महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,322

चौथे छत्रपती शिवाजी महाराज

By Discover Maharashtra Views: 3622 6 Min Read

चौथे छत्रपती शिवाजी महाराज –

करवीर छत्रपती राजाराम दुसरे  यांचे इ.स.१८७० ला अकाली निधन झाले. त्यांना पुत्र संतान नव्हते. पुन्हा गादीच्या  वारसाचा प्रश्न उपस्थित झाला. दत्तक घेणे अपरिहार्य होते. दत्तका साठी  निवड केलेला मुलगा राण्यांना पसंत पडला पाहिजे, नाही तर राजघराण्यात कटकटी वाढू लागतात. मुलाच्या पसंतीसाठी हालचाली सुरु झाल्या. योग्य मुलांची पाहणी करण्यात आली. एकूण सात मुलांची पाहणी झाली. या सात मुलांपैकी दिनकराव भोसले  सावर्डेकर यांचा मुलगा नारायणराव यांची निवड करण्यात आली. हा मुलगा बुद्धिमान आणि प्रकृतीने उत्तम व त्यांचा स्वभाव शांत आणि वागणे भारदस्तपणाचे होते.चौथे छत्रपती शिवाजी महाराज.

करवीर गादीवर ९ वर्षाचे  नारायण दिनकरराव भोसले अर्थात चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले .त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले .चौथ्या शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला .महाराजांचे उंचपुरे रुबाबदार व्यक्तिमत्व होते .

२३ ऑक्टोंबर १८७१ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्ताला त्यांचा दत्तक विधी संपन्न झाला .राज्यभिषेक करुन चौथे शिवाजी महाराज कोल्हापुर राज्याचे छत्रपती झाले .महाराजांना घोडेस्वारी ,शस्त्र-शास्त्र व राज्यकारभारत विशेष रुची होती .त्यांचे मराठी ,हिंदी,ईंग्रजी ,मोडी भाषेवर प्रभुत्व होते .ब्रिटीशांकडुन होणारे जुलुम छत्रपतींनी पाहीले  होते .त्याबाबत महाराजांकडे माहीती येत होती .आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत  व त्यांच्या  पुण्याईने हे राज्य मिळाले आहे.  रयतेच्या कल्याणाची फार मोठी  जबाबदारी आपल्यावर आहे या भुमिकेतुन सतत कार्यरत राहीले .

इ.स.१८७६ साली भारतात  फार मोठा दुष्काळ पडला होता .छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांनी कोल्हापुर संस्थानात दुष्काळ निवारण यंत्रणा राबवली ,दुष्काळावर मात केली . ठिकठिकाणी अन्नछत्रे घातली.  छत्रपतींची ही कामगीरी पाहुन जानेवारी १८७७ मध्ये ब्रिटिश साम्राज्याची महाराणी  व्हिक्टोरीया  यांनी छत्रपतीना ‘नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडीया’ हा किताब दिला .पण पुढे  काही दिवसांनी  छत्रपतींनी हा संन्मान नाकारला

पुढे  इ.स.१८७८ साली श्रीमंत वाघोजीराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह संपन्न झाला .छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापुर संस्थानात खुप मोलाचे  कार्य केले .रंकाळा तलाव निर्मीती कार्यास सुरवात , पुल उभारणी ,रस्ते, नवीन राजवाडा, शासकीय इमारती, कचेर्या ,टाऊन हॉल आदी वास्तुची  उभारणी याच काळात झाली.तेच आता कोल्हापुर शहराचे  वैभव आहे .

महाराजांनी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले .जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी  म्हणुन महादेव बर्वे याची नेमणुक केली .महाराज अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा सगळा कारभार दिवाण महादेव बर्वे हेच पहात होते. बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी धुर्त व्यक्ती होता. त्याने आपल्या संबंधित शंभरच्यावर लोक प्रशासनात घुसवले होते. त्याने  इंग्रजांच्या मदतीने राज्य खालसा करण्यासाठी कटकारस्थानाला सुरवात केली .महाराजांना वेड लागले आहे अशी अफवा महादेव बर्वे पसरवु लागले महाराजांचा मानसिक छळ करून त्यांना मनोरुग्ण ठरवण्याचा हा कट होता .ईग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतात बंदीस्त केले.

