महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,614

छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त, शिरोळ

Views: 2745
2 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त, शिरोळ –

शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील म्हणून ओळखल्या अथवा मानल्या जाणाऱ्या काही वस्तूंपैकी दोन आसने अथवा तख्त आजमितीस उपलब्ध आहेत. हि दोन्ही तख्तं कोल्हापूरच्या छत्रपतींकडे असून यातील एक तख्त कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यातील भवानी चौकात असते तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त, शिरोळ, ज्याच्या बद्दल अगदी कमी लोकांना ठाऊक आहे, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्याच्या गावी असते. याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या तख्ताशेजारी रणरागिणी महाराणी ताराऊ साहेबांचे तख्त देखील आहे.

कोल्हापूर शहरापासून पूर्वेस ४५ किमी अंतरावर असलेले शिरोळ हे गाव मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या व त्यानंतर भाऊबंदकीच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. ताराराणी साहेब शिरोळास आल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात मिळून येतात. यावरुन शिरोळात असणारे ताराराणींचे तख्त हे त्यांच्या वापरातीलच होते, असे म्हणावयास जागा आहे. शिवाय ताराराणींचे हे तख्त कोल्हापूरच्या राजवाड्यातील त्यांच्या अस्सल ऐतिहासिक तख्ताशी अगदी मिळतेजुळते आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शिरोळास आले होते का, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचे हे तख्त याठिकाणी कसे आले, कधी आले, कुणी आणले ? असे प्रश्न उपस्थित होतात, ज्यांचे संशोधन होणे गरजेचे आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींशी संबंधित सन १८५५ सालच्या एका ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये शिवरायांच्या शिरोळ येथील तख्ताचा उल्लेख सापडतो. यावर अजूनही संशोधन होऊन, तख्ताशी संबंधित यापूर्वीचेही अस्सल दस्तऐवज शोधणे गरजेचे आहे.

सन १९३० च्या दरम्यान शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी या तख्ताच्या इमारतीचा जिर्णोद्धार करुन तख्ताच्या मागे शिवरायांची प्रतिमा व छत्रपतींचे राजचिन्ह असलेली फरशी बसवली, जी आजही पहायला मिळते. पूर्वी कोल्हापूरच्या छत्रपतींतर्फे विजयादशमीला या तख्ताला पाच तोफांची सलामी दिली जायची, जी कालांतराने दोन तोफांवर येऊन तख्ताच्या इमारतीभोवती लोकवस्ती वाढल्याने व एका अपघातामुळे काही वर्षांपूर्वी बंद झाली. या दोन ऐतिहासिक तोफा मात्र आजही याठिकाणी पहायला मिळतात. महाराजांच्या या तख्ताची दैनंदिन देखभाल करण्यासाठी स्थानिक मानकरी असून तख्ताचे व्यवस्थापन करवीर छत्रपतींच्या छत्रपती देवस्थान ट्रस्टमार्फत पाहिले जाते.

प्रसिद्धीपासून अगदीच लांब असलेल्या या शिवछत्रपति महाराज व ताराराणी साहेबांच्या तख्तास प्रत्येकाने एकदा आवर्जून भेट द्यावी.

Kiran Mengale

Leave a Comment