इतिहासातील संदर्भांचे महत्त्व –
इतिहास लिहिल्यावर जे लिहिले आहे ते आपण डोळे झाकून खरे माणायचे का ? जी माहिती दिली आहे ती लेखकाने कशाच्या आधारावर दिली आहे ? मुळात इतिहास लेखण करण्याच्या पद्धतीत काही नियम असतात. ते नियम पाळून इतिहास लिहिल्यास त्या लेखणाला खरे मानता येते. तुम्ही जर इतिहासाचे खरे अभ्यासक असाल तर तुम्हाला या नियमांवरच अवलंबून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. इतिहास असा विषय आहे ज्यात निरंतर काही ना काही भर पडत असते त्यामुळे कोणत्याही लेखकाचे लेखण अथवा त्याने दिलेली माहिती ही शेवटल सत्य म्हणून गणले जाऊ शकत नाही. प्राचीन कालीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासाच्या कालखंडाचा अभ्यास करतांनी आपल्याला त्या काळातील अनेक साधने तपासावी लागतात ही साधने कोणती? त्यांचा अभ्यास कसा करावा ?आणि तो अभ्यास मांडावा कसा ?हे इतिहासाच्या लेखणात अत्यंत कठीण असते. इतिहासातील संदर्भांचे महत्त्व.
प्राचीन भारताचा अभ्यास करायचा झाल्यास हिंदू ,बौद्ध, जैन धार्मिक ग्रंथ, धार्मिक साहित्य, ऐतिहासिक ग्रंथ, समकालीन साहित्य, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने, नाणी, शिलालेख, स्तंभालेख, दानपत्रे ,चित्रकला इत्यादी अभ्यासावी लागतात. यातही धार्मिक ग्रंथात वा साहित्यात अनेक अतिरंजित गोष्टी असतात म्हणून त्या इतिहासाच्या दृष्टीने तेवढे उपयोगी पडत नाही.
प्रवासवर्णनात परदेशी प्रवासकरणार्या व्यक्तीस अनेक ठिकाणची माहिती नसते तसेच तो ज्या जागेवर फिरतो तिथली भौगोलिक, राजकीय, सामाजिक माहिती नसल्यामुळे त्याची वर्णने अनेकदा चुकीची ठरू शकतात.नाणी ,शिलालेख, दानपत्रे ,स्तंभालेख यावरील माहिती अधिक विश्वसनीय ठरते.
प्राचीन कालीन राजघराणी व त्यांचे मूळ याविषयी इतकी मतभिन्नता आढळते की इतिहास अभ्यासकांची यात नक्कीच तारांबळ उडाल्या शिवाय राहात नाही ! उदाहरण द्यायचे झाले तर :-
1)विष्णू पुराणानुसार मुरा ह्या दासीपासून धनानंदास झालेला मुलगा चंद्रगुप्त होय, म्हणून त्याच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले.. गौतम बुद्धाच्या काळी हिमालयाच्या पायथ्याजवळ नेपाळतराईमध्ये पिप्पलीवन येथे मौर्याचे गणराज्य असल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात येतो. त्यावरून चंद्रगुप्त मौर्यकुलातील क्षत्रिय होता हे अनुमान सहज निघते. मौर्यकालीन वाङ्मयात चंद्रगुप्ताबाबत वृषल व कुलहीन असे अपमानास्पद उल्लेख आढळतात. परंतु तत्कालीन बौद्ध व जैन वाङ्मयातून आणि ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून चंद्रगुप्त क्षत्रिय असल्याचा उल्लेख आढळतो.
२)सातवाहनांचा प्राचीनतम उल्लेख ऐतरेय ब्राह्मणात मिळतो. ऐतरेय ब्राह्मणानुसार विश्वामित्राच्या वंशजांनी गोदावरी व कृष्णा ह्या नद्यांमधील प्रदेशात वस्ती करून त्या भागातील अनार्य स्त्रियांशी विवाह केलेत. या वर्णसंकरातून उत्पन्न झालेली जात म्हणजे ‘आंध्र’ होय. आंध्र जमात अतिशय प्रबळ झाली.
पुराणांतून सातवाहनांचा उल्लेख ‘आंध्र’ म्हणून येतो, परंतु आंध्र हे जमातीचे नाव असून सातवाहन राजे त्या आंध्र जमातीचे होते, एवढाच निष्कर्ष निघतो.
सातवाहन हे कुलनाव आहे. सप्तवाहन या संस्कृत शब्दाचे हे प्राकृत रूप मानल्यास सातवाहन सूर्यवंशीय होते, असा अर्थ निघतो. नाशिकच्या शिलालेखात सातवाहन स्वतःचा ‘एकब्राह्मण व क्षत्रियदर्पमानमर्दन’ असल्याचा दावा मांडतात. डॉ. भांडारकर ‘एकब्राह्मण’ याचा अर्थ ब्राह्मणांचे एकमेव रक्षक असा लावतात.
