महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,863

तेर चैत्यगृह | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1314 4 Min Read

तेर चैत्यगृह | आमची ओळख आम्हाला द्या –

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तेर मध्ये नावाचे प्राचीन गाव आहे. हे गाव प्राचिन काळी तगर म्हणून ओळखले जात होते. तेरणा नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. या गावांमध्ये त्रिविक्रम नावाचे मंदिर आहे. हे मंदिर मूलतःबौद्ध शैलीचे आहे, परंतु त्यामध्ये हिंदू  देवता त्रिविक्रम मूर्ती  आणून बसवलेली आहे. मुळात हिंदू नसलेली वास्तू ही हिंदू म्हणून सध्या ओळखली जाते. परंतु मुळात वास्तूशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास तेर चैत्यगृह ही वास्तू बौद्ध कलेचा उत्कृष्ट नमुनाच ठरते.

त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहाला समोर मंडप आहे. हा आयताकृती असून त्याचा आकार 23 x 21 चौरस मीटर आहे. मंडपाला दोन प्रवेशद्वार आहेत. एक पूर्वेला आणि दुसरे उत्तरेला. प्रवेशद्वारावरील चौकटी व त्यावरील नक्षीकाम बघितल्यानंतर हे लक्षात येते की, हे नक्षीकाम व मंडप नंतरच्या काळातील असावा. विटांनी आणि लाकडी खांबाच्सा साह्याने बांधलेला हा मंडप चार ते सव्वा चार मीटर उंचीचा आहे. याचे छप्पर सपाट असून ते लाकडी खांबांनी तोलून धरलेले आहे. छपरावर विटांचा थर असून मंडप बाहेरून चुन्याने लेपलेला आहे .

मंडपाच्या बाहेरील भागावर उठावात अर्धस्तंभ असून गोलाईच्या थराचे अलंकरण आहे. ही दोन्ही वैशिष्ट्ये चैत्यगृहाच्या बाहेरील भागावरही दिसून येतात. मंडप आणि चैत्यगृह या दोन भागाची काही वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर हे दोन्ही भाग एकाच वेळी बांधले गेले नाहीत हे लक्षात येते .चैत्याचा दर्शनी भाग मंडपापेक्षा साडेचार मीटर उंचीचा आहे. मंडपाच्या बांधणीसाठी वापरलेल्या विटा या चैत्यगृहाच्या बांधणीत वापरलेल्या असून त्यांची मांडणी रेखीव नाही. म्हणजे मंडप व चैत्यगृह यांची बांधणी सलग नाही. मंडपाचे चार खांब  मोठे आणि चार खांब लहान लाकडी असून त्यामध्ये मंडप हा नंतरच्या काळात बांधला गेलेला वाटतो. मंडपाचे खांब चौरसाकृती असून त्याच्या माथ्याला काही नक्षीदार अलंकरन केलेले आहे. मंडपाच्या छताच्या मध्यभागी उत्कृष्ट कोरीव काम केलेले पुष्पवर्तुळ आहे.

पूर्वीचा चैत्यगृह आवर म्हणजेच आत्ताच्या त्रिविक्रम मंदिरावर  पुष्प वर्तुळ वेली इत्यादीच्या उठावात नक्षी असून दुसरीवर चैत्य ,गवाक्ष आणि वेदिका ही बहुत शिल्पाशी निगडित असलेली नक्षी आहे.

गर्भगृहात असणारी त्रिविक्रमाची मूर्ती नंतर त्याठिकाणी प्रतिष्ठापित केली असल्याचे दिसून येते. चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरन झाल्याचे या ठिकाणी स्पष्ट निदर्शनात येते. वैष्णव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चैत्यगृहातील स्तूप उकडून टाकला गेला असावा. कन्झिन्सच्या मतानुसार हे मूळ बौद्ध मंदिर असून नंतर हिंदुनी त्याचा वापर पूजा करण्यासाठी केला व त्यानंतर त्याचे हिंदू मंदिरात रुपांतर केले गेले असावे. या त्रिविक्रम मंदिराची रचना ही बौद्ध चैत्याच्या धरतीवर आहे. याशिवाय गर्भगृहाच्या दर्शनी भागावरील चैत्य, गवाक्ष आणि वेदिका ही बौद्ध शिल्पांची निगडित आहे.

तेर येथी इतर अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर या अवशेषांचा संबंध बुद्धिष्ट तुपाशी असू शकतो. कारण दक्षिण भारतात अमरावती, नाशिक गुहा क्रमांक तीन येथे दगड कोरून तयार केलेल्या लेण्यांमध्ये या चैत्यगृहासारखे अनेक अवशेष आढळून आले.भारतात अनेक ठिकांणी बौद्ध स्थळांवर अतिक्रमण करून त्यांची मूळ ओळख त्यांच्यापासून हिरावून घेतली गेली आहे.अनेक बौद्ध मूर्तींची नासधूस तर बौद्धवास्तूचे धर्मांतरण करून त्यांची मूळ ओळख संपुष्टात आणली गेली आहे.कोणे एके काळी बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाने प्रेरीत झालेली भारत भूमी नंतरच्या काळात बौद्ध मूर्तीकला व वास्तूकला यांचा कर्दनकाळ ठरली.नियतिच्या विळख्यात असणारी आणि भारताचा प्रगल्भ प्राचीन इतिहास सांगणारी हि स्मारके मुक्त झाली पाहिजेत.ज्यासाठि तुम्हा आम्हा  अभ्यासकांना पुढाकार घ्यावा लागेल.

सदर चैत्यगृहाचे फोटो डाॅ.माधवी महाके व तारिक तांबोळी यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्याबद्दल त्यांचे आभार.

संदर्भ:

1)- Pleet j.Tagara  Journal Of the Royal Asiatic society P.537

2)-Cousens Henry , Ter -Tagara Archeological Surveyo of Indid   P.195

3)Dr.Deo Prabhakar ,The Temple of Marathwada P.25

4)डाॅ दिक्षित मो.ग. वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तुंचा परिचय पृ, ८०—८४.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर (९७३०३९३७५३)

Leave a Comment