महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,56,016

बुलंद, बेलाग, अजिंक्य ! स्वराज्याची तिसरी राजधानी

By Discover Maharashtra Views: 2614 5 Min Read

बुलंद, बेलाग, अजिंक्य ! स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी –

बुलंद, बेलाग, उत्तुंग आणि अजिंक्य खरंतर ही विशेषणंही ज्यापुढं फिक्की पडावी असा हा दुर्गम जिंजी चा किल्ला. मराठे या किल्ल्याला चंदीचा किल्ला म्हणून ओळखायचे तर स्थानिक याला सेंजी म्हणून ओळखतात अजूनही. थोडीथोडकी नाही तर तब्बल ११ किमी ची तटबंदी लाभलेला हा किल्ला. राजमाचीचा थोरला भाऊ शोभावा असाच आहे.

राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी असे दुर्गसमूह मिळून एक अखंड जिंजी ! तर या किल्ल्याची निर्मिती एकाच राजाच्या कालखंडात झाली नाही. या दुर्गसमूहांपैकी राजगिरी ची निर्मिती ही बाराव्या शतकात कोणार राजा आनंदा कोण याने केली तर पुढे १२४० च्या सुमारास राजा कृष्ण कोण याने कृष्णगिरी ची निर्मिती केली. आज्ञापत्रात जिंजीचा उल्लेख आढळतो तो असा,

‘साल्हेरी अहिवन्तापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निश्कंठक राज्य. शतावधी दुर्ग, चाळीस हजार पागा, दोन लक्ष पदाती..ऐसी केवळ सृष्टीच निर्माण केली..’

जिंजी हा साधारण किल्ला नसून आतमध्ये एकप्रकारे शहरच असावे एवढा प्रचंड आहे. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी कर्नाटक प्रांतातील अनेक किल्ल्यांबरोबरच हा गड नासिर मुहम्मद याच्याकडून ५० हजार होनांच्या मोबदल्यात जिंकून घेतला आणि आधीच दुर्गम असलेला हा किल्ला अजून बळकट करून घेतला. हा गड स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी या दुर्गसमूहाचे नव्याने नामकरण केले ते म्हणजे शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड.

महाराजांनी या गडावर किल्लेदार म्हणून रायाजी नलगे, सबनीस म्हणून तिमाजी केशव, मुजुमदार म्हणून विठ्ठल पिलदेव अत्रे आणि कारखानीस म्हणून रुद्राजी साळवी यांची नेमणूक केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जिंजीचा कारभार हरजीराजे महाडिक पहात होते.

महाराजांना माहीत होतं की एक ना एक दिवस औरंगजेब दक्षिणेत प्रचंड फौजेनिशी उतरणार, तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी म्हणा किंवा सुरक्षेसाठी लांबवरून त्याला थोपवून ठेवण्यासाठी एक बेलाग, दुर्गम किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागू शकतो म्हणून त्यांनी किल्ल्याची डागडुजी करून अजून दुर्गम करून घेतला अगदी राजधानीला शोभेल असा !

महाराजांची दूरदृष्टी छत्रपती राजाराम महाराज यांच्यावेळी कामी आली. १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्वराज्य कचाट्यात सापडलं. तेव्हा महाराणी येसूबाई या प्रसंगाला मोठ्या धीरोदात्तपणे सामोऱ्या गेल्या. त्यांनी राजाराम महाराज यांचे मंचकारोहन केले आणि संपूर्ण छत्रपती परिवार शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी राजाराम महाराज आणि ताराराणी यांना जिंजीला जाऊन राज्यकारभार बघायला सांगितला. आणि स्वतः बाल शिवाजीराजे (शाहू महाराज) यांच्यासह औरंग्याच्या कैदेत गेल्या.

छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीरीत्या निसटले आणि प्रतापगड, पन्हाळा मार्गे पुढे जिंजीला आले. मागोमाग झुल्फिकारखानाची भलीमोठी फौज होती. जिंजीला वेढा पडला. जिंजीचा वेढा थोडाथिडका नाही तर तब्बल ७ वर्ष चालला. या किल्ल्याच्या भोवती आधी खंदक होते ज्यामध्ये पाणी सोडून मगरी, साप असे जीवघेणे जलचर राहत. काही दुर्ग अभ्यासकांच्या मतानुसार ह्या किल्ल्याचा आवाकाच एवढा प्रचंड होता की रसदीचाही प्रश्न नव्हता ( विचार करा वेढा जवळपास ७ – ८ वर्ष चालला होता) कारण आतमध्येच शेती पिकायची. आजही किल्ल्याच्या परिसरात फिरताना आपल्याला शिवार दिसून येते. अखेर मुघलांनी गड घेतलाच पण तत्पूर्वीच राजाराम महाराज वेढ्यातून यशस्वीपणे निसटले होते.

जिंजी किल्ल्याची रचना म्हणजे त्या दुर्गसमूहांची रचना ही पहाडावर खडक एकावर एक रचून ठेवल्याप्रमाणे असून त्यामुळे पावसाचे पाणी झिरपून जाते. आपल्या इथल्या गडासारख्या पाण्याच्या टाक्या जिंजीवर आढळत नाहीत. येथे विहीर आणि हौद आहे. यातील राजगिरी पर्वत हा दुर्गम असल्याने मुख्य बालेकिल्ला याच पर्वतावर होता. यातील राजगिरी आणि कृष्णगिरी ह्या टेकड्या आणि त्यावरील अवशेष हे जरी बऱ्यापैकी सुस्थितीत असले तरी चंद्रगिरी मात्र भग्नावस्थेत आहे.

आजच्या घडीलाही काही अवशेष आपल्या गतवैभवाची चिन्हे आपल्या खांद्यावर मोठ्या अभिमानाने मिरवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एका राजाच्या लग्नाप्रीत्यर्थ बांधलेला कल्याण महाल. सातमजली आणि अतिशय सुंदर इमारत. या सातमजली इमारतीमध्ये वरपर्यंत खापरीनळाने पाणीपुरवठा केला होता जसा एकेकाळी साताऱ्याला होत होता तसाच आहे.. ७ मजली असलेला हा महाल इंडो-इस्लामिक शैलीत बांधलेला असून तिथे राण्यांचा अधिवास असत.

किल्ल्यात अर्कोट आणि मग पौंडीचेरी दरवाज्यातून प्रवेश होतो. समोरच व्यंकटरमणस्वामींचे सुंदर देवालय आहे. आधी येथे मूर्ती नव्हती पण आता स्थापना झालीय. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्रमंथनाचे सुरेख शिल्प आहे. या मंदिराचे सुरेख खांब पोर्तुगीजांनी पळवले असे सांगतात. जवळच धान्यकोठारे आहेत. बऱ्याच विहिरी आहेत. तालीमखाना आहे. काही निवासी महाल आहेत. देवालये आहेत. तीनही टेकड्यांच्या मध्ये असलेला सुंदर निळाशार असा तलाव लक्ष वेधून घेतो. या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे, त्याला शब्दांत गुंफायचे म्हणल्यास एक ग्रंथही अपुरा पडेल.

या किल्ल्याचे खूप उपकार आहेत आपल्यावर, या महाराष्ट्रावर. ज्याप्रमाणे त्या धामधुमीत संताजी धनाजी सारख्या वीरांनी स्वराज्याचे रक्षण केले तेवढेच महत्व या किल्ल्यालाही आहे. आपल्या धन्याच्या रक्षणासाठी ह्या गडाने शत्रूशी ७ वर्ष झुंज दिली.

Leave a Comment