दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा)
धाकटे छत्रपती शाहूमहाराज यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र प्रतापसिंह सातारच्या गादीवर आले .छत्रपती प्रतापसिंह व यांच्या मातोश्रीना बाजीराव पेशवे यांची कैद असह्य होऊन त्यांनी पुण्यातील इंग्रज अधिकारी एल्फिन्स्टन त्यांच्याकडे मदतीसाठी गुप्तपणे बोलणे चालवलेले. याची कुणकुण बाजीराव पेशव्यांना लागताच त्यांनी दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांना इंग्रजांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबासह वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवले.तिथून पुन्हा प्रतापसिंह यांना बाजीराव पेशव्यांनी पुण्यात आपल्या लष्करात आपल्याजवळ ठेवले.
इंग्रजांनी सर्व मराठी राज्य आपल्या ताब्यात घेऊन छ्त्रपतिंकडे अगदी कमी मुलूख ठेवला. १८१९ मध्ये इंग्रजांनी त्यांना पाहिजे तसा करार छत्रपती प्रतापसिंहा कडून करून घेतला.सर्व मराठेशाहीच्या हिंदुस्तानभर पसरलेल्या मुलुखांपैकी छत्रपती प्रतापसिंह
यांना नीरा व वारणा या नद्यांमधील प्रदेश देण्यात आला. कराड ,फलटण ,जत ,वाई आणि अक्कलकोटचे जहागिरदार हे फक्त छत्रपतींच्या अधिपत्याखाली राहिले.बाकी सर्व कारभार इंग्रजांकडे जाऊन सातारा येथे नेमलेल्या ब्रिटिश रेसिडेंटच्या परवानगीशिवाय कुठलेही काम न करण्याचे बंधन प्रतापसिंहावर आले .प्राप्त परिस्थितीत सातारा व परिसराची जमेल तेवढी सुव्यवस्था करण्याचे ठरवून छत्रपती प्रतापसिंहांनी यवतेश्वर येथे तलाव बांधून त्यांचे पाणी सातारा शहरात आणले. शहरात सरळ व रुंद रस्ते तयार केले. नवा राजवाडा व जलमंदिर बांधले. मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा बांधून एक छापखानाही काढला. छत्रपती प्रतापसिंहानी आपले मराठा राज्याचे गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा होती .परंतु त्यांच्याविरुद्ध सारखीच कटकारस्थाने चालू होती. ब्रिटिशांचा हस्तक बाळाजीपंत नातू याने बाजीरावांचा मोड करून मराठा राज्य इंग्रजांच्या घशात घालण्यासाठी केवळ स्वार्थापोटी अनेक कारस्थाने करून इंग्रजांना मदत केली होती.
सद्गुणी,प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे. हे छत्रपती दुसरे शाहू वआनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आले. सवाई माधवराव पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होते. आणि छत्रपती पहिले शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरे बाजीराव पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रथम सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९).
ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने घोषित केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.
एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.
या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली.
छत्रपती प्रतापसिंहयांचे धाकटे बंधू शहाजी उर्फ आप्पासाहेब यांना आपल्या कारस्थानात इंग्रजांनी सामील करून घेतले. १८३९ साली हा कट कार्यरत झाला. बाळाजीपंत नातू यांना सातारा राज्याचे दिवान पद हवे होते. इंग्रजांनी ठरल्याप्रमाणे छत्रपती प्रतापसिंहावर अनेक खोटे आरोप लावून त्यांना दोषी जाहीर करून अन्यायाने पद्धच्युत केले व रात्रीच्या वेळेस बिछान्यावर झोपलेले असताना त्याच कपड्यात त्यांना कैद करून लिंब गावी दोन महिने अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवून त्यांची रवानगी काशी येथे करण्यात आली.
५ सप्टेंबर १८३९ रोजी आप्पा साहेबांना गादीवर बसवून इंग्रजांनी त्यांच्याशी नवा तह केला. या तहाने पूर्वी छत्रपतींच्या अधिकाराखाली असलेल्या सहाही जहागिरी इंग्रजांनी यांच्याकडून काढून आपल्या ताब्यात घेतल्या . छत्रपती आप्पासाहेब हे केवळ सातारा भागापुरते मर्यादित राहून ब्रिटिशांच्या हातचे बाहुले बनले . १८४०पासून छत्रपती प्रतापसिंहानी आपल्याविरुद्धच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी कैदेतून प्रयत्न चालू केले .रंगो बापूजी गुप्ते यांनी छत्रपती प्रतापसिंहांची बाजू मांडण्यासाठी लंडन पर्यंत धाव घेतली. परंतु पदरी निराशाच आली. बाळाजीपंत नातूची कारस्थाने या खटपटीतूनत उघड झाली . अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रथम पेशवाई व नंतर सातारा राज्य केवळ स्वार्थासाठी बुडविण्यास कारणीभूत झालेल्या बाळाजीपंत नातूची जनमानसात छी थू होऊन त्याला अखेर तोंड लपून काशीला जायची पाळी आली. तिकडेच तो मरण पावला.
छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी दत्तक घेऊन निधन पावले. त्यांच्या निधनानंतर दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी सातारा राज्य खालसा करून अखेरची निशाणी मिटवून टाकली.
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे