महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,287

तिकोना किल्ला

Views: 4508
4 Min Read

माझी भटकंती | तिकोना किल्ला…

पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना किल्ला असे नाव पडले आहे. याला ‘वितंडगड’ असेही दुसरे नाव आहे.

तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला परंतु इ.स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला आणि छत्रपती शिवरायांनी अन्य गडांबरोबर याचेही नाव बदलून ‘वितंडगड’ असे ठेवले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो इ.स.१६७० मध्ये परत मिळवला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. मराठय़ांची सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. (माहिती स्रोत : किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माहिती फलकावरून )

आम्ही गडावर जाण्यासाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिकोना पेठ या गावामधील वाटेने आलो आणि वाहनतळावर गाडी पार्क करून गड चढण्यास सुरुवात केली. रस्त्यात आपल्याला गडद लेणी कडे जाणारी वाट दिसते, पुढे आपल्याला मेटं लागतं. मेटं म्हणजे गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा किंवा गडावर झालेला हल्ला परतवून लावण्याचं पहिलं ठिकाणं. यापुढे बरीच चढाई केल्यावर देवडी किंवा चेकनाका येतो. येथे येणाऱ्या पर्यटकांची नोंद करण्याची सोय केलेली आहे.

यानंतर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. तो वेताळ दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ओसऱ्यांचे म्हणजेच पहारेकऱ्यांच्या खोल्यांचे अवशेष दिसतात. समोरील मोकळ्या जागेत दिसणारे अवशेष हे वेताळेश्वर मंदिराचे असावेत.

तिथून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मारुतीची मोठी मूर्ती कोरली आहे. बघताक्षणीच मूर्ती आपल्याला स्तब्ध करून टाकते. याच्या जवळच श्रीरामाची गादी नावानं एक ठिकाण ओळखलं जातं. इथं गडावरील राज्यकारभार चालवण्याची सदर होती. याशिवाय सहा खणी श्रीरामाचं मंदिर होतं. इथं वेगवेगळे सण व उत्सव साजरे केले जात असत.

बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे.

वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी, काही घरांचे अवशेष दिसतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते.

तिकोन्याचा बालेकिल्ला खूपच छोटा. गडमाथ्यावर वितंडेश्वराचं छोटेखानी मंदिर आहे. हे मंदिर खोदीव पाण्याच्या टाकीवर उभं आहे. मंदिरासमोर उघड्यावरच नंदी आहे. मंदिराच्या आजूबाजूला पाण्याचा हौद, दोन तळी, धान्यकोठारं यांसारखे बरेच उध्वस्त अवशेष आढळतात.

तिकोन्याच्या बालेकिल्ल्याचे दर्शन आटोपले, की आपले लक्ष जाते ते आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांवर. गडाच्या माथ्यावरून सारा पवन मावळ नजरेत भरतो. पवनेचा विशाल जलाशय, तुंग, लोहगड, विसापूर हे दुर्ग आपल्याला दिसतात.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti फेसबुक पेज

Leave a Comment