एकमेव दुर्लक्षित ” भारतरत्न ” !
फक्त एकट्या पां.वा.काणे यांच्यावरच टपाल तिकीट नाही !
आपल्या देशामध्ये पूर्वीची लोकं एका वेळी अनेक क्षेत्रात इतके पारंगत्व कसे मिळवीत असतील असा प्रश्न अनेकदा पडतो. अत्याधुनिक शास्त्रे उपलब्ध नसताना मोहेंजोदारो- हरप्पा संस्कृतीत उत्तम town plannig ची नगरे सापडतात. स्तिमित करणारी विद्यापीठे, वेधशाळा, किल्ले, इमारती व अन्य बांधकामे दिसतात. हजारो विषयांवरील लाखो ग्रंथ, शास्त्रे, महाकाव्ये तयार झाली.
ज्यांच्याबद्दल असेच आश्चर्य वाटावे असे अनेक प्रकांड पंडित महाराष्ट्रात जन्माला आले. त्यापैकी एक म्हणजे डॉ. पां. वा. काणे ! अत्यंत गरीब पण विद्वत्तेची खूप मोठी परंपरा असलेल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद , उपनिषदे, भगवतगीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते. दोन्हीकडची इतकी मोठी ज्ञान परंपरा असलेल्या कुटुंबात ७ मे १८८० रोजी डॉ. पां. वा. काणे यांचा जन्म झाला.
अमरकोशातील शेकडो श्लोक त्यांना लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालीकातून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरु केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये सांशोधन सुरु केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. आर्थिक ऐपत नसल्याने एकीकडे नोकरी करून, स्कॉलरशिप्स मिळवून ते शिकतच राहिले. हिंदू आणि मुस्लिम लॉ या विषयात ते एल.एल.एम झाले. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांचे, जुने अस्सल भारतीय ज्ञान आणि तत्वज्ञान यावर प्रभुत्व होते आणि समाज सुधारणा आणि पुरोगामी विचारही होते. त्यामुळे त्यांनी आंतरजातीय विवाह, विधवा विवाह, घटस्फोटाचा हक्क यांचा पुरस्कार केला. विधवा केशवपन, अस्पृश्यता यांना त्यांचा कडवा विरोध होता. एका केस न काढलेल्या विधवेच्या, पंढरपूरच्या मंदिरातील प्रवेशबंदी विरोधातील कोर्टकेसचे त्यांनी वकीलपत्र घेतले होते. संसदेत अस्पृश्यता निवारणाचा कायदा संमत करण्यातही त्यांचा पुढाकार होता.
प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे,टीका आणि मीमांसा, सांख्य तत्वज्ञान महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय / परीक्षणे लिहिली आहेत. यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका आणि प्रचंड विस्तार लक्षात येतो !
ब्रिटिशांनी येथे आपले बस्तान बळकट करतांनाच इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा सुरु केली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्माची विविधांगी टिंगल सुरु केली. त्यामध्ये त्यांनी इथल्या काही तथाकथित विद्वानांनाही सामील करून घेतले. इंग्रजीतील एखादी कविता ही संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अत्यंत उर्मट उद्गार, मेकॉलेसारख्या अधिकाऱ्याने काढले होते. लॉर्ड कर्झनने तर भारतीयांना सत्य म्हणजे काय याची कल्पनाच नसल्याची दर्पोक्ती केली होती. डॉ.काणे या सर्व गोष्टींनी व्यथित झाले होते. १९२६ मध्ये त्यांनी व्यव्हारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमविलेली कागदपत्रे आणि अन्य साधने, आजवरचे धर्म आणि कायदा यांचे ज्ञान अशा भक्कम तयारीनिशी त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि इतर युरोपीय देशांना कळावे म्हणून त्यांनी हा परिपूर्ण इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे ७००० पाने आणि ५ खंडांमध्ये त्यांनी लिहीलेला हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो.
( माझ्याकडे याचे संक्षिप्त भाषांतराचे सुमारे ६०० / ६०० पानांचे दोन खंड असून त्याच्या समारोपाच्या १४ पानांमध्ये डॉ. पां. वा. काणे यांनी, ग्रंथ निर्मितीची पूर्ण माहिती दिली आहे.)
महामहोपाध्याय, डॉक्टरेट अशा मोठ्या पदव्यांनी , अनेक फेलोशिप्स, अध्यक्षपदे, मुंबई पिद्यापीठाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय कुलगुरूपद , खासदारकी अशा असंख्य सन्मानांनी आणि अनेक पारितोषिकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. “हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र ” या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमीचा सन्मान मिळाला. त्यांना १९६३ मध्ये भारताचा ” भारतरत्न ” हा सर्वोच्च नागरी ‘किताब देण्यात आला.
भारतात आजवर ४५ व्यक्तींना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला. भारतीय टपाल खात्याचा एक खास नियम आहे. सहसा जिवंत व्यक्तीवर टपाल तिकीट काढले जात नाही. तथापि या नियमाला अपवाद म्हणून आजवरच्या इतिहासात डॉ. विश्वेश्वरैय्या , महर्षी धोंडो केशव कर्वे, राजीव गांधी, मदर तेरेसा आणि सचिन तेंडुलकर या ५ व्यक्तींवर त्यांच्या हयातीतच टपाल तिकिटे प्रसिद्ध झाली. डॉ. विश्वेश्वरैय्या , महर्षी कर्वे यांना भारतरत्न सन्मान मिळाला आणि त्यांनी वयाची शंभरी पार केली म्हणून त्यांच्यावर हयातीतच टपाल तिकीट निघाले. काँग्रेसच्या शताब्दीनिमित्त तत्कालीन पक्षाध्यक्ष म्हणून राजीवजींवर तिकीट निघाले. मदर तेरेसांना नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर, घाईघाईने आपल्या सरकारने त्यांना भारतरत्न दिले आणि तिकीटही प्रसिद्ध केले. २०० कसोटी पूर्ण करण्याच्या जागतिक विक्रमाबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकरवर २ तिकिटे निघण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. याव्यतिरिक्त लता मंगेशकर आणि अमर्त्य सेन हे दोन्हीही भारतरत्न हयात असल्याने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध झाले नाही.
डॉ. पां. वा. काणे हे अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान लाभले. त्यांना भारतरत्न देण्यात आल्यावर खरेतर त्या किताबाचीच शान वाढली. पण आजवर प्रत्येक भारतरत्नावर टपाल तिकीट काढणारे भारतीय टपाल खाते आणि सरकार, फक्त डॉ. पां. वा. काणे यांनाच साफ विसरले. नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, मोरारजी देसाई असल्या भारतरत्नांवर तर अनेकदा टपाल तिकिटे निघाली. मग फक्त डॉ. पां. वा. काणे यांच्यावरच एकदासुद्धा टपाल तिकीट न काढण्याचे कारण काय ?
संपूर्ण देशातील गल्लीबोळात नेहरू – गांधींजी यांची लाखो स्मारके उभारणाऱ्या सरकारने डॉ. पां. वा. काणे यांचे एकही स्मारक का उभारले नाही ? रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे हे डॉ. पां. वा. काणे यांचे मूळ गाव ! त्यांच्या या गावात एखादे साधेसे आणि साजेसे स्मारक व्हावे म्हणून त्या गावचे ग्रामस्थ खूप खटपट करतायत….. पण गाडे नक्की का अडते, डॉ. पां. वा. काणे यांना इतके दुर्लक्षित का केले जाते ……
…. .. हे एक दुर्दैवी गूढ आहे !
( डॉ. पां. वा. काणे यांचे छायाचित्र गुगल माहितीजालावरून साभार )
माहिती साभार – Makarand Karandikar