाचे मंदिर.”
कर्नाटकचा विठ्ठल भक्तांसाठी पंढरपुरी येऊन राहिला. वैष्णवांचा विठुराया म्हणजे महाराष्ट्रातल्या संतांचं,भोळ्या भक्तांचं सर्वस्व. मराठ्यांचे अधिपती क्षत्रियकुलावतंस शिवरायांना नेस्तनाबुत करण्यासाठी निघालेला धर्मांध अफझलखान स्वराज्यावर घाला घालण्यासाठी पंढरीच्या विठुरायावर चालुन गेला. कट्टर अफझलखानाने या मंदिराच्या विटंबनेसाठी जंगजंग पछाडलं..
“कंदर गावचे शिवमंदिर.”
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी बांधलेल्या आणि कंदर गावाच्या दक्षिण बाजूने असलेल्या ओढ्यात देखभाली अभावी भग्न होतं चाललेले भगवान शिवाचे सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आणि ग्रामस्थांचीही अजिबात मेहरनजर न राहिलेल्या या मंदिराची सध्या अखेरची घरघर सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त होण्याची भीती आहे.
सोलापुर जिल्ह्यातल्या अशा अनेक महत्वपुर्ण ऐतिहासिक मंदिरांचा ससंदर्भ ऐतिहासिक मागोवा..
“सोलापुर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे..”
लेखक – रवि पार्वती शिवाजी मोरे.