महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,301

ठाण्याचा किल्ला | त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार

By Discover Maharashtra Views: 1584 7 Min Read

त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार असणारा ‘ठाण्याचा किल्ला’ –

आज जिथं ठाण्याचं मध्यवर्ती कारागृह आहे तोच ठाण्याचा किल्ला. हेच ते ठिकाण जिथून 1816 सालच्या 12 सप्टेंबरला इंग्रजांच्या तावडीतून शेवटच्या पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळेंनी इतिहासप्रसिद्ध पलायन केलं. खाडीच्या काठी उभा असलेला, भक्कम तटबंदी लाभलेला, पोर्तुगिजांनी बांधलेला हा कासवाच्या आकाराचा किल्ला खरोखरचं अप्रतिम आहे.

ठाण्याचा किल्ला | त्रिंबकजी डेंगळे यांच्या पराक्रमी सुटकेचा साक्षीदार

ग्रँट डफ (मराठ्यांचा आद्य इतिहासकार) आपल्या History of Mahrattas (Vol.3, Page no. 377) या ग्रंथात म्हणतो त्याप्रमाणे ‘त्यावेळी या घटनेला लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं रूप दिलं आणि त्रिंबकजींची प्रसिद्धी मराठी मुलुखात फार मोठ्या प्रमाणावर वाढली, इतकी की पेशव्यांच्या कारभारीपदी असतानाही पूर्वी त्यांना मिळाली नसेल.’ यावरून या घटनेचं महत्त्व लक्षात येण्यासारखं आहे. तसचं ग्रँट डफ हा त्रिंबकजींचा समकालीन होता हेसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.

1815 साली त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर बडोद्याचे वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या पंढरपूरला झालेल्या खुनाचे आरोप इंग्रजांकडून ठेवण्यात आले. इंग्रजांनी त्रिंबकजींची मागणी पेशव्यांकडे केली. आधी वसंतगड (कराडजवळ) इथं पेशव्यांनी त्यांना ठेवलं, पण त्यावर इंग्रजांचं समाधान झालं नाही. त्रिंबकजी आमच्याच कैदेत असावे असं म्हणून एल्फिन्स्टननं (पुण्याचा इंग्रज रेसिडेंट) पेशव्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या आणि पेशव्यांचा सरदार, सल्लागार, कारभारी असणाऱ्या त्रिंबकजींना दूर करण्याची आयती संधी इंग्रजांना मिळाली. मग वेल्लोर, श्रीरंगपट्टणम, चुनार व कलकत्ता ही ठिकाणं त्यांना ठेवण्यासाठी इंग्रजांकडून ठरवली गेली. पेशव्यांची त्याला मान्यता नव्हती. शेवटी कंपनी सरकारच्या मुलुखात असणारा ठाण्याचा किल्ला हे ठिकाण निश्चित केलं गेलं. त्यांना वसंतगडाहून ठाण्याला आणण्यात आलं. वर्षभर ते इथं कैदेत होते. 12 सप्टेंबर 1816 च्या भल्या पावसाच्या रात्री त्यांनी किल्ल्यातून मोठ्या शिताफीनं पलायन केलं. हे खुनाचे आरोप व अटक सगळं संशयाच्या आधारावर होतं. चौकशी म्हणता म्हणता इंग्रज तेव्हाही आणि नंतर त्यांचं राज्य आल्यावरही ठोस पुराव्याच्या आधारे हा खून त्रिंबकजींनी केला हे सिद्ध करू शकले नाहीत. आजवर हा खून गूढ आणि अनाकलनीयच राहिला आहे. असो.

त्रिंबकजींनी ठाण्यातून नेमकं कसं पलायन केलं याचं एक कथानक आपण ऐकलेलं असतं. ते असं,

त्रिंबकजींवर ठाण्याच्या तुरुंगात कडक पहारा असतो. पहाऱ्यावर ठेवलेले सर्वजण युरोपियन असतात. एक मराठी माणूस काही दिवसांनी किल्ल्याचा तुरुंग अधिकारी एल्ड्रिज यांच्या घोड्याच्या मोतद्दाराची (मोतद्दार म्हणजे घोड्याची निगा राखणारा) नोकरी धरतो. तो त्रिंबकजींना ऐकू जाईल अशा आवाजात रोज गाणी (पोवाडा) गात असायचा. तिथल्या युरोपियन मंडळींना त्यातलं काहीएक कळत नसायचं. त्रिंबकजीना मात्र त्यातून संदेश जायचा. अशा रीतीने पलयानाची योजना ठरली. त्रिंबकजींना रोज सकाळ व संध्याकाळी ठरलेल्या वेळेत शौचास नेलं जायचं. एके दिवशी संध्याकाळी त्यांना नेहमीप्रमाणे शौचालयात नेण्यात आलं. बाहेर तुफान पाऊस आणि अंधार होता. पहारेकरी बाहेर थांबले. त्रिंबकजी शौचालयात गेले. तिथून ते जवळच्या तबेल्यात उतरले, तिथल्या खिडकीचे गज आधीच काढून ठेवले होते. नंतर किल्ल्याच्या तटबंदीवर चढले. तिथून खाली उतरले. ठाण्याची खाडी पोहून पलीकडे गेले. तिथं त्यांची माणसं तयारीत होतीच. त्यांच्यासोबत ते रात्रीतून घाटावर म्हणजे इगतपुरी, सिन्नर भागात रवाना झाले.

उपरोक्त कथानक हे खरं आहेच. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या चौकशीतूनच ते समोर आलं. तो मोतद्दारसुद्धा त्या दिवसापासूनच गायब झाला. तो गात असलेल्या पोवाड्याच्या काही ओळीसुध्दा इंग्रजीत उपलब्ध आहे (बिशप हेबरने त्याची नोंद आपल्या प्रवासवर्णनात केली आहे). प्रसिद्ध कादंबरीकार ना. सं. इनामदार यांच्या ‘मंत्रावेगळा’ कादंबरीतही आपण हे कथानक वाचलं असेल. परंतु हे तितकच नाही, हा केवळ त्याचा एक वरवरचा आणि तात्कालिक भाग झाला. पुढे काही वर्षे गेल्यानंतर, म्हणजे मराठी राज्य जाऊन इंग्रजांचं राज्य आलेलं असतं तेव्हा इंग्रजांना या प्रकरणासंबंधी एक ‘क्लू’ मिळतो. केस रिओपन होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. मग बरच कायकाय बाहेर येतं.

हा पलायनाचा कट फार मोठा असून त्यात अनेक छोट्यामोठ्या व्यक्ती आणि घटना समाविष्ट आहेत. एक मराठा महिलेची (लक्ष्मीबाई ?) या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. मुंबईच्या ब्रिटिश सॉलिसिटरला दिलेली पन्नास हजार रुपयांची लाच, भिल्लांच्या टोळ्या किल्ल्यात घुसवण्याची योजना, ‘त्या’ महिलेने विकलेले आपले ऐंशी हजार रुपयांचे दागिने, त्रिंबकजींना रोज देण्यात येणाऱ्या दुधाच्या पेल्यातील तांब्याच्या डबीत असणारा संदेश, साधूच्या वेशात ठाणे परिसरात वावरणारे लोक असं बरंच काय काय थक्क करणारं त्यात आहे. एकंदरीत हे प्रकरण फार मोठं आणि रोमांचक आहे. त्रिंबकजींच्या ठाण्यातून सुटकेवर एखादा भन्नाट चित्रपट निघू शकेल हे तर नक्की. असो.

ठाण्याच्या तुरुंगातून पळाल्यानंतर त्रिंबकजींनी खानदेश व शंभू महादेवाच्या डोंगररांगांत भिल्ल, मातंग, रामोशी समाज संघटित केला. इकडे पेशवे आणि इंग्रज यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात तह होतो. त्यात त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना जामीन म्हणून ठेवण्याची अट असते. इंग्रज त्रिंबकजींच्या कुटुंबीयांना ठेवतात ते ही ठाण्याच्याच किल्ल्यात.

त्रिंबकजी डेंगळे यांना पुन्हा एकदा इथं ठेवण्यात येतं. तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धानंतर 1818 त जेव्हा सासुरवाडी अहिरगाव इथं त्यांना पकडलं जातं, त्यानंतर चांदवड, नगर आणि नंतर ठाण्याच्या तुरुंगातच पुन्हा आणलं जातं. पुन्हा सात आठ महिने ठाणे. तिथेही त्रिंबकजी शांत बसले नव्हते. पुन्हा पलायनाचे अनेक कट बाहेर आकार घ्यायला लागले होते. मग त्यांना तेथून हलवून मुंबई, समुद्रमार्गे कलकत्ता व नंतर काशीजवळील चुनार इथं नेण्यात आलं. जिथं दहा वर्षे कारावासात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

ठाण्यावर 1530 ते 1737 या काळात म्हणजे तब्बल दोन शतकं पोर्तुगिजांचा अंमल होता. त्यांनीच मोक्याचं ठिकाण पाहून हा किल्ला बांधला. त्यासाठी तज्ज्ञ इंजिनीअर्स पोर्तुगाल मधून बोलवून घेतले. नंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1782 च्या मराठे व इंग्रज यांच्यात झालेल्या सालभाईच्या तहाने किल्ला इंग्रजांकडे आला. मुंबई व आसपासचा प्रदेश हा कंपनी सरकारच्या बराच पूर्वी ताब्यात आलेला होताच, त्याला हा प्रदेश जोडला गेला. मग किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर इंग्रजांनी सुरू केला. त्रिंबकजी तसे इथले पहिले राजकीय कैदी. 1848 साली क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना फाशी देण्यात आली ती इथंच. तसचं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या खूनप्रकरणी अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या तिघांना 1910 मध्ये इथं फाशी देण्यात आली. सावरकरांना अंदमानला पाठवण्याआधी इथं ठेवण्यात आलं होतं. 1942 च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान तर स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंग खचाखच भरलं होतं.

कारागृह असल्याने किल्ला पाहण्यासाठी खुला नसतो. किल्ल्याचा काही भाग स्मारकाच्या रूपानं सर्वसामान्यांसाठी आगामी काळात खुला करून देण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. काही काळापूर्वी तुरुंगात कैदेत असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे फोटोज तिथे लावण्यात आले. त्रिंबकजी डेंगळे यांचाही फोटो त्यात होता. त्रिंबकजी डेंगळे यांचा तेथील फोटो कारागृह प्रशासनाने नंतर उपलब्ध करून दिला, तो पोस्टमध्ये जोडला आहे.

सुमित अनिल डेंगळे

संदर्भ-

  1. History of Mahrattas(Vol.3)- James Grant Duff
  2. Poona Residency Correspondence (Vol. 13)
  3. मराठी रियासत (खंड 8)- गो. स. सरदेसाई
  4. मराठी विश्वकोश- ठाणे किल्ला
Leave a Comment