नंतर १९ जुन १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणेमार्गानी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हालवले. किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात त्यांना ठेवण्यात आले. त्या भागात कोणालाही फिरकण्याची बंदी होती. पक्क्या बंदोबस्तात ठेवलेल्या कैद्या सारखी महाराजांची अवस्था केली होती. खाजगी नोकराखेरीज फक्त इंग्रज प्रायव्हेट ग्रीन हाच दांडगा सैनिकगडी त्यांच्या सोबतीला ठेवला होता. या सर्वांचा अर्थ एवढाच होता की, त्यांना सर्व परिचीत व्यक्ती आणि वातावरण यापासून वेगळे काढून कैद्याप्रमाणे जीवन कंठावे लागत होते. त्यामुळे त्यांची मनस्थिती अधिकच बिघडत गेली होती. त्यांच्या पत्नीलाही त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले होते. एकांतात ठेवल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंबंधी बाहेर अनेक बातम्या पसरू लागल्या. प्रायव्हेट ग्रीन त्यांना बेदम झोडपून काढत असल्याचे समजू लागले. त्यांची छळवणूक अधिक होत असल्याच्या बातम्या बाहेर पसरू लागल्या. त्यामुळे लोकांचा संताप अधिकच वाढू लागला. महाराजांचा मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता.

ग्रीन हा अंगरक्षक नसुन भक्षक होता .तो महाराजांचा मानसीक छळ करत होता. एके दिवशी महाराजांनी ग्रीन वर झडप टाकली आणि ग्रीनला उचलुन आपटले. नरपशु आडदांड ग्रीनने महाराजांच्या पोटावर बुटाने जबरदस्त प्रहार केला .महाराज जमीनीवर कोसळले .महाराजांचा सेवक मल्हारीने धाव घेतली व  महाराजांचे डोके आपल्या मांडीवर  घेतले .महाराजांनी मल्हारीच्या मांडीवरच “जगदंब जगदंब” म्हणत प्राण सोडले, तो दिवस होता २५ डिसेंबर १८८३ .छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांचे अवघ्या विसाव्या वर्षी निधन झाले

छत्रपती शिवाजीरामहाराजांवर अहमदनगर येथे  दिल्लीगेट पुढील परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात असताना मारला गेला हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच अंत्यसंस्कार उरकून घेतले. अंत्यसंस्कारासाठी कोल्हापुरचे कोणीही उपस्थीत नव्हते ,महाराजांना अग्नी देण्याचे काम परशुराम ऊमाजी भोसले यांनी केले.

शिवाजीमहाराजांच्या मृत्यूला त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या ग्रीन या आंडदांड शिपायाची दांडगाई कारणीभूत झाली ही गोष्ट नंतर अप्रत्यक्षपणे खुद्द पोलिटिकल रेसिडेंट च्या अहवालात उल्लेखिली आहे. ते म्हणतात २ डिसेंबर १८८३ रोजी मी अहमदनगरच्या किल्ल्यात महाराजांची भेट घेतली. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक होती .त्यांना थोडा ताप येत होता एवढेच. मी त्यांच्याशी बोललो .त्यांनी मला ओळखले. त्या भेटीच्या वेळी महाराजांना इतक्या तडकाफडकी मृत्यू  येईल असे मला मुळीच वाटले नाही.

छत्रपतींच्या मृत्युनंतर नगर येथे त्यांच्या शवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांची प्लीहा फुटून मृत्यू आल्याचे दिसून आले. नगर येथे त्यांची समाधी आहे. आता भव्य सुंदर स्मारक बांधले  आहे .

चौथ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर पुढे राजर्षि शाहु  महाराज करवीर संस्थानचे  छत्रपती झाले .राजर्षी शाहु महाराजांनी अहमदनगरला येऊन समाधीचे दर्शन घेतले .आपल्या वडीलांची स्मृती चिरंतन राहावी म्हणुण त्यांच्या नावानी वस्तीगृह सुरु करण्याची त्यांची प्रबळ ईच्छा  होती ,त्यांची ईच्छा व प्रेरणेतुन पुढे  १९१४ रोजी “श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डींग हाऊस अहमदनगर “या नावानी वस्तीगृह सुरु झाले .त्यातुनच पुढे  जानेवारी १९१८ रोजी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली .

महाराजांच्या दहनभूमीवर एक छोटी समाधी आजही रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या समोर उभी आहे. त्यानंतर ३० डिसेंबर १८८३ रोजी त्यांची रक्षा कोल्हापूरला पाठवण्यात आली. तेथे ती मिरवणुकीने पंचगंगा नदीत विसर्जन करण्यात आली.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment