महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,503

विजयदुर्ग किल्ल्याच्या सागरी भिंतीचे रहस्य !

By Discover Maharashtra Views: 2859 10 Min Read

विजयदुर्ग किल्ल्याच्या सागरी भिंतीचे रहस्य !

विजयदुर्ग किल्ला अनेक वर्षे अजिंक्य राहिला त्यामागील ३ मोठे रहस्य.

विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन ११९३ ते १२०६ या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर १६ किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन १२०० मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूने जमिनेने वेढलेल्या “घेरीया” उर्फ़ “विजयदुर्ग” किल्ला उभा आहे.(विजयदुर्ग किल्ल्याच्या सागरी भिंतीचे रहस्य)

वैज्ञानिक महत्व :

इ.स. १८ ऑगस्ट १८६८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ नॉर्मन लॉकयॉरने स्पेक्ट्रा मीटरच्या साह्याने केलेल्या निरीक्षणातून सूर्यकिरणातील पिवळ्या रंगातील हेलियम गॅसचा शोध १८ ऑगस्ट १८६८ रोजी याच किल्ल्यात लावला होता, या घटनेची नोंद जगभर घेतली गेली.

नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग. इ.स. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. १२१८ मध्ये बुडविले. इ.स. १३५४ मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. १४३१ मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. १४९० ते १५२६ या काळात बहामनी राज्याचे ५ तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर १६५३ पर्यंत सुमारे १२९ वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला.

मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…

बुरुजाकडे जाणारा भुयारी मार्ग –

छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या भिंतीचे रहस्य :

विजयदुर्गचे बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळय़ात सतत खुपत असे. त्यासाठी काळोखी रात्र धरून अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन मजबूत युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. (याची नोंद कागदोपत्री मिळते) कारण विजयदुर्गपासून काही अंतरावर असताना त्या युद्धनौका बुडाल्या. याचा शोध घेताना त्या भागात समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली बांधलेली आढळली. प्रकाशचित्र तज्ज्ञांनी या संदर्भात काही वर्षापूर्वी कार्बन डेटिंग केली असता हे बांधकाम १७व्या शतकात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि त्या बुडाल्या अशी नोंद मिळते या संदर्भात तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत.

या भिंतीचे रहस्य असे होते की ती ओहोटी असताना सुद्धा ४ मी. पाण्याखाली असते. व इंग्रजांची जहाजे ही तळाला V या आकाराची म्हणजेच खोलगट असे त्यामुळे जहाजे पाण्यात बुडाली आणि याचा धसका इंग्रजांनी घेतला. याउलट मराठ्यांची जहाजे ही तळाला उथळ असल्याकारणाने ती या भिंतींवरून सहज ये जा करू शकत होती.

काही असलं तरी मराठय़ांच्या आरमारात पाण्याखालील ही भिंत आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. कारण पूर्ण तयारीनिशी आणि गुप्तपणे उतरलेल्या इंग्रजांच्या ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ वेळी ही भिंत कामी आली नसती तर कदाचित विजयदुर्गला एका पराभवाचा ठपका बसला असता.

छायाचित्र : इंटरनेटवरून

खंदक –

दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.

१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा! दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या

मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.

या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे आंग्रेंशी कधीच जुळले नाही. आंग्रेंच्या मराठा आरमारामध्ये रामेश्वर भागात असलेल्या गोदीवाडी येथील आरमारी गोदी कधीही दुर्लक्षित करता येणार नाही.

साधारण ६० वर्षापूर्वी म्हणजेच १९५२ सालात आरमारी गोदीमध्ये चिखलात रुतलेला नांगर सापडला होता. साडेतेरा फूट लांब आणि ८ फूट रुंद असलेल्या या नांगरावरून त्या वेळच्या जहाजांची कल्पना येते.

आंग्रे बँक –

पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठय़ांच्या पराक्रमात कामी आली आहे. हा भाग नैसर्गिक आहे. पण ही जागा आंग्रेंच्या नौदलाने शोधून काढली आणि त्याचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतविण्यासाठी अनेक वेळा केला.

जमिनीवर जशा द-या-खो-या, उंचवटे, टेकडय़ा असतात, त्याचप्रमाणे समुद्रतळाशीही असा भाग असतो. समुद्रातील टेकडी म्हणजेच ‘आंग्रे बँक’! किनारपट्टीपासून आपण आत आत गेल्यावर पाण्याची खोली वाढत जाते. विजयदुर्ग समुद्रामध्ये मात्र निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. विजयदुर्गपासून साधारण १०० किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ८० ते ९० मीटर वाढत जाते. पुढच्या ३ ते ४ किमीच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी जाते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये ही खोली अचानक कमी होऊन २० ते २५ मीटर एवढी होते. हीच ती आंग्रे बँक म्हणून ओळखली जाणारी समुद्रातील टेकडी! ही टेकडी तब्बल ३५ ते ४० किमी लांब व १५ ते २० किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणा-या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडं विजयदुर्गकडेच असत. या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असत. या गोष्टीचा फायदा मराठा आरमार घेत असे.

आंग्रे बँक या ठिकाणी मराठा आरमार नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की, मराठय़ांची जहाजं पश्चिमेकडून येऊन त्यांना अटकाव करत. बेसावध असलेल्या शत्रूचा फायदा घेऊन मराठा आरमार त्या जहाजांवरील माल ताब्यात घेत. पराक्रमी मराठा सरदार, त्यांचे मावळे यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला बांधलेली तिहेरी तटबंदी मराठय़ांच्या पराक्रमात महत्त्वपूर्ण ठरली. आणि याचबरोबर आरमारी गोदी, समुद्रातील छुपी तटबंदी, आंग्रे बँक या गोष्टीही विजयदुर्गवरील मराठय़ांच्या विजयगाथेत अतिशय मौल्यवान कामगिरी करणा-या ठरल्या.

सुमारे आठ हेक्टर (५ चौ. किंमी.) क्षेत्रफळाच्या या किल्ल्याला त्रिपदरी तट, सत्तावीस बुरूज व तीन प्रवेशद्वारे आहेत.विजयदुर्ग किल्ल्याच्या सागरी भिंतीचे रहस्य !

एवढी स्थित्यंतरे पाहिलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे !

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

Leave a Comment