महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,37,494

पुण्यातले जुने हौद

By Discover Maharashtra Views: 1528 4 Min Read

पुण्यातले जुने हौद –

प्राचीन पुणे शहर नदीकाठी वसले होते. इ.स. १७३० मध्ये थोरले बाजीराव पेशवे पुण्यात वास्तव्याला आले. शनिवारवाड्यातून कामकाज चालवू लागले. साहजिकच पुण्याला महत्त्व आले. पेशवाईची, पर्यायाने मराठी साम्राज्याची सूत्रे पुण्याहून हलवली जाऊ लागल्याने पुण्याच्या वस्तीतही वाढ होऊ लागली. शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या वाड्याकरता पाणीपुरवठा मुठा नदीतून आणलेल्या पाटातून होत असे. प्रथम हे पाणी वाड्यातील विहिरीत साठवून, नंतर रहाटाच्या सहाय्याने वाड्यातील इमारती, बागा व कारंज्यांमध्ये खेळवले होते. नंतरच्या काळात विहिरीचे पाणी अपुरे पडू लागले. कात्रज तलावाला धरण बांधून या तलावाचे पाणी जलवाहिनीद्वारे पुणे शहरात आणण्याची योजना नानासाहेब पेशव्यांनी आखली. इ.स. १७५५ मध्ये कात्रज तलावाच्या बांधकामास सुरवात झाली. इ.स. १७६१ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. हे बांधकाम नीळकंठ महादेव यांच्या देखरेखीखाली झाले. शहरापर्यंतच्या जलवाहिनी व उच्छ्वासाचे काम गोपाळ वैजनाथ यांनी केले. पेशवे दप्तरातील नोंदीनुसार या बांधकामाला एकूण खर्च १,९८००० रुपये आला.पुण्यातले जुने हौद.

कात्रजजवळ थोड्या अंतरावर वरच्या बाजूस या ओढ्याचे पाणी एका धरणात साठवून, थोड्या अंतरावर तलाव बांधून त्यात हे पाणी सोडण्यात येऊन तेथे एक धरण बांधण्यात आले. वरच्या तलावाच्या धरणातून आवश्यक तेवढे पाणी खालच्या तलावात सोडण्यात येत असे. वरच्या तलावाच्या धरणाच्या भिंत ६०० फूट लांब, ८ फुट रुंद  असून ३० फूट उंच आहे. खालच्या तलावाची भिंत १००० फूट लांब, १५ फुट रुंद असून, उंची ४० फूट आहे. या दोन्ही तलावाला असलेल्या धरणाशिवाय दोन्ही धरणाच्या पूर्वेला तलावाला कडेने भिंत बांधलेली आहे. वरच्या धरणाच्या भिंतीला ६ इंच व्यासाची वाटोळी भोके असून ही भोके लाकडी दट्ट्या मारून बंद करण्याची सोय होती. तलावातील पाण्याच्या पातळीनुसार दट्टे काढून खालच्या धरणात पाणी सोडण्याची सोय होती.

दुसन्या तलावाच्या धरणाच्या भिंतीच्या बाहेर तळाशी एक उच्छ्वास बांधलेला असून या उच्छ्वासामध्ये १४४ इंच व्यासाच्या झडपेतून सेकंदाला ३ गॅलन पाणी सोडले जात असे. या धरणाच्या भिंतीच्या तळाशी धरणातील गाळ काढण्याकरता दरवाजा बसवलेला आहे. उच्छ्वासातून ५ ते ७ फूट उंचीच्या व २.५  फुट रुंदीच्या नळातून पुणे शहरास पाणीपुरवठा करण्यात येत होता. या जलवाहिनीस पुणे शहरापर्यंत अंदाजे ३०० फुट अंतरावर उच्छ्वास बांधलेले होते. कात्रज तलाव ते पर्वतीपर्यंत उच्छ्वासांची संख्या १०३ होती. पर्वती ते शनिवारवाड्यापर्यंत उच्छ्वासांची संख्या २० ते २२ होती. उच्छ्वासाचे बांधकाम अशा पद्धतीने केलेले होते की, पाण्यातील गाळ खाली बसून शुद्ध पाण्याचा पुरवठा जलवाहिनीतून होत असे. मुख्य तलावाच्या धरणाची भिंत चिरेबंदी दगडाची असून या भिंतीला लहान-मोठी दारे आहेत. या भिंतीला डाव्या कोपऱ्यापासून वरपर्यंत दगडी पायऱ्या आहेत. या तलावाच्या सभोवताली असलेल्या भिंती रुंद असून, त्यावरून चालत जाऊन तलावातील गाळ काढता येत असे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील उच्छ्वास जमिनीखाली साधारण ४ ते १० फूट खोल बांधण्यात आलेले होते.

कात्रज तलावाच्या पाण्याचा पुरवठा शहरात योग्य पद्धतीने होण्याकरता,  शहरात अनेक खाजगी व सार्वजनिक हौद बांधण्यात आले होते. इ.स. १९१४ मध्ये या हौदांची संख्या ८० होती. यांत भाऊ महाराज हौद, बदामी हौद, नाना हौद, फडके हौद, खाजगीवाले हौद, गणेश पेठ हौद, तांबट हौद, फरासखाना हौद, पंचहौद, बाहुलीचा हौद, रामेश्वर हौद, सात तोटी हौद, भूतकर हौद, कला हौद, सदाशिव पेठ हौद इत्यादी हौदांचा समावेश होता. शनिवारवाड्यात कात्रजचे पाणी गणेश दरवाज्याकडून आत घेण्यात आले होते. गणेश दरवाज्याच्या आत पाणी साठविण्याकरता टाकी बांधून तेथून ते पाणी शनिवारवाड्यात सर्वत्र खेळवलेले होते. कात्रजच्या पाण्याची जलवाहिनी शनिवारवाड्यात घेण्याच्या वेळी तटबंदी तोडण्याचा प्रसंग आला. परंतु ज्या गवंड्याने तटाचे बांधकाम केले होते त्याने आधीच गणेशदरवाजाजवत तदाखालून पाणी आत घेण्याची व्यवस्था करून ठेवलेली होती. त्याच्या या कामगिरीवर खूप होऊन नानासाहेब पेशव्यांनी या गवंड्याला अहमदनगर जिल्ह्यात जमीन इनाम दिली.

कालांतराने सार्वजनिक आरोग्य, रस्तारुंदी, नवीन बांधकामे व खडकवासल्याचा पाणीपुरवठ्यामुळे शहरातील कित्येक हौद बुजवण्याल आले. वर्षानुवर्षे पुण्याला नियमित पाणीपुरवठा करणारी कात्रजची जलवाहिनी पेशवाईतील जलनीतीचे उत्तम उदाहरण आहे. आता हा ऐतिहासिक जलप्रकल्प काळाच्या पडद्याआड गेला आहे.

संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे वर्णन – ना. वि. जोशी

पत्ता : Google Map Link  click here

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment