महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,064

राजधानी रायगड म्हणजे एक गूढ

By Discover Maharashtra Views: 2084 6 Min Read

राजधानी रायगड म्हणजे एक गूढ –

रायगड त्याच्या माथ्यावर तसेच अंगाखांद्यावर शेकडो ऐतिहासिक पाऊलखुणा घेऊन उभा आहे. यांतील बऱ्याचशा पाऊलखुणा अत्यंत कमी जणांना ठाऊक आहेत. काही तर तिथल्या स्थानिकांनाही नीट माहिती नाही. अनेकांना वाटते तसे पाचाड हे रायगडाच्या पायथ्याचे गाव नसून ते रायगडावरचेच गाव आहे. रायगड आपल्याला वाटतो त्याहून अधिक उंच व विस्ताराने मोठा आहे. पाचाड व रायगडवाडी ही गावं उंचावर आहेत, बऱ्यापैकी चढ चढून (आता घाटरस्ता चढून) या गावांपर्यंत पोहोचता येतं. पाचाडखालचे कोंझर आणि रायगडवाडीखालचे छत्र निजामपूर इथून रायगडाच्या डोंगराचा चढ सुरू होतो. पाचाड आणि रायगडवाडी या गावांचा समावेश किल्ले रायगडात होतो. म्हणजे ही दोन्ही गावं किल्ले रायगडाचाच भाग आहेत. या गावीं इतिहासकाळात रायगडाची पेठ होती. पाचाडचा कोट अनेकांना माहीत आहे, पण पलीकडच्या रायगडवाडीजवळही कोट होता आणि त्याचे काही अवशेष आजही झाडाझुडुपांत लपलेले आहेत याची किती जणांना माहिती आहे ? या कोटाचे उल्लेख इतिहासात आहेत. रायगडाचा नाणे दरवाजा आणि रायगडवाडी यांदरम्यान हा कोट होता. रायगडवाडीला पूर्वी किल्लेवाडी किंवा नुसतंच वाडी म्हणत. रायगडवाडीचा कोट, त्या परिसरातले ऐतिहासिक अवशेष हा एक स्वतंत्र विषय आहे.(राजधानी रायगड म्हणजे एक गूढ)

रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मोगलांनी रजपूत राजा सूरसिंग याला रायगडाचा किल्लेदार म्हणून नेमले. बिदरहून खैरातखानास बोलावून त्याला रायगडवाडीचा ठाणेदार केले. फत्तेजंगखान पाचाडचा अधिकारी झाला. त्याच्या मृत्यूनंतर अब्दुल रजाखान हा पाचाडचा अधिकारी झाला. पुढे रायगडचा किल्लेदार सूरसिंग मरण पावला. त्याच्यानंतर रायगडाचा कारभार कोणी करावा, याबद्दल बादशहाचा हुकूम मिळवण्यासाठी रायगडावरून दिवाण कपूरचंद बादशहाकडे रवाना झाला. औरंगजेबाने सूरसिंगाचा मुलगा शिवसिंग याला रायगडाची किल्लेदारी व पाचाडची फौजदारी देऊन अब्दुल रजाखानाला आपल्याकडे परत बोलावून घेतले. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा शिवसिंग रायगडाचा किल्लेदार होता. १७०७ला त्याच्या मृत्यूनंतर इतर मोगली सैन्याप्रमाणे शिवसिंग दिल्लीकडे निघाला आणि त्याने रायगडचा अधिकार व ताबा सिद्दीकडे सोपवला. पुढे १७३३ पर्यंत रायगड भागात सिद्दीचा अंमल होता.

सिद्दीचे विविध अधिकारी नेमलेले होते. १७३३ मध्ये मोठ्या खटपटींनंतर रायगड मराठ्यांच्या ताब्यात आल्यावरही पाचाड व रायगडवाडी भागावर सिद्दीचे लोकं होते. १७३४ मध्ये या भागात मराठे व सिद्दी यांच्यात मोठा रणसंग्राम झाला. थोरल्या शाहू महाराजांनी पाठवलेले मोठमोठे सरदार, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे सैन्य आले होते. रायगडावरचे मराठ्यांचे गडकरी खाली उतरून त्यांनी सिद्दीच्या सैन्यावर हल्लाबोल चढवला. सिद्दीचे मोर्चे जाळून टाकले, सिद्दीच्या लोकांना पळवून लावले. सिद्दी अंबरचे मुंडके कापले. हा सगळा संग्राम एक मोठा विषय आहे. या संग्रामात रायगडाचे तटसरनोबत जावजी लाड कामी आले. रायगड आणि पोटल्याचा डोंगरामधल्या कळकाई खिंडीत एका वीराचे स्मारक आहे हे जावजी लाडचे आहे असे मानले जाते. त्याचा फोटो खाली दिला आहे.

