महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,779

पेशवाईतील पहिली रंगपंचमी

By Discover Maharashtra Views: 1378 8 Min Read

पेशवाईतील पहिली रंगपंचमी –

पेशवे सवाई माधवराव यांच्या काळात पेशवाईतील पहिली रंगपंचमी साजरी झाली . पेशवाईत पहिली रंगपंचमी कशी खेळली गेली त्याविषयीचे वर्णन “ पेशव्यांची बखर “ यात आले आहे.

आता पुढे रंगाचा समारंभ करावयाचा असे नाना व तात्या व पाटीलबोवा यांचे बोलणे होऊन , तिघेही उठून , श्रीमंत आरसे महालात होते तेथे त्रीवर्ग जावून , श्रीमंतांपाशी पाटील बोवा मुजरा करून बसले. त्या दिवशी दरबार आरसे महालातच झाला. असे बसले आहेत तो पाठीमागून आपा बळवंत व अमृतराव पेठे व माधवराव रामचंद्र , बन्या बापू मेहंदळे , निळकंठराव खाजगीवाले , महादजीपंत गरुजी , त्रिंबकराव राजे बहादूर , बहिरो अनंत पुरंदरे , परशुराम भाऊ पटवर्धन , रंगराव ओढेकर , विंचूरकर , पानशे , मराठे सरदार मंडळी असा दरबार त्या आरसे महालात झाला असता, महादजी शिंदे यांणी श्रीमंतास विनंती केली की ,

“ हिंदुस्थानात मोठे राजे रजवाडे हुताशनीचां रांग खेळतात तसा रंग पुण्यात व्हावा . आता हुताशनी तर गेली. परंतु चैत्र शुद्ध प्रतिप्रदेस तसा रांग करावा . असे माझे मनात आहे. परंतु सरकारच्या मर्जीस येईल ते खरे , “ तेंव्हा समस्त कारभारी , मुतस्दी , सरदार , मानकरी व पागे बसले होते तितक्यांचा रुकार रंगा विषयी पडला . “साऱ्यांचे मनात हि गोष्ट आली. आता सरकारची आज्ञा काय ती व्हावी , “ असे बोलणे महादजी शिंदे यांचे ऐकून श्रीमंत म्हणतात . , “ तो रांग राजेरजवाडे कसे खेळतात ते सांगावे , “ त्याजवरून महादजी शिंदे यांणी जयपूरचा व उदेपुरचा व मथुरेचा व आग्र्याचा व गोकुळचा व वृंदावन येथील रंगाचा मजकूर श्रीमंतास विदित केला . तो ऐकून श्रीमंताचे मनात गोष्ट भरली व सर्वांचे रुकार पडले होते. त्याजवरून श्रीमंतांचे मनातही वाटले . “ आपण तसा रंग खेळावा. “ असे झाल्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिप्रदेचा नेम ठरला . पाटील बोवांस आज्ञा झाली कि , “ रंगांची तयारी करावी. “

वाड्यात रंग करावयाची आज्ञा खाजगीवाले यांस झाली. खेरीज ज्या रस्त्याने स्वारी जावयाची त्या रस्त्याने कारभारी व मुत्सदी व सरदार व पागे होते . तितक्यास सरकारची आज्ञा झाली की , इतक्या मंडळीने तुम्ही रंगाची तयारी आपआपले ठिकाणी करावी. “ तुम्ही दोहो ठिकाणी रंग मोठा करावा . “ अशी आज्ञा सर्वास होऊन दरबार बरखास्त झाला. पाटील बोवा आज्ञा घेऊन वानवडीस गेले.

मग शिंदे यांणी तयारी रंगाची आपले लष्करात केली . तसेच ज्या ज्या रस्त्याचे लोकांस आज्ञा झाली त्याणीही आपले ठिकाणी रंगाची तयारी दुरुस्त केली. तसेच शिंदे यांचे लष्करात रंगाची तयारी केली. खेरीज जागो जागी वाटेने सरकारचे व शिंदे यांजकडील हौद भरून ठेविले. गुलालांचा तयारी झाली. सरदार व मानकरी व पागे , पथके , शिलेदार , एकांडे , मुत्सदी व कारभारी व कारकून मंडळी असे तमाम तयार होऊन वाड्यापाशी आले. तशाचे सर्व फौज व हत्ती सांडणीस्वार असे तयार होऊन उभे राहिले . सरकारची ही निघण्याची झाली. निघावयाचे वेळेस वाड्यात थोरल्या चौकात बिछयत करून सरकारची स्वारी तिथे येऊन बसली .

त्यावेळेस नाना व तात्या व आपा बळवंत , पेठे , त्रिंबकराव परचुरे , नारोपंत चक्रदेव असे सर्व लहान थोर , खेरीज ब्राम्हण सरदार – रास्ते , विंचूरकर , श्री. ढेकर , बहिरो अनंत , राजे बहार , पानशे , पुरंदरे, माधवराव रामचंद्र , मराठे मंडळ , घोरपडे, निंबाळकर, पाटणकर , मोहिते , दरेकर , मानाजी फाकडे , नोताजी जाधवराव , पाठीमागोन पटवर्धन , माधवराव रामचंद्र बिनीवाले व बेहरे असे सर्व येऊन नाचास बसले. तमाम पागे धायबर , निकम , भोईटे, थोरात , बाबुराव अनंत , भास्कर जगन्नाथ , नीळकंठराव रामचंद्र , अवधुतराव येशवंत , असे बावन्न पागे बैठस येऊन दाखल झाले. वानवडीहून महादजी शिंदे तयार होऊन सरकारची स्वारी न्यावयास आले. असे समाज वाड्यात मिळाले. तेथे रांग खेळावयास प्रारंभ झाला. त्या रंगाची वर्णना किती करावी ? हजारो गुलालगोटे उडू लागले. रंगाचे बंब चालू लागले . तसाच गुलाल खंड्याचे खंड्या वाड्यात उडाला .

