महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,944

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा की दंतकथा ?

Views: 3405
8 Min Read

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा की दंतकथा ?

“अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती , आम्ही हि सुंदर झालो असतो वदले छत्रपती “ सदर गीताचे बोल कानी पडताच आपणास आठवण येते ती कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची व तिची खणानारळाने ओटी भरून तिला तिच्या घरी सुखरूप परत पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांची. कवी मधुकर जोशी यांची श्रवणीय शब्दरचना गायक व संगीत दशरथ पुजारी यांनी सुरेल आवाज व सुमधुर संगीत यांच्या साह्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.(कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा की दंतकथा ?)

सदर घटनेस मराठ्यांच्या इतिहासातील समकालीन किंवा उत्तरकालीन कागदपत्रात किंवा बखरीत याविषयी काही संदर्भ आढळून येतात का किंवा ती घटना एखादी दंतकथा असावी का ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेव यांना कल्याणच्या मोहिमेवर पाठविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी दि. २४ ऑक्टोंबर १६५७ मध्ये घेतली.

चिटणीस बखरीतील नोंद :- कल्याणचा खजिना

स्वराज्यातील फौजांनी कल्याण प्रांतात स्वारी केली. त्यावेळी खूप द्रव्य सापडले. त्यासोबत एक सुंदर स्त्री देखील मराठ्यांच्या कैदेत सापडली आबाजी सोनदेव यांनी ती सुंदर स्त्री शिवाजी महाराजांच्या सेवेस योग्य आहे असे जाणून ती स्त्री व लुटीचे द्रव्य राजगडावर पाठवून दिले. शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेव यास त्या स्त्रीस पाहण्यासाठी समोर हजर करण्याचा हुकुम दिला त्याप्रमाणे त्या स्त्रीस वस्त्र व आभूषणे देवून शिवाजी महाराजांनसमोर समोर आणण्यात आले. महाराज तिला पाहून संतोष पावले व बोलले “इचे लावण्य असेच आमचे मातोश्रीचे असते , तर आमचेही स्वरूप असेच जाले असते !“ . शिवाजी महाराजांचे बोलणे ऐकून दरबारातील सर्वांस आश्चर्य वाटले . शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेव यांना सांगितले ज्या राजांना यश संपादन करावयाचे असेल त्याने परस्त्रीची अभिलाषा करून नये त्यामुळे रावणासारखे लोक नष्ट पावले. राजास प्रजा हि आपल्या अपत्याप्रमाणे . शिवाजी महाराजांचे बोलणे येकुन दरबारातील मंडळीची शिवाजी महाराज थोर आहेत असे मानू लागले. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीस वस्त्र अलंकार देवून तिला तिच्या सासऱ्याकडे विजापुरास पाठवून दिले. आबाजी सोनदेव यांना गडावर इमारत करावी अशी कामगिरी देवून शिवाजी महाराज रायगडावर परतले.

शेडगावकर भोसले बखरीतील नोंद :-

सातारा वाई नजीक गोळेवाडी होती . तेथे गोळे नावाचे सरदार बंड होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार स्वराज्यातील फौजांनी स्वारी करून त्यांचा पराभव केला. या युद्धाच्या धामधुमीत सरदार गोळे यांची सून प्रतपागडाजवळील घाट रस्त्यांचा आसरा घेत पळून जात होती. परंतु किल्याच्या खाली स्वराज्यातील सैन्याची चौकी होती. तिथे तिला पकडण्यात आले. एक ब्राम्हण सुभेदार प्रतापगडाच्या किल्यावर होता त्यास सदर बातमी देण्यात आली. सदर स्त्री तरुण व रूपवान होती . सुभेदार त्या स्त्रीस घेऊन साताऱ्याला शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी घेऊन आला. शिवाजी महाराजांना निरोप पाठवला कि तुमच्यासाठी जिन्नस आणला आहे. शिवाजी महाराजांनी सदर जिन्नस कचेरीत घेऊन यावा अशी आज्ञा दिली असता सुभेदाराने त्या स्त्रीस शिवाजी महराजांसमोर उभी केली व तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. शिवाजी महाराजांनी सुभेदार करत असलेली स्तुती ऐकून घेतली . त्यानंतर शिवाजी महाराज बोलले “ हि बाई फार चांगली व स्वरूपही चांगले आहे हे मजला पूर्वीच जर करिता समजले असते तर मी हिच्या पोटी जन्म घेतला असता. परंतु मी प्रारब्धाचा ( नशिबाचा ) हीन म्हणोन जिजाऊ आईसाहेब यांच्या पोटी जन्म घेतला हे मी चुकलो .

सुभेदार हे ऐकून मनातून लज्जित होऊन स्तब्ध उभा राहिला. शिवाजी महाराजांनी त्या ब्राम्हण सुभेदारास २००० होण देवून कुटुंबासहित काशीस निघून जाण्याची आज्ञा केली. परत स्वराज्यात दिसल्यास तुझे पारिपत्य करीन अशी ताकीद दिली. दोन शिपाई व एक जासूद बरोबर पाठवून त्या ब्राम्हण सुभेदारास स्वराज्याबाहेर हाकलवून दिले.

शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीस लुगडी चोळी व मोहरा देवून तिची ओटी भरवून घेतली. दोन शिपाई व एक जासूद सोबत पाठवून तिचे कटुंब जेथे होते तेथे पाठवून दिले. सरदार गोळे यांस सूचना केली कि यात या स्त्रीचा काहीही दोष नाही. तिला पूर्वीप्रमाणे वागवावे.

सदर दोन्ही उत्तरकालीन बखरीची चिकित्सा

चिटणीस बखर लेखनकाळ १८१० म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १३० वर्षांनी लिहिलेली बखर . शेडगावकर भोसले बखर लेखनकाळ १८५४ म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १७४ वर्षांनी लिहिलेली बखर

चिटणीस बखर कल्याणच्या सुभेदाराची सून तर शेडगावकर बखर सातारा वाई येथील गोळे घराण्यातील स्त्री अश्या नोंदी करत आहेत.

चिटणीस बखर आबाजी सोनदेव याने सदर स्त्रीस कैद केले तर शेडगावकर बखर प्रतापगडाचा ब्राम्हण सुभेदार याने सदर स्त्रीस कैद केले अश्या नोंदी करत आहेत.

स्वराज्यातील स्त्रीसोबत बद्कर्म केले म्हणून शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला होता . असे असताना स्त्रीस लुट म्हणून घेऊन येणाऱ्या सुभेदाराचा शिवाजी महाराजांनी तिथेच चौरंगा केला असता . परंतु चिटणीस बखर आबाजी सोनदेव यास महाराजांनी कोणतीही शिक्षा न करता त्याला स्वराज्यात ठेवून घेतले व त्यांच्यावर कामगिरी सोपवली . तर शेडगावकर बखर ब्राम्हण सुभेदारास महाराजांनी स्वराज्यातून हद्दपार केले अश्या नोंदी करत आहेत.

चिटणीस बखरीतील नोंदीनुसार “ आमची आई सुंदर असती तर आम्हीदेखील सुंदर झालो असतो “ असे शिवाजी महाराज बोलेले तर शेडगावकर बखरीतील नोंदीनुसार “ हि बाई फार चांगली व स्वरूपही चांगले आहे हे मजला पूर्वीच जर करिता समजले असते तर मी हिच्या पोटी जन्म घेतला असता., परंतु मी प्रारब्धाचा ( नशिबाचा ) हीन म्हणोन स्वतःस कमनशिबी समजत दोष दिला अशी नोंद करतो.

सदर सुंदर स्त्रीच्या पोटी आपला जन्म झाला नाही म्हणून शिवाजी महाराज स्वतःच्या नशिबास दोष देतात. या बखरकारांच्या कल्पना आहेत.

जिजाऊ आईसाहेब या सुंदर होत्या याविषयीचे वर्णन समकालीन शिवभारतात येते अध्याय २ व अध्याय ३

४६-५९. तिचे हात कमलासारखे असून ती जणू काय पृथ्वीची शोभा होती. ति लावण्यवती असून तिचे कुळ उच्च होते.

२१-२२ ज्या प्रमाणें पार्वतीने शंकराची सेवा केली, त्याप्रमाणें जाधव कुलात उत्पन्न झालेली, चंद्राप्रमाणें सुंदर मुख असलेली व सुंदर दात असलेली जीजाई शहाजी महाराजांची सेवा करी.

सदर दोन्ही बखरी वेगवेळ्या ठिकाणांबद्दल , व्यक्तींबद्दल तसेच परस्परविरोधी नोंदी करत आहेत.

अधिक माहितीसाठी

उत्तरकालीन ९१ कलमी बखरीतील नोंद साने प्रत लेखनकाळ १८१७ आणि सरकार प्रत लेखानकाळ १७८०

साने प्रत कलम ३०

तदोत्तर जाऊन कल्याण मारिले. राजश्री आबाजी सोनदेव यांनी साराच आटोप केला. मशार निलेह्स मुसलमानाची स्त्री चांगली सापडली होती.

ती महाराजांस नजर केली महाराजांनी उत्तर केले कि जिजाऊ साहेबांचे स्वरूप असे सुंदर असते तर आम्ही याप्रमाणे झालो असतो. असे बोलोन तिजला कन्येप्रमाणे समजून तिजला वस्त्र अलंकार देऊन समागमे पाचशे स्वार दिले. आणि विजापुरास पोहचवली

सरकार प्रत कलम ३०

Then the fort of Kalyan was captured and Abaji Sondev left to settle ( the distict ). Abaji had captured a handsome girl ( the daughter-in-law of Maulana Ahmad , the governor of Kalyan ) , in his raid, and presented her to Shivaji. Shivaji said If my mother had your beauty , how happy would it have been! I , too , should have looked handsome. He treated the girl as his own daughter, gave her clothes and other gifts, and sent her ( in safety ) to her home in Bijapur

९१ कलमी बखरितील सदर नोंदीस ९१ कलमी राजवाडे प्रत , प्रभात प्रत , रायरी प्रत दुजोरा देत नाही

निष्कर्ष व शक्यता

१) सदर घटनेत सत्याचा अंश दिसून येत नाही परंतु शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर करत , युद्धाच्या वेळी स्त्री व लहान मुल यांना अपाय होऊ याची विशेष काळजी घेतली जाई. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अश्या दंतकथा निर्माण झाल्या असाव्यात .

२)युद्धाच्या समयास एखादी स्त्री चुकून तिथे सापडली असेल व मराठा सैन्याने त्या स्त्रीस सुखरूप तिला सुरक्षित स्थळी पाठवली असेल , परंतु उत्तरकालीन बखरकारांनी या घटनेचे अवास्तव चित्र रंगवले असेल

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :-
सप्तप्रकरणात्मक चरित्र
शेडगावकर भोसले बखर
शिवभारत
९१ कलमी बखर

Leave a Comment