मराठ्यांच्या या विजयाच्या हकिगती साताऱ्याला शाहू महाराजांना कळल्यावर त्यांनी १२ जानेवारी १७३४ला पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात, “रायगडवाडीचा सिद्दीचा कोट पाडून टाकून तेथील व मदारमोर्चावरील तोफा वगैरे सामान रायगडावर चढवावे. पाचाडचा बंदोबस्त करून तिथल्या तोफा तिथेच ठेवाव्यात. (पुढे पाचाडच्या तोफा रायगडच्या मोर्चेबंदीसाठी नेण्यात आल्या). सिद्दी अंबर अफवानीचे मस्तक साताऱ्यास पाठवावे. सिद्दीकडील जे लोक सापडले असतील त्यांची डोकी मारावीत…”

पाचाडचा कोट आणि राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी प्रसिद्धच आहे. याव्यतिरिक्त अनेक अल्पपरिचित ऐतिहासिक गोष्टी पाचाड गावाच्या आजूबाजूला आहेत. कोंझरहून पाचाडकडे जाणाऱ्या मार्गावर ‘सावंताचे मेट’ आहे. मेट म्हणजे गडाच्या घेऱ्यातील पहाऱ्याची चौकी. रायगडासह अनेक मोठ्या किल्ल्यांच्या घेऱ्यात अनेक मेटांचे अवशेष आज दिसतात. त्यांना नावं असायची. कोंझरहून वर चढणाऱ्या मार्गाच्या बंदोबस्तासाठी महाराजांनी सावंत नावाचा अधिकारी इथे नेमला होता म्हणून सावंताचे मेट. या सावंताच्या मेटाचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांत आहे. त्यात रायगडाच्या इतर अनेक मेट, पहारे, चौक्यांची नावे मिळतात. कोंझरहून पाचाडला जाताना पाचाडच्या अलीकडे दीडदोन किलोमीटर रस्त्याच्या उजवीकडे खाली गेल्यावर ओढ्यात एक सुबक समाधी – स्मारक आहे. हे त्या सावंताचे स्मारक आहे असे मानले जाते. काहींच्या मते हे स्मारक कृष्णराव खटावकर यांचे असावे.

प्रथम शाहूमहाराजांचे विरोधक असलेले हे कृष्णराव खटावकर नंतर त्यांचे इमानी सरदार झाले. या वृद्ध सरदाराला वर उल्लेखिलेल्या १७३४मध्ये मराठे व सिद्दी यांच्यात रायगडाखाली झालेल्या रणसंग्रामात वीरमरण आले होते. सावंताच्या मेटाच्या भागात झाडीत अजून एक स्मारक आहे वाटतं, ते त्यांचे असावे. ओढ्यातील समाधीजवळच्या परिसरात शिवपिंड आणि चौथऱ्याचे अवशेष झाडीत लपलेले आहेत. सावंताच्या मेटाजवळ एका मोकळ्या जागेला सूरमाळ म्हणतात. तेथे इशारा देण्यासाठी रणवाद्ये वाजवली जात असे. सावंताच्या मेटाच्या उत्तरेला दुदुंभीचा बुरुज होता. त्याचे दगड नाहीसे झाले असून तिथे आम्रवृक्ष आहे. सावंताच्या मेटाजवळ अन्नछत्रही होते. जिजाऊसाहेबांच्या काळापासून पेशवाईपर्यंत ते चालू होते.

पाचाडहून रायगडाकडे जाताना देशमुख हॉटेलजवळ रस्त्याच्या डावीकडे एक पायऱ्यांची विहीर – बारव आहे. तिला होळकरबारव म्हणतात. जवळ एका पत्र्याच्या इमारतीला अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली धर्मशाळा म्हणत. बारव दिसली की ती अहिल्यादेवींनी बांधली असे मानण्याचा प्रकार इथेही आहे. होळकरबारवजवळ मातीत गाडल्या गेलेल्या काही जुन्या कबरी दिसतात. येथून पुढे जरा वर गेल्यावर एका जागेला नकट्याचा माळ म्हणतात. तिथे जवळ पहाऱ्याच्या चौकीचा चौथरा, एका झुडुपात शिवपिंड आणि माळावर एक स्मारकही आहे असे वाचले आहे. त्याला नकट्याचे स्मारक म्हणतात. आख्यायिका अशी, की महाराजांच्या निधनानंतर अण्णाजी दत्तो वगैरेंनी बहुदा चित् दरवाजाचा पहारेकरी मायजी गायकवाड ह्यास कोणालाही गडावर जाऊ देऊ नये असे सांगून नेमले.

संभाजीराजे पन्हाळ्याहून इथे आल्यावर त्याने प्रत्यक्ष त्यांना अटकाव केला. या गोष्टीचा राग येऊन संभाजीराजांनी त्याचे नाक कापून टाकले, की येणेप्रमाणे परत असला अपशकून न व्हावा. पुढे तो मरण पावला व त्याचे अंत्यसंस्कार इथे करण्यात आले म्हणून नकट्याचा माळ. या भागात अजून अनेक समाध्या, कबरी, चौथरे इत्यादी असे कितीतरी ऐतिहासिक अवशेष लपलेले आहेत. राजधानी रायगड म्हणजे एक गूढ आहे, न संपणारं आकर्षण आहे.

– प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment