महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,570

नाशिकपासून गोवळकोंडा सरहद्दीपर्यंत शत्रूचे हत्ती पळवून लावणारे मराठे..!!

By Discover Maharashtra Views: 2512 3 Min Read

नाशिकपासून गोवळकोंडा सरहद्दीपर्यंत शत्रूचे हत्ती पळवून मोगलांना पायपीट करायला लावणारे मराठे..!!

१६८२-८३ साली औरंगजेब जेंव्हा आपला मुलगा अकबर याचा बंड मोडण्यासाठी आणि मराठा स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरला तेंव्हा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांना मराठे प्रतिकार करीत होतेच पण स्वराज्याबाहेर पडून मोगली मुलखात ते कशा प्रकारचा धुमाकूळ घालत होते याच्या नोंदी अनेक समकालीन साधनात आल्या आहेत, त्यापैकी भीमसेन सक्सेनाच्या ग्रंथातील एक नोंद अशी आहे की

‘‘ रणमस्तखान ऊर्फ बहादुरखान हा मोहाजेच्या घाटाने कोकणात उतरला. नाशिक प्रांतात मराठे पसरले आहेत‚ असे कळल्यावरून बहादुरखान हा रामसेजहून नाशिकाकडे आला. मराठे तेथून निघून गेले. नाशिकचा फौजदार महासिंग बहादुरिया याच्याबरोबर आपले बुणगे आणि जड सामान ठेवून बहादुरखान हा मराठ्यांच्या पाठलागावर रवाना झाला. मराठे नांदेड भागात पसरले. त्यांचा बीमोड करण्यासाठी शहाजादा मुअज्जम याचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन यास  बादशहाने तिकडे रवाना केले. बहादुरखानाने शहाजादा मुइजुद्दीन याच्याबरोबर राहावे अशी आज्ञा झाली. बहादुरखानाने आपले बाजारबुणगे नाशकाहून बोलावून घेतले. त्याने औरंगाबादेपासून सोळा कोसांवर गोदावरीच्या काठी मुक्कामी शहाजादा मुइजुद्दीन याची गाठ घेतली. शहाजादा मुइजुद्दीन याने नांदेड येथे काही दिवस मुक्काम केला.

नांदेडचा फौजदार रशीदखान ऊर्फ इल्हामुल्लाखान हा होता. तो येऊन शहाजाद्याला भेटला आणि त्याच्याबरोबर तो बीदरपर्यंत गेला. त्या दिवशीच बातमी आली ती ही – बादशहाचे आणि शहाजादा मुअज्जम याचे हत्ती चरण्यासाठी म्हणून पाथरी भागात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर मराठ्यांनी हल्ला केला आहे. हे ऐकून बहादुरखानाने शहाजाद्याला बाजारबुणग्या सहित बीदरजवळ सोडले. तो निवडक सरंजाम घेऊन निघाला. इतक्यात बातमी आली की‚ मराठ्यांनी हत्ती हाकलून नेले. बहादुरखान हा त्या वेळी नांदेड जिल्ह्यात लहसूना येथे होता. त्याने नांदेडचा फौजदार रशीदखान याजबरोबर आपले जड समान नांदेडकडे रवाना केले. नंतर त्याने मराठ्यांचा पाठलाग करून हत्ती सोडविले. मराठे पळून गेले. जाता जाता ते काही हत्ती बरोबर घेऊन गेले. बहादुरखानाने सापडलेले हत्ती जिल्ह्याच्या फौजदाराच्या हवाली केले. तो मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. तुरुकचांदा (नांदेड जिल्ह्याला लागून‚ आंध्र प्रदेशात) आणि गोवळकोंडा राज्याच्या सरहद्दीजवळ त्याने मराठ्यांना गाठून बाकीचे हत्ती सोडविले. यानंतर बहादुरखानाने बीदरजवळ कमठाण्याच्या तलावाच्या काठी मुक्काम केला. नांदेडहून त्याने बाजारबुणगे मागवून घेतले. या मोहिमेत सैनिकांना अतिशय त्रास झाला. बहादुरखानाचा तंबूही त्याच्याबरोबर नव्हता.जेवण खाण्याचेही हाल झाले. मोहिमेत अनेक सैनिक ठिकठिकाणी मागे राहत गेले. ते बऱ्याच दिवसांनी छावणीत आले. ”

खासा आलमगीर औरंगजेब लाखोंची फौज घेऊन दक्षिणेत उतरला असताना देखील आपल्या युद्धनीती आणि पराक्रमाच्या जोरावर मराठ्यांनी मोगलांना कसे जेरीस आणले होते याचे हे उत्तम उदाहरण..!!

संदर्भ – मोगल आणि मराठे -( तारीखे दिलकुशा अनुवाद ) – सेतुमाधवराव पगडी

माहिती साभार – राज जाधव

Leave a Comment