पुराणांनुसार गोदावरी आणि कृष्णा नद्यांमधील तेलगू प्रदेशात आंध्र उर्फ सातवाहन ह्यांचे वास्तव्य हाते. . डॉ. रायचौधरींच्या मते, सातवाहनांचे वास्तव्य मध्यप्रदेशाच्या दक्षिणेला म्हणजे आर्यांच्या वसाहतीला लागून होते. डॉ. मिराशींच्या मते, सातवाहन मूळ विदर्भातील होत, पुढील काळात त्यांनी आंध्र प्रदेश जिंकून घेतला, म्हणून त्यांचा उल्लेख ‘आंध्र’ असा केला गेला. सातवाहनांचा ‘सातकर्णी’ व ‘शालीवाहन’ असाही उल्लेख केलेला आढळतो.
आता मध्ययुगीन इतिहासाविषयी बोलायचे झाले तर यात बखरी ,अस्सल समकालीन पत्रे, शकावल्या, परकीय प्रवासवर्णने, करीने, आत्मचरित्र ,समकालीन चरित्रे इत्यादींचा अभ्यास येतो.
यात बखरी , भाटांची काव्ये यातील माहीती तेवढी विश्वसनीय नसते जेवढी प्रवासवर्णने, पत्रे ,आत्मचरित्रे ,समकालीन चरित्रे यातून माहिती मिळते.
अनेकदा बादशहा, राजे यांनी दरबारी ठेवलेले भाट,कवी यांच्याकडून मालकाची कौतुक करण्याकरिता अतिशयोक्तीपूर्ण लिखाण केले जाते. असे असले तरी काही बाबरनामा हुमायूननामा आइने अकबरी ,मुंन्तखुल उल अखबार, तुझूक ए जहांगिरी ,पादशहानामा, आलमगीरनामा ही मोगल इतिहासा ची दर्शन घडवणारी ग्रंथे पूर्णपणे त्याज्य ठरत नाही.या ग्रंथांचे इतिहासात महत्त्व अनन्यसाधारण आहे.
महाराष्ट्रीय इतिहासात शिवजन्मतारखेचा वाद ,”गोब्राह्मणप्रतिपालक” या शिवरायांना दिलेल्या बिरूदावली वर वाद ,पेशवाईतील जातिव्यवस्थेवर वाद,पेशव्यांच्या न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था यावर वाद हे मुख्यत्वे दिसून येतात.अर्थात वाद हे इतिहासच्या पुराव्यांवर व वस्तुनिष्ठतेवर असले तर इतिहासाच्या संशोधनाला झाला तर त्याचा फायदाच होतो.
इतिहासलेखनात भेसळ अथवा खोटेपणा का केला जातो ?
१)लेखक जर विशिष्ट सामाजिक अथवा राजकीय चळवळीत समाविष्ट असेल तर तो आपल्या सोयीनुसार इतिहासाचे लेखन करतो.
२)लेखक जर विशिष्ट विचारप्रणाली ने प्रभावित असेल तर…
३)लेखकाचा वैयक्तिक स्वार्थ असेल तर…
४)लेखकाला धार्मिक अथवा जातीय श्रेष्ठत्व ठसवायचे असल्यास…
५)लेखकावर सत्ताधीशांकडून दबाव टाकला गेल्यास…
६)लेखकाला सामाजिक तेढ निर्माण करायची असल्यास…
वरील कारणावरूनच फक्त इतिहासलेखनात चुका होतात अस नसून अनेकदा लेखकाचे चरित्र नायकापासून भारावून जाने,त्याच्यावर चित्रपट ,नाटक, कादंबरी ,काव्य यांचा प्रभाव दिसून येणे यामुळेसुद्धा इतिहासलेखनात चुका होतात .त्यामुळे आपल्याला अशा लेखनात लेखकाची स्वतःची तार्किक मते जास्त प्रमाणात दिसून येऊ शकते.
रियासतकारांच्या मते:-
“इतिहास म्हणजे ज्याच्या त्याच्या भावनेने ज्या त्या वेळी ठरवलेले सार किंवा प्रतिपादन होय.ते सार म्हणजे एक तर्क आहे ,निव्वळ कल्पनेची कसरत आहे.त्यात चिरकालीन सत्याचा गाभा अत्यल्प आहे.”
यासाठी इतिहास अभ्यासकांनी कोणत्याही ऐतिहासिक माहितीला लेखकांनी कोणते संदर्भ दिले आहेत हे तपासायला पाहिजेत .वाचकाला ती संदर्भे अस्सल समकालीन आहेत का याची माहिती असायला हवी ! काही उत्तरकालीन संदर्भ असल्यास त्याला समकालीन घटनाक्रमाचा आधार आहे का ? हे तपासून आपली मते ठरवली पाहिजे ! इतिहासात भावनीक होऊन , जर तर चे प्रश्न उपस्थित करुण वस्तुनिष्ठ निष्कर्ष निघत नाही. त्यामुळे दिलेली माहिती खरी की खोटी ही तपासायची असेल तर संदर्भांची मोडतोड कुठे केली आहे हे आपल्याला ओळखता आले पाहिजे ! (इतिहासातील संदर्भांचे महत्त्व)
-(समाप्त)
Pruthviraj Dhawad