असा रंग खेळून सरकारची स्वारी सायंकाळाचे दहा घटिका दिवसास वानवडीस जाण्यास अंबारीत बसून खवासखान्यात महादजी शिंदे व आप्पा बळवंत पाठीमागे बसले. वाडा डावा घालून , सरकारची स्वारी बुधवारातून , कापड आळीने आदितवारात हरिपंत तात्यांचे वाड्यापाशी येईतोपर्यंत वाटेने सरकारचे लोकांनी रंग करून ठेविला होता त्यांनी एकच गर्दी रंगाची केली. तसेच हरिपंत तात्यांचे वाड्यापाशी स्वारी आल्यानंतर तेथे दोन घटीकापर्यंत रंगांचा मार झाला. त्या रंगाच्या योगाने रस्त्याने चिखल पडला. व शेकडो पल्ले गुलाल उधळला . असा दोन घटिका येथे रंग खेळून सरकारची स्वारी पुढे रांग खेळत चालली. शेकडो पल्ले गुलाल हत्तीवर ठेविला होत तो रस्त्यात उधळीत चालले . असा नाकझरी उतरून रास्ते यांचे पेठेतून चालले असता तसे खेळत रास्ते यांचे वाड्यापाशी आले. तेथे रास्ते यांनी रंगाचा समारंभ केला. गड्यावरून रंगाचे बंब उडू लागले. तेंव्हा स्वारीमध्ये जसा पर्जन्य पडतो असा रंग पडू लागला. दोन घटिक तेथे रंग खेळून वानवडीस स्वारी दाखल झाली.

मग जेथे श्रीमंत बसावयाची जागा केली होती, तेथे ते जावून बसले. तेंव्हा झाडून सरदार व मानकरी व पागे व मुत्सदी व कारकून त्या कचेरीस येऊन बसले. बसल्यानंतर दोन घटीकांपर्यंत नाच व गाणे झाले. नंतर रंग खेळावयास प्रारंभ झाला. रंग खेळता खेळता रंगाचे पाट नदीस मिळाले. असा रंग द्वापरयुगी श्रीकृष्ण भगवान खेळले . तसा कलियुगी श्रीमंत सवाई माधवराव खेळले. असा कोणी पुढे खेळावयाचा नाही व मागेही कोणी खेळला नाही. रस्त्यामध्ये गुलालांचा पेर व रंगाचा चिखल झाला तो किती गणतीस धरावा ? असा रंग खेळल्यानंतर सरकारची स्वारी स्नानास उठली त्यासमयी शिंदे यांनी शेकडो कढया पाण्याच्या तापत ठेवलेल्या होत्या . शेकडो ब्राम्हण पाणक्ये घंगाळ घागरी घेऊन उभे . असा स्नानाचा बंदोबस्त ब्राम्हण मंडळीचा झाला. तसाच मराठे सरदार , मानकरी , यांचा बंदोबस्त केला होता.

मग अवघ्यांची स्नाने झाल्यानंतर ज्या कचेरीस रंग खेळले त्याच मखमली डेऱ्यात फरास याने येऊन ती बिछायत काढून , नवी बिछायत घालून तयारी केली. सर्व मंडळी लहान थोर स्नाने करून नवीन वस्त्रे घेऊन कचेरीस बसली. मग नाचास प्रारंभ झाला. मग महादजी शिंदे यांनी श्रीमंतास सर्व पोषाग जवाहीर शीरपेच व तुरा वैगरे गळ्यात मोत्यांचा माळा असा दिला. तसेच सर्व कारभारी , मुतस्द्दी व कारकून मंडळी व शिलेदार लोक व मानकरी व हुजुरातेचे लोक व पागे पथके असे सर्वांस शिंदे ह्यांनी पोषाग वाटून नंतर पानसुपारी , अत्तर , गुलाब , हारतुरे, गजरे दिले. इतका समारंभ होई तो तीन घटका रात्र झाली.

मग सरकारची स्वारी पुण्यास यावयास निघाली तेंव्हा हजार पाचशे दुशाका हत्तीवर लावून मोठ्या थाटाने स्वारी मोठ्या डौलाने चालली. ज्या समयी स्वारी माघारी आली त्यासमयी शहरात दुरुस्ता चीराखदाने करून लोक आपापल्या माड्यांवरून दिवे लावून तमाशा पहावयास उभे राहिले. त्यांनी त्या दिवशी सोन्यारुप्याची फुले श्रीमंताचे अंबारींवर उडवली. अशा थाटाने स्वारी वाड्यात दहा घटिका रात्रीचे अमलात दाखल होऊन श्रीमंत मसनदीवर बसले. सर्व मंडळीस पानसुपारी, अत्तरगुलाब देऊन घरी जाण्याची आज्ञा सर्वास झाली. त्यासमयी सर्वांनी नजरनजराणे करून आपले ठिकाणी सर्व लहानथोर गेले. असा पेशवाईतील पहिली रंगपंचमी रंगाचा समारंभ झाला.

संदर्भ :- पेशव्यांची बखर

Leave a Comment