छत्रपती थोरले शाहू महाराजांचे तोतये –
तोतया म्हणजे समाजातील एखाद्या कर्तुत्ववान , धनसंपन्न किंवा सरदार राजघराण्यातील व्यक्तीच्या संशयास्पद मृत्युनंतर किंवा अचानक बेपत्ता झाल्यानंतर सदर व्यक्तीचा पैसा , समाजातील प्रतिष्ठा व मानमरातब याच्या लालसेपोटी यावर दावा सांगण्यासाठी सदर व्यक्तीच्या शाररीक रूपसाम्यतेचा व शाररीक खुणा व्रण यांचा आधार घेत प्रकट झालेली व्यक्ती म्हणजे तोतया. तोतया व्यक्ती सदर व्यक्तीची शाररीक लकब , हावभाव यांची नक्कल करण्यात वाकबगर असे. तसेच सदर व्यक्तीची दिनचर्या ,खाजगी गोष्टी याबाबत देखील माहितगार असे.(छत्रपती थोरले शाहू महाराजांचे तोतये)
इतिहासात आपणास अनेक प्रसिद्ध प्रतिष्ठित धनवान तसेच सरदार व्यक्तींचे तोतये उदयास आलेले आढतात. तोतया व्यक्तीच्या सोंगामुळे काही काळासाठी लोकांची फसगत होत असे व त्याचा क्षणिक फायदा सदर तोतया व्यक्तीस होत असे. परंतु त्याचे मूळ स्वरूप समोर येऊन सदर तोतया व्यक्तीचे बिंग फुटताच त्यास मृत्युदंड , कैद , शाररीक इजा अथवा आर्थिक दंड अश्या शिक्षेस सामोरे जावे लागत असे . तसेच सदर तोतया व्यक्तीच्या कारस्थानास छुपी मदत करणारी व्यक्ती देखील शिक्षेस पात्र ठरवली जात असे. एखाद्या व्यक्तीचे दोन ते तीन तोतये एकाच वेळी उत्पन्न होत असत. काही तोतया व्यक्तींची दखल तत्कालीन समाजाने न घेतल्याने त्याची तोतयेगिरी आपोआपच नामशेष झाली.
छत्रपती थोरले शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांचे दोन तोतये निर्माण झाले. पेशव्यांचे व कान्होजी आंग्रे यांचे गुरु ब्रहेंद्रस्वामी यांनी समाधी घेतल्यानंतर देखील त्यांचा तोतया निर्माण झाला. पानिपत युद्धात अनेक सरदार धारातीर्थी पडले त्यांच्या वीरमरणाविषयी संधिक्ता होती त्यामुळे जनकोजी शिंदे यांचे दोन तोतये , बापुजी बल्हाळ फडके यांचा एक तोतया , सदाशिवभाऊ पेशवे यांचे तीन तोतये प्रगट झाले. परंतु सदर सर्व तोतयांचे बंड मोडून काढण्यात आले व त्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षा देण्यात आल्या. स्त्री तोतया व्यक्ती देखील निर्माण झाल्याच्या नोंदी आढळून येतात. सवाई माधावराव पेशवे यांची द्वितीय पत्नी यशोदाबाई यांच्या निधनानंतर ११ वर्षांनी तोतया स्त्री उदयास आली.
छत्रपती थोरले शाहू महाराजांचे तोतये
छत्रपती थोरले शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना यांचे दोन तोतये निर्माण झाले. परंतु हे दोन्ही तोतयांचे बंड महाराणी ताराबाई यांनी मोडून काढले.
पहिला तोतया :- पन्हाळगडाच्या पायथ्याशी खटावच्या कुलकर्णी खंडो लिंगो याने तोतया करून राजश्री संभाजी राजे याचा पुत्र आपण शिवाजी राजे आपले नाव म्हणोन राज्यात डोहणा आरंभला. ( संदर्भ :- ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ )
दुसरा तोतया :- नावजी बलकवडा याने हरामखोरीचे ढंग करून , किल्ले सुधागडचा आसरा करून , तोतयाचा बहाणा केला. आणि लोक जमाव करून , मुलखात स्वारी घालून गाव मारून नेवू लागला. त्यास नतीजा त्याचे कर्तव्यानुरूप झाला. ( संदर्भ :- सनदा पत्रातील माहिती )
छत्रपती थोरले शाहू महाराजांचे स्वराज्यात आगमन
औरंगजेबाच्या मृत्युनंतर ८ मे १७०७ मध्ये शाहू महाराज स्वराज्यात परत आले. परंतु महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराज हे तोतया असल्याचे जाहीर केले. चिटणीस बखरीतील नोंदीनुसार “ पूर्वी एक वेळ तोतीया शाहू राजा होऊन आला, त्यास मारिले. तसेच हेही म्हणून फौजा पाठवून त्यांचे पारपत्य करावे, धरावे मारावे. ” शाहू महाराजांचे दोन तोतये याआधी निर्माण झाल्याने ताराबाई यांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला. त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी शोध घेतला असता सदर शाहू महाराज हे तोतया नसून खरे असल्याची निदर्शनास आले. चिटणीस बखरीतील नोंदीनुसार “ अष्ट प्रधान व सरदार यांणी कारकून पाठवून शोध नेले, तो शाहू महाराज खरे “
तोतयांच्या कारस्थानाची झळ खुद्द छत्रपतींना पोहचलेली दिसून येते .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- सनदा पत्रातील माहिती
ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १
चिटणीस बखर
पेशवे :- श्रीराम साठे