साडेतीन शहाण्यापैकी एक असलेल्या विठ्ठल सुंदरची राक्षसभुवन येथील समाधी
1750 ते 1765 च्या दरम्यान दक्षिण भारतात मराठे आणि निजाम यांच्यात सत्तेसाठी मोठा संघर्ष चालू होता. अशावेळी राजा किंवा सरदारापेक्षा त्यांच्या हाताखालील लोकांचाच जास्त बोलबाला होता. या दोन्ही सत्ता आपल्या मर्जीनुसार चालवण्याचे काम या साडेतीन शहान्यांनी केले. त्यानुसार पुढीलप्रमाणे साडेतीन शहाणे तयार झाले होते.
1. देवाजीपंत चोरघडे – नागपूरच्या जानोजी राजे भोसलेंचे कारभारी
2. सखाराम बोकिल – पेशव्यांचे सेनापती
3. विठ्ठल सुंदर परसरामी – निजामाचा दिवाण
4. नाना फडणवीस – पेशव्यांचे कारभारी
यातील वरचे तिघेजण हे पूर्ण शहाणे कारण ते तलवार आणि डोके दोन्हीमध्ये तरबेज होते. तर नाना हा तलवार न चालवता फक्त डोके चालवायचा म्हणून त्याला अर्धा शहाणा म्हटले जाते. या तिघांच्या वाकड्या चाळीमुळे मराठे आणि निजाम सत्ता घाईला आल्या होता. विठ्ठल सुंदर आणि देवाजीने तर जाणोजीला थेट छत्रपती करण्याचे स्वप्न दाखविले. त्यामुळे पेशवा आणि जाणोजीचे संबंध बिघडले त्यामुळे जाणोजीने पुण्यावर आक्रमण करत ते जाळून टाकले.
याचवेळी 1761 ला मराठ्यांचे पानीपत झाल्याने याचा फायदा घेत निजामानेही उचल खाल्ली आणि त्याने मराठ्यावर आक्रमण केले. औरंगाबादपासून पुण्यापर्यंतच्या प्रदेशाची खूप नासाडी झाली. या सर्व कारस्थानाचा प्रमुख हा विठ्ठल सुंदर होता. विठ्ठल सुंदर परसरामी हा मूळचा संगमनेरचा रहिवाशी मानला जातो. 1762 ला हैदराबादच्या निजामशाहीच्या गादीवर निजाम अली बसल्यानंतर तांदुळजा मुक्कामी असताना प्रथमत: विठ्ठल सुंदर नजरेस आला. तसा तो निजाम दरबारातील एक मुत्सद्दि रामदास पंताचा भाऊ असून राजकरनातून याचा खून झाला होता. आपल्या बुद्धीच्या जोरावर विठ्ठल सुंदरही निजामाच्या दिवाण पदापर्यन्त पोहोचला. निजामाचे कान भरवून त्याने निजाम आणि मराठा संबंध बिघडुन टाकले. त्याच्यामुळेच पुढे 1763 ला मराठे आणि निजाम यांच्यात राक्षस भुवनची लढाई झाली.
या चारही शहाण्यांचे आपापसात लागेबांधे होते. बुद्धिबळ खेळत खेळत यांच्या चाली ठरायच्या. घोडा अडीच घर माघे घ्या म्हणजे पुढे गेलेले सैन्य थोडेसे मागे घ्या, जानव सहज वर काढून हलवले तर चढाई करा. अशा सांकेतिक भाषेत भर दरबारात बसून ही मंडळी शत्रूलाही आपले संदेश पोहोचवायची. त्यामुळे निजाम आणि मराठे यांच्यात अनेक वेळा संघर्ष घडून आला.
राक्षस भुवनची लढाईपूर्वीही त्याने जाणोजी राजेंना असेच आपल्या बाजूला वळवले होते. त्यानुसार आगष्ट 1763 रोजी या दोन्ही फौजा राक्षस भुवन ता. गेवराई जिल्हा बीड याठिकाणी समोरासमोर येऊन उभ्या राहिल्या. लढाईच्या अगोदर जाणोजी भोसल्यांनी निजामाकडून अंग काढून घेतले. पेशव्यांचा पूर्ण राग हा विठ्ठल सुंदरवरच होत्या. त्यानुसार ऐन लढाईत मल्हारराव होळकर आणि महा दजी नाईक निंबाळकरांनी विठ्ठल सुंदरच्या हत्तीला घेरून त्याला घायाळ केले आणि महादजी निंबाळकरांनी विठ्ठल सुंदरचा शिरच्छेद केला. त्यामुळे निजामाने लगेच शरणागती पत्करली.राक्षसभुवन याठिकाणी गोदावरी काठावर विठ्ठल सुंदर यांची समाधी आहे. त्याच्याच बाजूला आणखी एक समाधी आहे. ती कोणाची आहे? याविषयी लोकांना माहीत नसली तरी दुसरी समाधी ही करमाळ्याचे जहागीरदार जानोजी निंबाळकर यांची असावी कारण या लढाईच्या आदल्याचदिवशी जानोजी निंबाळकरांचे निधन झालेले होते. काही असेल परंतु अशा समाध्याच्या रूपाने इतिहासाला उजाळा मिळतो हेच खरे.
माहिती साभार – Dr. Satish Kadam