महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,270

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या अभ्येद्यतेसाठी निर्माण केलेले तिहेरी अधिकार सुत्र!

By Discover Maharashtra Views: 1535 5 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या अभ्येद्यतेसाठी निर्माण केलेले तिहेरी अधिकार सुत्र – हवालदार, सबनीस, कारखानीस।।

छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ले यांची व्यवस्था लावताना तिहेरी अधिकार सुत्राचा वापर केला होता हे बहुतांशी आपणास ठाऊकच आहे. मग ते तिन अधिकारी एक म्हणजे हवालदार तो मराठा जातीचा असावा, सबनीस हा ब्राम्हण जातीचा असावा तर कारखानीस हा कायस्थ प्रभू असावा. असा महाराजांचा दंडक होता. पण हवालदार, सबनीस, कारखानीस यांच्या एकसुत्री कामाची पद्धत कसी होती हे जर जाणून घ्यायच झाल तर वर वर पाहता हवालदाराकडे गडावरील सर्व सैन्य ताब्यात असे शिवाय गडाच्या चाव्या हि हवालदाराच्या ताब्यात असत. त्याने रोज सकाळी स्वता जाणून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडायचा. व सायंकाळी तो स्वता बंद करायचा. किल्ल्याचा मुख्य हा हवालदार. मंग येतो सबनीस, त्या नंतर कारखानीस. पण यांचे एकसुत्री कामकाज कस चालत होते हे पहायच झाल तर “सनदा आणि पत्रे पृ- १३० व १३१ व १३२ वर” प्रकाशित केलेल्या शिवकालीन पत्रात आहे. अगदि ठोकळ माणेने सबनीस व कारखानीस यांची कामे काय पासायच झाल तर, सर्वसाधारण जमाखर्चाची नोंद ठेवणे आणि प्रामुख्याने हजेरीपट ठेवणे हे सबनीसाचे काम असे. परंतु कारखानीसाचे मुख्य काम हे मालाची देवाणघेवाण करणे हे होते. सविस्तर पाहता खालील उतारा पाहुयात.

‘पोते व जामदारखाना याची हुजत व जमाखर्च सबनिसाकडे व्हावा. हुजतीवर मोतर्वाखाली रुजू कारखानिशी म्हणून चिन्ह कारखानीसानी करावे व पोते जामदारखानी यावर खर्ची चिठी होणे से सबनिशी कडील व्हावी. हवालदाराचे मोर्तब खाली, रुजु कारखानीशी म्हणोन कारखानीसानी करावे, व पोते जामदारखान्यांची कीर्द रोजचे रोज दोहीकडील दाखल्यानी रुजू होऊन, हवालदाराचा शिक्का व मोर्तबाखाली चिन्ह रुजु कारखानिशी, कारखानिसानी करावे. कलम १. किल्ल्याहून मुलुखात रोखापत्र करणे जाले तरी सबनिशीकडील व्हावे. शिक्का हवालदारानी करावा. मोर्तबाखाली चिन्ह रुकारखानीसानी करावे. लोकांची हजेरी घेणे ती सबनीसांनी घ्यावी. दाखल्यास कारकून कारखानसाचा असावा, याप्रमाणे पोते व जामदारखान्याची वाटणी जालीतरी करावे. मुलकात रोखा व पत्र करणे तो नक्की कापडाचा, सबनिशी मोर्तबाखाली रुजु कारखानिशी, कारखानिसानी करावे. याखेरीज ऐन जिनसी व जाबद फर्मास याचा रोखा होणे तो कारखानिसाकडील व्हावा. मसाला सबनिसानी भरावा.

मोर्तबाखाली रुजु कारखानिसी करावे, सबनिसानी करावे. हिशेब हवालदारास अगर तालुकादारास अथवा सरकरात समजावणे तो सबनिशी व कारखानिसाकडील, एकबेर्जी हिशेब सबनिसानी आपलेपाशी घेऊन समजवावे. जवळ कारखानिसानी बसावे दोहोकडील हिशेब पुसणे तो सबनीसास पुसावा. सरकारात, अगर तालुकादारास अगर सरदारास, सुभेदारास, दुसरे किल्लेदारास कागदपत्र लिहिणे तो सबनिसानी लिहावा. चिन्ह सबनिसानी करावे. शिक्का मोर्तब सुभेदाराचा जहालियावर कारखानिसानी बार मात्र करावे, चिन्ह करू नये. बार करून ठेविल्याखेरीज रवाना करू नये. मुलुखातील घेऱ्याच्या पाहण्या करणे, तरी सबनिशीकडून आकार करून सबनिसानी घ्यावा. जमेस कारखानिसानी धरावे. आकाराचा रोखा व कौल देणे तो सबनिसानी द्यावा. शिक्का मोर्तब हवालदाराचे जाहालीयावर कारखानिसानी रुजु चिन्हा करावे. ऐनजिनशी व वजनी व सुमारी जिन्नस किंवा जमाखर्च होईल त्याची कीर्द कारखानिशीकडील व्हावी. हुजत कारखानिसानी द्यावी. हवालदाराचा शिक्कामोर्तब जालीयावर खाली रुजु सबनिशी सबनिसानी करावे. कोठीस खर्चाची चिठी होणे ती कारखानिसानी ल्याहावी. हवालदाराचे मोर्तब जालीयावर रुजु सबनिशी करावे.

ऐन जिनशी व वजनी व सुमारी वाटणी होऊ लागली, तरी कारखानिसाकडे व्हावी. दाखल्यास कारकून सबनीसाचा असावा. मुलुकात रोखापत्र ऐनजिनसी व सुमारी होणे तो कारखानसाचा व्हावा, मसाला सबनिसानी भरावा. हवालदाराचे मोर्तब जालियावर रुजु सवनिशीचिन्ह करावे. पैदास्ती कुणबिणी किंवा पोरगे, घोडे, गुरे आली तरी हुजत कारखानिसनी द्यावी. खर्च जाला तर कारखानिसाची चिठी व्हावी. मोर्तब खाली रुजु सबनिशी करावे. इमारत जाली तरी तेथील काम घेणे, ते कारखानिसानी घ्यावे. देखरेख सबनिसानी करावी. कारखान्यावरील लोकास वाटणी जाली तरी नक्ती व कापड सबनिसानी करावी. दाखला कारखानिसाचा असावा. ऐनजिनसी केली वजनी सुमारी वाटणी जाली तरी कारखानिसानी करावी. दाखला सबनिसाचा असावा. आरमाराचा कारखाना करणे आले तरी कारखानिसाकडील कारकुनाने ल्याहावे, काम कारखानिसानी घ्यावे. देखरेख सबनीसानी करावी. अश्या प्रकारे किल्ल्यावर हे तिन अधिकारी काम करत. त्यामुळे किल्ल्याचा पूर्ण अधिकार कोणा एका अधिकाऱ्याकडे न जाता तो तिघांकडे जात होता हेच तिहेरी अधिकार सुत्रात किल्याचे काम चाले. या मुळे फंद फितुरी होण्याची शक्यता नगण्य होती.

संदर्भ-
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला,
¤ शककर्ते शिवराय- खंड १
¤ सनदा आणि पत्रे- पृष्ठ. १३० व १३१ व १३२,
¤ यॅडमिनीष्ट्रीव सिस्टम ऑफ मराठा- डाॅ. सुरेंद्रनाथ सेन (इंग्रजी)

मराठी अनुवाद-
¤ मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था- सदाशिव शिवदे

संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे

Leave a Comment