इतिहासाचे महत्व –
सध्याचं मनुष्याचं अस्तिव हे फक्त इतिहासामुळेच आहे. तुम्ही जेवढे मागे बघाल (इतिहासात) तेवढे तुम्ही पुढे जाणार. इतिहासाशिवाय मनुष्याला भविष्य नाही. कुठलीही गोष्ट घ्या मागे बघूनच तुम्हाला पुढचा अंदाज घ्यावा लागतो उदा. ड्राईविंग. आजपर्यंतच्या अनेक घटना ज्यामध्ये विध्वंस झाला किंवा काही अघटित झालं ते इतिहासापासून योग्य बोध न घेतल्यामुळेच.(इतिहासाचे महत्व)
छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातून बोध घेतला होता जसं की विजयनगर साम्राज्य आपल्या वैभवाच्या परमोच्च शिखरावर असताना एकाएकी अचानक कसं उध्वस्त झालं याचा त्यांनी विचार केला. त्याचबरोबर देवगिरी चे महाकाय साम्राज्य एकाएकी मांडलिक होण्यामागे काय कारणे असावी याचादेखील त्यांनी विचार केला, पण फक्त विचारच नाही तर त्या इतिहासातून बोध घेऊन ती घटना पुनःश्च घडू नये म्हणून योग्य ती पावलेही उचलली.
उदा. देवगिरी साम्राज्य.
यादवांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला. हा खरोखरीच अजिंक्य असा दुर्ग होता. चखोट ज्याला आपण म्हणू शकतो असाच, किल्ल्याच्या भोवती खोल असे खंदक होते ज्यामध्ये मगरी वगैरे होत्या व त्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एकच असा लाकडी पूल होता ( जसा आजही आहे) तेव्हा तो पूल परकीय आक्रमणं व्हायची तेव्हा उचलल्या जायचा.
अल्लाउद्दीन खिलजी जो एक अत्यंत क्रूर शासक होता त्याने मित्रत्वाचे नाते जोडून व प्रसंगी दगाफटका करून देवगिरीचे राज्य बळकावले. त्याने देवगिरी किल्ल्याला वेढा घातला होता व किल्ल्याला कुठलाही गुप्त, चोर दरवाजा नव्हता. व हीच यादवांची सर्वात मोठी चूक ठरली. हा इतिहास महाराजांना ठाऊक होता याचाच त्यांनी विचार करून भविष्यातील संकटांचा वेध घेऊन योग्य ती पाऊले उचलली.
ज्या वेळी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा घातला होता, त्यावेळी संकटातून सहीसलामत निसटलेले छत्रपती राजाराम महाराज व ज्यामार्गे ते गेले तो म्हणजे ‘वाघ दरवाजा‘ व याच मुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले व पुढे त्यांच्या घोड्यांनी यमुना आणि सिंधू नदीचे पाणी पाहिले. इथे महाराजांनी इतिहासातून धडा घेऊन त्यांची संकटांना ओळखण्याची दूरदृष्टी दिसून येते व त्यामुळेच पुढील संकट टळले.
आपल्याला नेहमी सांगितले जाते की अनुभव हाच सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे काही अंशी जरी हे खरं असलं तरी मला असं वाटतं की इतिहास हाच सर्वोत्तम शिक्षक आहे, जो की चांगला धडा आपणांस शिकवून जातो. मनुष्य जन्म हा मर्यादित काळासाठी आहे ह्या अल्पमुदतीत आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकत नाही आणि ते परवडणारे देखील नाही, म्हणूनच आपण इतरांच्या जुन्या अनुभवातून म्हणजेच एकप्रकारे इतिहासातूनच योग्य प्रकारे शिकू शकतो.
आज आपण जी घरं, वास्तू आणि नगररचना करतो ती इतिहासातील वास्तूचा अभ्यास करूनच. आजचं अभियांत्रिकी तंत्रज्ञान इतकं प्रगत कसं झालं?, वाहनं अद्ययावत, आरामदायी कशी झाली, आपण एकमेकांशी कसा संवाद साधू शकलो, ह्या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर त्याची पाळेमुळे इतिहासातच दडलेली आपल्याला आढळून येईल.
जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी, हेमाडपंथी मंदिरं, अश्मयुगीन गुहा, भौगोलिक जरी असलं तरी लाखो वर्षांपूर्वी लाव्हारस थंड होऊन तयार झालेल्या बेसौल्ट खडकावरील सह्याद्री पर्वताची रांग त्याभोवती हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी मिळाली हे सर्वच तर इतिहासाशीच निगडित आहे. पूर्वजांच्या देदीप्यमान पराक्रमामुळे आजची पिढी सुखात आहे
जसं म्हणतात की इतर राज्याला फक्त भूगोल आहे पण महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे की ज्याला भूगोलाच्या बरोबरच इतिहासही आहे महाराष्ट्राला लाभलेला हा खूपच मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.
हेच नाही तर नवउद्योजकांना देखील काही औद्योगिक क्षेत्रातील काही इतिहास ज्ञात पाहिजे जसं की kodak, nokia ह्या दिगग्ज कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या पण फक्त ते काळाची पाऊले ओळखू न शकल्यामुळे व बदल करण्याची मानसिकता नसल्याने त्यांचं नाव औद्योगिक क्षेत्रात नाहीसं झालं. या कंपन्यांच्या भूतकाळातील म्हणजेच इतिहासातील चुका व त्यांच्यापासून योग्य तो बोध घेऊन आपण ती चूक न करण्याची खबरदारी तर घेऊच शकतो.
त्यामुळे तुम्ही कुणीही असा आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर इतिहासाशिवाय पर्याय नाही.