संताजी घोरपडे यांचा पराक्रम, हताश औरंगजेब अन् बांगड्यांचा आहेर
उत्तरे कडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गा वरील बुर्हाणपूर हे मोगलांचे महत्वाचे लष्करी ठाणे होते. संताजी घोरपडे हे धरणगाव हून तापी नदीच्या तीरावरील बुर्हाणपूर या मोगलांच्या सुप्रसिद्ध शहरावर चालुन गेले. मराठे इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील, असे तेथील अंमलदारांना वाटत नव्हते, पण कोसळलेल्या संकटाला सामोरे जाण्याशिवाय त्यांना अन्य पर्याय नव्हता. संताजींनी बुर्हाणपूरच्या सुभेदार कडून चौथाईची मागणी केली, पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती. मोगली सुभेदाराने चौथाई देण्या ऐवजी संताजी बरोबर मुकाबला करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे तो आपल्या फौजेसह लढण्यासाठी शहराच्या बाहेर आला. पण संताजींच्या समोर त्याच्या फौजेचा धुव्वा उडाला. संपूर्ण शहराची लुट करण्यात आली. मराठ्यांच्या हातात अमाप पैसा व जवाहर पडले.
मराठ्यांनी बुर्हाणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच बादशहाच्या तळपायाची आग मस्तकास गेली. बुर्हाणपूरचा पराभव हा सुभेदारचा नादानपणा आहे असे त्याला वाटले. अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइज्जत करण्याच्या उद्देशाने बादशहाने त्याला ” बांगड्यांचा आहेर ” पाठवल्याचे सुरतकर इंग्रज लिहितात – He ( the Emperor ) hath sent him ( the Governor of Burhanpur ) some of those rings woman wear on their arms for he had more men in the field than Santoo ( Santajii )
– बादशहाने बुर्हाणपूरच्या गव्हर्नर कडे बायका हातात घालतात तशा कडी ( बांगड्या ) पाठवून दिल्या आहेत. कारण संताजींच्या सैन्यांच्या पेक्षा अधिक सैन्य त्याच्या जवळ होते. असे असुनही त्याचा पराभव झाला.
रणधुरंदर सरसेनापती संताजी घोरपडे यांनी बुर्हाणपुर शहरावर हल्ला केला तो महिना आणि साल होते – जानेवारी 1695.
माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)