महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,343

सिंहगडाचे युद्ध आणि लोककथा

Views: 1983
11 Min Read

सिंहगडाचे युद्ध आणि लोककथा –

कोंढाणा किल्ला पुरंदर तहाच्या वेळी हा किल्ला १४ जून १६६५ रोजी मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला . शिवाजी महाराज आग्रा भेटीवरून सुखरूप स्वराज्यात आले . महाराज्यांनि तह मोडून कोंडाणा स्वराज्यात आणण्याचा निश्चय केला . कोंढाणा सर करण्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली . तानाजी मालुसरेनी कोंढाणा स्वराज्यत आणला परंतु या युद्धात तानाजींनी कोंढाण्यावर आपला देह ठेवला ४ फेब्रुवारी १६७०.(सिंहगडाचे युद्ध आणि लोककथा)

सिंहगड युद्धात काही लोककथा उद्यास आल्या त्याचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न

१) “गड आला पण सिंह गेला” असे शिवाजी महाराज उद्गारले त्यामुळे कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले .
२) कोंढाणा घोरपडीच्या साह्याने सर केला गेला
३) शेलार मामा ?
४) आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे
५ ) उदयभान हिंदू रजपूत कि मुस्लिम

१ ) ” गड आला पण सिंह गेला ” असे शिवाजी महाराज उद्गारले त्यामुळे कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले .

सभासद बखर :- गड फत्ते केला असे सांगताच राजे म्हणू लागले कि “ एक गड घेतला परंतु एक गड गेला ! ”
शेडगावकर भोसले बखर :- शिवाजी राजे म्हणू लागले कि एक गड घेतला परंतु एक गड गेला.
सप्तप्रकरणात्मक चरित्र :- किल्ला घेतला. हे वर्तमान कळविल्यावर महाराज किल्ला पाहावयास गेले. किल्ला फारच चांगला पाहून किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. परंतु सिंहगड स्वराज्यात होता तो तहाच्या वेळी मोगलांकडे गेला. त्यामुळे किल्ला पाहून शिवाजी महाराज्यांनी नाव सिंहगड केले हे बखरकाराचे विधान चुकीचे ठरते.

इ. १६५६ मुहम्मद आदिलशहा अर्धांगवायूच्या दुखन्याने आजारी पडला व दरबारात हिंदू विरोधी व हिंदू पक्षपाती असे दोन तट पडले . या परिस्थितीचा फायदा घेऊन महाराज्यानी गड आपल्या ताब्यात घेतले व त्यांना नवी नावे दिली तेव्हाच कोंढाना हस्तगत करून सिंहगड नाव दिले असावे.

शिवचरित्र प्रदीप पान नं ५०, शिवापूर दफ्तरातील यादी:- शके १५७८ भाद्रपद वद्य एकादशीस गडाची नावे ठेविले

संदर्भ :- सिंहगड :- गणेश हरी खरे

शिवाजीमहाराज्यानी मोरोपंत पेशवे आणि निळो सोमदेव मुजुमदार याना ३ एप्रिल १६६३ रोजी पत्र लिहिलेले आहे. महाराज कोकणामध्ये नामदारखान याच्यावर स्वारी करणार होते . त्यावेळी सिंहगडावरून बातमी आली कि गडावर फितुरी झाली आहे. त्यामुळे महाराज्यांनी कोकणामध्ये जाण्याचा बेत रद्द केला. व मोरोपंत पेशवे आणि निळो सोमदेव याना आज्ञा केली पत्र मिळताच सैन्य घेऊन सिंहगडावर जाऊन खबरदारी घ्यावी. फितुरी कोणी केली हे शोधून पत्र लिहुन पाठवणे. तान्हाजी नाईक , कोंडाजी नाईक, हंडे , कमळोजी नाईक , दरेकर , रुपाजी आहिरे, गोंदजी पांढरे यांना बरोबर घेऊन सिंहगडावर जावे सिंहगडावर वेगवेगळ्या ठिकाणी सावधपणे राहणे. जे लोक फितुरीत असतील त्याना व आपल्या बरोबर असलेले लोक याना वेगवेगळे ठेवणे

या पत्रामध्ये सिंहगड हा शब्द आला आहे. तान्हाजी नाईक म्हणजेच तानाजी मालुसरे असू शकतात त्यामुळेच महाराज्यांनी सिंहगड किल्ला घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांची निवड केली असावी .

संदर्भ :- शिवकालीन पत्र सार संग्रह १ पत्र क्र. ९२५

या शिवकालीन पत्रामुळे तानाजी मालुसरेच्या बलिदानामुळे कोंढाणाचे नाव सिंहगड झाले या गोष्टीस तडा जातो

२ ) कोंढाणा घोरपडीच्या साह्याने सर केला गेला

सभासद बखर :- तानाजी ५०० माणूस घेऊन गडाखाली गेले . आणि दोन चांगले मावळे निवडून रात्री गडाच्या कड्यवरुन चढविले. ज्याप्रमाणे वानर चालून जातात त्याच प्रमाणे कड्यावर चालून गेले आणि गडावर जाऊन तेथून माळ लावून तानाजी मालुसरेंसह ३०० लोक गडावर गेले.

सप्तप्रकरणात्मक चरित्र :- मालुसरे यांनी भेद करून, माळ लावून वरती चढले

शेडगावकर भोसले बखर :- निवडक मावळे लोक तयार करून ते रात्रीच गडाचे खाली जाऊन कड्यावर वानराप्रमाणे चढुन गडावर जाऊन तीथून माळ लावली आणि ३०० लोकांसह तानाजी गडावर गेले. घोरपडीच्या साह्याने किल्ला सर केल्याचा उल्लेख उत्तरकालीन पोवाड्यामध्ये येतो

३ ) शेलार मामा ?

शेलारमामा यांचे नाव सिंहगड युद्धात कोणत्याही बखरीत येत नाही. शेलारमामांचे वय ८० वर्ष असून त्यांनी उदयभानास मारले असे पोवाड्यात नमूद आहे परंतु इतकी वयोवृद्ध असलेली व्यक्ती उदयभानास मारू शकेल हे असंभवनीय वाटते. उदयभानास तानाजीने मारले असे बखरकार सांगतात.

सभासद बखर :- मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून , त्याजवरि वोढ घेऊन दोघे महारागास पेटले. मोठे युद्ध केले. एकाचे हाते एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारे पडले. दोघे ठार झाले.

शेडगावकर भोसले बखर :- उदयभान व तानाजी यामध्ये युद्ध झाले त्यावेळी तानाजीची ढाल तुटली . तानाजींनी हाताची ढाल करून लढले त्यामध्ये दोघेही ठार झाले .

मराठ्यांची बखर :- तानाजी मालुसरा यांने सिंहगड घेतला आणि त्याच वेळेस तेथेच मृत्यू पावला

जेधे शकावली :- मग वद्य नवमीला कोंढाणा किल्ला जिंकला. किल्लेदार उदयभान मारला गेला. शिवाजी राजांकडील सुभेदार तानाजी मालुसरे याना या लढाईत मृत्यू आला.

राज्याभिषेख शकावली :- उदयभान किल्लेदार मारिला तेव्हा तानाजी मालुसरा हशम सर सुभेदार पडिला

पुणे देशपांडे होनप शकावली :- माघ वाद्य ९ सुक्रवारी कोंढाणा घेतला उदयभान किल्लेदार मारिला तानाजी मालुसरा राज्याकडील हशमचा सुभेदार पडला

४ ) आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे

सिंहगड युद्धात कोणत्याही बखरीत हे विधान नाही येत नाही किंवा रायबाचे लग्न असल्याचे उल्लेख नाही. “आधी लगीन सिंहगडचे मग करिन रायबाचे ” हे देखील पोवाड्यावरून आलेले विधान आहे .

५ ) उदयभान हिंदू रजपूत कि मुस्लिम

सभासद बखर :- गडावरी उदयभान रजपूत होता

सप्तप्रकरणात्मक चरित्र :- किल्लेदार उदयभान रजपूत होता

शेडगावकर भोसले बखर :- किल्लेदार उदयभान रजपूत तो दिल्लीवाल्यांकडील सरदार होता

शिवभूषण :- निनाद बेडेकर :- राठिवरौ कौ संहार भयौ भिरि के सरदार गिर्यो उदैभानौ ।। ९२ ।।

( राठोडांचा संहार होऊन त्यांचा सरदार उदयभान हा लढाईत पडला )

कल्याण दरवाज्याकडून नैऋतेकडील बुरुजाकडे जाताना बुरुजाजवळ उंचवट्यावर एक थडगे आहे. उदयभान राठोड याचे थडगे असावे असा समज आहे . परंतु उदयभान हा रजपूत हिंदू होता त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत . उदयभानाने मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर त्याचे नाव औरंगजेबाने बदलण्यास सक्ती केली असती. त्यामुळे उदयभान हिंदू होता हे निश्चित त्यामुळे ती कबर उदयभानाची असणे शक्य नाही . उदयभानाने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे एका लोकप्रिय कादंबरी मध्ये उल्लेख येतो

लोककथा जनसामान्याच्या मनात कशा प्रकारे रुजल्या गेल्या त्याला पुढील दोन गोष्टी कारणीभूत ठरतात

१ ) तानाजीचा पोवाडा :-

पोवाड्याचा सारांक्ष :- जिजाबाईंनी शिवाजी महाराज्याना सिह्गड घेण्याची आज्ञा दिली. तानाजी मालुसरे यांची गड घेण्यासाठी निवड करण्यात आली आणि उमरठे या गावी तानाजींना निरोप गेला सैन्यासह येऊन भेटावे . तानाजींनच्या घरी मुलगा रायबा याचा लग्न सोहळ्याची तयारी चालू होती . ऐंशी वर्षाचे शेलारमामा यांनी तानाजींना सिंहगड मोहिमेसाठी विरोध केला. रायबाने माझे लग्न कोण करणार म्हणून विचारणा केली. परंतु तानाजींनी निश्चय केला ” आधी लगीन सिंहगडचे मग करिन रायबाचे ”

तानाजीं जिजाबाईंची भेट घेऊन सिंहगडास रवाना झाले . प्रथम गडाची माहित काढण्यासाठी तेथील कोळ्यांना आपल्या बाजूने वळवले आणि कोळ्यांना किल्याची सरदारकी देण्याचे आश्वासन दिले . कल्याण दरवाज्याजवळ येऊन यशवंती घोरपड किल्य्याला लावली परंतु घोरपड मागे फिरली तेव्हा घोरपडीला तुझी खांडोळी करिन आणि शिळ्या भाकरी संगे खाईन असा दम भरला घाबरून घोरपड गडाला नखे रोवून बसली.

तानाजीने गडावर गेल्यावर ९०० पठाण मारले., चांद्रवळ हत्ती , सिद्धी हिलाल मारले. उदयभानाला बातमी कळताच त्याने मोगलांना पत्र लिहिले आणि आपल्या बारा मुलांना तानाजींवर धाडले परंतु तानाजीने त्यानं यमसदनी पाठवले., उदयभानास हि वार्ता कळताच ९०० पठाणासह तो तानाजी समोर आला उदयभानाने तानाजीला मुगलांची चाकरी करण्यास व गडाची किल्लेदारी देण्याचे आश्वासन दिले . तानाजी आणि उदयभान यांच्या युद्धात तानाजी पडले . शेलार मामा यांनी तानाजीचा पट्टा घेतला आणि उदयभानास ठार केले. भगवा झेंडा फडकावला आणि तोफांचे पाच बार उडवले . तानाजीना पालखीतून राजगडी आणण्यात आले . रायबाचे लग्न शिवाजी महाराज्यांनी लावून दिले

पोवाड्याची रचना :- तुळशीदास , संदर्भ :- ऐतिहासिक पोवाडे :- य. न. केळकर

या पोवाड्यात गेट-ग्याट , गेटकरी असा इंग्रजी शब्ध आला आहे आणि मंडईच्या वाड्यात पट्टी भरणे , चांदवडी रुपया , मंडईचा बाजार हे उत्तर पेशवाईतील रूढ असू शकणारे पदसमूह आहेत. शिवाय एकंदर शब्धरचना , कथावर्तन इत्यादींत इतकी अस्वाभाविकता , अतिशोक्ती वैगरे दोष आहेत कि हा पोवाडा रचणारा शाहीर तुळशीदास समकालीन असणे शक्य नाही. न्हवे तर तो निश्चयाने उत्तर पेशवाईतील व कदाचित अव्वल इंग्रजीतील असून पोवाडा रचताना त्याने घटना कशी घडली याची फारशी चौकशी केली नसावी. त्यामुळे बखरी व पोवाड्यातील माहिती यात पुष्कळ तफावत पडली आहे .

संदर्भ :- सिंहगड :- गणेश हरी खरे

२ ) गड आला आणि सिंह गेला :- ह.ना.आपटे

श्री. हरी नारायण आपटे यांनी १९०४ साली गड आला आणि सिंह गेला हि कादंबरी लिहिली. हि कादंबरी लोकप्रिय झाली त्यात कमलकुमारी , जगतसिंग व त्याची पत्नी देवलदेवी ,तोताराम गोंधळी अशी पात्रे उदयास आली

उदयभान दासी पुत्र असल्याने कमलकुमारीने त्याच्याशि लग्नास नकार दिलेला असतो . रजपूत राजकन्या कमलकुमारी पतीच्या मृत्यूनंतर सती जात असते त्यावेळी उदयभान नावाचा राजपूत ज्याने मुस्लिम धर्म स्वीकारून औरंगजेबाच्या चाकरीत आहे तो कमलकुमारीला थांबवतो व कैद करून औरंगजेबाकडे नेतो. औरंगजेबाच्या आज्ञेने कोंढाने किल्य्यावर घेऊन येतो. तानाजी आपल्या मुलाचे लग्न सोडून कोंढाणा सर करण्यासाठी येतात. गडाच्या खाली कोळ्यांच्या वस्तीत लग्न असते. गोंधळाला तुळशीदासाचा भाऊ तोताराम यांस बोलावतात. तानाजी गोंधळ्याचे रूप घेऊन कोळ्यांना आपल्याकडे वळवतात. जगतसिंग व त्याची पत्नी देवलदेवी कमलकुमारीस सोडवण्याचे प्रयत्न्न करतात पण त्यांना अपयश येते . तानाजी घोरपडीच्या साह्याने गडावर जातात. युद्धात तानाजी पडतात तेव्हा शेलारमामा उदयभानास मारतात . कमलकुमारीला शिवाजी महाराज सती जाण्याची परवानगी देतात,. कोंढाण्याचे नाव सिंहगड करतात.

कादंबरीत तुलसीदास गोंधळी पोवाडे करीत असे व तो सिंहगड युद्धाच्या आधी निधन झाल्याचे सांगते मग तानाजीचा पोवाडा :- ऐतिहासिक पोवाडे तुळशीदासाचा कसा ?

तानाजीवरील पोवाडा व कादंबरी यांचा आधार घेऊन कथा , चित्रपट तयार झाले त्यामुळे सिंहगड युद्धाविषयी लोकथा निर्माण होऊन जनमानसाच्या मनावर कायमच्या बिंबवल्या गेल्या .(सिंहगडाचे युद्ध आणि लोककथा.)

श्री. नागेश सावंत.

भारतीय टपाल खात्याने काढलेले सिंहगडावरील टपाल तिकीट

Leave a Comment