थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग ३
थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग २ येथे वाचा
घाटवाटा – महाराष्ट्राच्या मावळतीस म्हणजे पश्चिमेस,घाटमाथ्यालगत,सह्याद्रीच्या कुशित,पुर्वेकडील उतारांवर काही नद्यांच्या खोर्यांना मावळे व नेरे म्हणतात.नेर म्हणजे नहर,पाण्याचा प्रवाह.सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पुर्वेकडील प्रदेश,ज्यामधून नद्या वाहतात,जेथे मोठ्या प्रमाणात पाऊस असतो व मोठ्या प्रमाणावर तांदूळ पिकतो.भागाला मावळ म्हणतात.मुंबई-पुणे रस्त्यावरील कार्ले लेण्यांच्या डोंगररांगेच्या उत्तरेला आंध्रा नदीचे खोरे आहे.हि नदी भिवपुरीच्या डोंगरांत उगम पावते व पुढे राजापुरजवळ इंद्रायणी नदीला मिळते.या नदिच्या खोर्याला आंध्र-आंदर-मावळ म्हणतात.शककर्ता शालिवाहन ज्या कुळात झाला तो महावंश म्हणजे सातवाहनांचे मुलस्थान आंदर मावळात असले पाहिजे.ज्या प्रमाणे कोकणातून वर येणारे घाट व त्यावर नियंत्रण करणारे किल्ले आपण पाहिले त्याचप्रमाणे मावळांवर नियंत्रण हे ही काही किल्ल्यांचे कार्य होते.’लोहगड’ किल्ल्यावरुन नाणे मावळ व आंध्र(आंदर) मावळ या प्रदेशांवर नजर ठेवण्यात येत असे.याच्या जोडीला कोकणदरवाजाचे रक्षणासाठी ‘राजमाची’ हा किल्ला आहे.’तुंग,तिकोणा व कोरी’ या गडांची हुकूमत पवनमावळावर आसून मुसे,मुठे व खेडे बारे या खोर्यांवर ‘सिंहगड’ नजर ठेवून आहे.तोरणा किल्ला हा गुंजण, कानद व वेळवंड खोर्यावर नजर ठेवून आहे.नंतरच्या काळात महाराजांनी तोरण्याच्या जोडीला ‘राजगड’ किल्ला बांधला.हिरडस मावळ व रोहिड खोरे या प्रदेशांवर रोहिडा उर्फ विचित्रगड या किल्ल्यांचा आधिकार होता.अशा बारा मावळे हि कोणत्या ना कोणत्या किल्ल्याच्या आधिन होती.विस्तार भयास्तव मी सर्व मावळांची माहिती देणे टाळतो आहे.
महाराष्ट्र हे जे सांस्कृतिक नाव आहे या नावामागे अनेक महावंशांचा इतिहास उभा आहे.ज्या ज्या ठिकाणी लढाया झाल्या,धारातिर्थे घडली त्या त्या ठिकाणी त्या महाकृत्यांची स्मारके आजही उभी आहेत.महाराष्ट्र केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर अटक पासून मद्रासपर्यंत व काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत आजूनही आमच्या विजयांची चिन्हे अस्तित्वात आहेत.भारतावर राजकीय व सांस्कृतिक परचक्रे आली तेव्हां तेव्हां त्याचे निर्मुलन व निवारण करण्यासाठी महाराष्ट्रच उभा राहिला आहे.शकोत्तर नाही तर शकपुर्व काळापासून हि महाराष्ट्राची परंपरा आहे.स्वातंत्र्यलक्ष्मीची पुजा महाराष्ट्राइतक्या एकनिष्ठतेने हिंदुस्थानातील दुसर्या कोणत्याही प्रदेशाने केलेली नाही.ग्रिक,शक व क्षत्रप हे तर परकीयच होते यांच्यासोबत खारवेल व हर्षवर्धन सारख्या आपल्याच स्वकीयांच्याही आक्रमणाला महाराष्ट्राने धिराने तोंड दिले आहे.तात्कालिन काळात स्वदेश,स्वधर्म व स्वातंत्र्य या नावाने परकियांच्या विरुद्ध ज्या ज्या उठावण्या झाल्या त्या सर्वांचा उद्गाता महाराष्ट्रच होय.भारतीयांच्या पापक्षालनासाठी महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांनींत रक्ताचं अर्ध्य या भारत भूमीला वाहिले हाच आमचा इतिहास आहे.तो उदंड आहे,प्रेरणदायी आहे.
“हि सर्व प्रेरणा देणारा,हि वृत्ती व निष्ठा अंगी भिनवणारा.आमच्या मनामनांत सहिष्णुतेचा पोत पाजळवणारा!परकिय आक्रमणं व अन्यायाच्या विरुद्ध मनातील शक्तीचे रुपांतरण तलवारीत करणारा आमचा धगधगता प्रेरणास्त्रोत आपल्या पाठीशी उभा आहे.तोच आपल्या स्वातंत्र्याचे व शक्ती,निष्ठेचे ‘अधिष्ठान’ आहे तो म्हणजे माय बाप सह्याद्री.त्याच्याशी आपण मनाने ‘इमानीच’ राहिले पाहिजे.!”
(टिप-चुकभूल देणे घेणे.लेखात सर्वच घाटांची नावे देता आलेली नाहीत.जे जे मुख्य घाट वापरात होते.त्यांचाच विचार या लेखात केलेला आहे.)
धन्यवाद…..!
संदर्भ-
सह्याद्री
-स.आ. जोगळेकर
संकलन-
नवनाथ आहेर